Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सावरकरांनी धुळाक्षरे गिरविलेली शाळा घाणीच्या साम्राज्यात
स्पॉट दारणा
प्रकाश उबाळे / भगूर

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव हीच भगूरची खरी ओळख. स्वा. सावरकरांनी येथील ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले, त्या शाळेकडे ऐतिहासिक वारसा म्हणून पाहिले जायला हवे. पण त्याऐवजी सध्या या शाळे भोवतालच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शाळेच्या प्रवेशव्दारालाच सांडपाण्याचा विळखा बसला आहे. लहवितरोडवर जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेली ही मराठी शाळा दुरूस्ती अभावी मोडकळीस आली आहे. परिणामी, ज्या शाळेत स्वातंत्र्यवीरांनी अक्षरे गिरविली तीच इतिहास जमा होते की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.
सध्या ही इमारत गोडावून म्हणून उपयोगात आणली जात आहे. तुटलेले कपाट व भंगार साहित्याची साठवणूक या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. शाळेच्या प्रवेशव्दारासमोरच विद्युत डीपी आहे. स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी काही काळापूर्वी माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी शाळेत येऊन फलकाचे अनावरण केले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या इमारतीवर अवकळा आली असून तिला शाळा म्हणावे का, एवढाच प्रश्न बाकी आहे. प्रवेशद्वारावर फक्त ‘आमची शाळा’ एवढीच अक्षरे शाळेची साक्ष देण्यासाठी असून प्रवेशव्दार म्हणजे एकप्रकारचा कचरा डेपोच झाला आहे. अनेक पक्षांचे पुढारी येथून दररोज ये-जा करीत असतात, परंतु सावरकरांच्या आठवणींची गाथा सांगणाऱ्या या ऐतिहासिक इमारतीच्या बिकट अवस्थेबद्दल आवाज उठविण्याची तसदी अद्याप कोणीही घेतल्याचे दिसत नाही.
जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या या इमारतीला स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी सहा महिन्यांपूर्वी प्रयत्न केला होता. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ इमारतीच्या दुरूस्तीविषयी पावले उचलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. परिणामी, शाळेची इमारत घाणीच्या साम्राज्यात सापडली आहे. याठिकाणी नगरपालिकेने आणून टाकलेले पाइप ठेकेदारांनी न उचलल्याने तो एक अडथळा ठरत आहे. इमारतीच्या आतील भाग जीर्ण झाला असून कोणत्याही क्षणी तो जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे.
शाळे समोरच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून स्वच्छता झाली नसल्याने तेथे जणू सांडपाण्याचा तलावच निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळते. सांडपाण्यामुळे डुकरांनी या शाळेचे प्रवेशव्दार मुक्कामाचे हक्काचे ठिकाण करून ठेवले आहे.
सध्या पालिकेचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर असल्याने तर आता येथील घाणीच्या साम्राज्यात अजूनच भर पडत आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या या इमारतीमध्ये शाळा भरण्याचे सध्या बंद आहे, याकडेही यानिमित्ताने लक्ष पुरवले जायला हवे.