Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

धुळे जिल्ह्य़ातील गुन्हेगारीचे मूळ शोधणार - देशभ्रतार
धुळे / वार्ताहर

 

मध्यप्रदेश आणि सातपुडय़ाच्या जवळपास सीमावर्ती भागात वसलेल्या धुळे जिल्ह्य़ातील गुन्हेगारीचे मूळ आपण शोधणार असून सर्वाच्या मदतीने गुन्हेगारी नियंत्रणात आणता येऊ शकेल, असा विश्वास धुळ्याचे नवे पोलीस अधीक्षक एच. व्ही. देशभ्रतार यांनी व्यक्त केला. प्रभारी अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्याकडून देशभ्रतार यांनी नुकतीच पदाची सूत्रे स्वीकारली, त्यानंतर ते बोलत होते.
कुठलाही गुन्हा घडल्यानंतर तो नोंदविलाच जायला हवा, यात कुणाचा हस्तक्षेप होवू शकणार नाही, असे स्पष्ट करीत देशभ्रतार यांनी धुळे जिल्ह्य़ाचे क्षेत्रफळ आणि गुन्हेगारीची वर्षांकाठची सरासरी यावर नजर टाकली. साधारणपणे १८ लाख लोकसंख्येच्या या जिल्ह्य़ाचे क्षेत्रफळ ८ हजार स्क्वेअवर किलोमीटर एवढे असून आजुबाजुच्या जंगल जमिनीचीही माहिती आता करून घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारतेवेळी देशभ्रतार यांनी पोलीस अधीक्षक इमारतीतील भिंतीवरील अस्वच्छतेचा यावेळी आवर्जून उल्लेख केला. पान खाऊन थुंकलेले हे डाग आधी काढणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता या इमारतीतूनच स्वच्छतेची सुरूवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अपर पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी यु. एम. धोबी यावेळी उपस्थित होते.