Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

जमिनीच्या नोंदीसाठी लाच घेणाऱ्या तलाठय़ास अटक
मालेगाव / वार्ताहर

 

खरेदी केलेल्या जमिनीची नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तालुक्यातील जळगाव निंबायती येथील तलाठय़ास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. तालुका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोपट केदा वन्नीस असे या तलाठय़ाचे नाव आहे. जळगाव निंबायती येथील एका शेतकऱ्याने गेल्या जानेवारीत जमीन खरेदी केली होती. या खरेदी खताचा उपनिबंधकांनी दिलेला क्रमांक संबंधित शेतकऱ्याने लगेचच तलाठय़ाकडे दिला होता, मात्र तरीही नोंद लावण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. तसेच त्यासाठी पाच हजार रुपयांची मागणीही करण्यात येत होती. संबंधित शेतकऱ्याने यासंदर्भात नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता या विभागाचे उपअधिक्षक के. डी. विधाते, उपनिरीक्षक प्रदीप ओगले, हवालदार अनिस शेख, भारत पाटील आदींच्या पथकाने संबंधित तलाठी कार्यालयात सापळा रचला. त्यात पाच हजाराची लाच स्वीकारताना वन्नीस यास पकडण्यात आले.