Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पराभवाचे शल्य येत्या निवडणुकीत धुवून काढा : आर. आर. पाटील
वार्ताहर / जळगाव

 

जिल्ह्य़ातील जळगाव आणि रावेर या लोकसभेच्या दोन्ही जागांवर झालेल्या पराभवाचे शल्य येत्या विधानसभा निवडणुकीत धुवून काढावे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी केले. जातीयवादी शक्तींना दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी व्हावी हा हेतू आहे. पण आघाडी होणार नसेल तर सर्वच्या सर्व २८८ जागांवर लढण्यास राष्ट्रवादी सक्षम असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्य़ातील कार्यकर्ते तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पाटील येथे आले होते. राज्य विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना जिल्ह्य़ात पक्षामध्ये निर्माण झालेले मतभेद व गैरसमज दूर करण्यासाठी आपण आल्याचे पाटील यांनी सांगितले. विधानसभेसाठी जिल्ह्य़ात कोणालाही उमेदवारीचे आश्वासन दिलेले नाही. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्त उत्साहीपणा करू नये असे सांगून बंडखोरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही पाटील यांनी दिला.
जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणे महत्वाचे आहे. आघाडी व्हावी ही इच्छा असल्याने आम्ही वाट पहात आहोत. हा आमचा दुबळेपणा समजू नये. लोकसभा निवडणुकीत जागा कमी मिळाल्या तरी पक्षाची आठ लाख मते वाढली असल्याचेही ते म्हणाले. लोकसभेच्या निकालाने कार्यकर्ते नाऊमेद नाहीत. विधानसभेत चांगले यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभेत काही चुका झाल्या त्या मान्य करून विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होणार नाही, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. विधानसभेसाठी इच्छुक जास्त असले तरी सहमती घडवून आणू असे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत महिला, तरूण तसेच राजकारणापासून दूर असलेल्या काहींनी उमेदवारी मागितली तर त्यांची निवडून येण्याची क्षमता पाहून त्यांना उमेदवारी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य विसरून विधानसभेत पक्षाला घवघवीत यश मिळवून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.