Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘पॅकेज’ची सरकारी खिरापत म्हणजे भीक मागून संसार- खडसे
सटाणा / वार्ताहर

 

सद्यस्थितीत महाराष्ट्र शासनावर एक लाख नव्वद हजार कोटी रुपयांचे कर्ज असून त्याची पर्वा न करता आघाडी शासन कोटय़वधी रुपयांचे पॅकेज लोकप्रियतेसाठी जाहीर करीत आहे, संपकऱ्यांना खिरापत वाटत आहे, पण, हा प्रकार म्हणजे भिक मागून संसार करण्यासारखा असून पॅकेजचा निधी वाटण्यासाठी पैसा आणणार कुठून, असा सवाल भाजपचे विधीमंडळ गटनेते आ. एकनाथ खडसे यांनी केला.
मुल्हेर येथे झालेल्या शेतकरी, शेतमजूर, आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. खडसे यांनी आघाडी शासनावर तोफ डागली. ते म्हणाले की, आघाडी शासनाच्या वतीने गेल्या १० वर्षांत फक्त घोषणा झाल्या. फुकट वीज देण्याचीही घोषणा झाली. पण हे सरकार फुकट तर सोडाच, विकत सुद्धा सुरळीत वीज देऊ शकत नाही. सध्या खतांच्या तीव्र टंचाईमुळे शतकऱ्यांवर अन्याय होत आहे. महागाईने कळस गाठला असून सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशा परिस्थितीत आघाडी शासनाला सत्तेवर रहाण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असेही खडसे यांनी स्पष्ट केले.
यावेळी पक्षाचे नवनिर्वाचित खासदार प्रताप सोनवणे तसेच हरिश्चंद्र चव्हाण यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी अर्जुन अहिरे, पोपटराव गवळी, लालचंद सोनवणे, भास्कर गांगुर्डे यांची भाषणे झाली. सूत्रसंचलन सतीश शुक्ल यांनी केले. पोपटराव गवळी हे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवार असून या कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तर उमाजी बोरसे व विक्रम मोरे हे अन्य दोघे इच्छुक उमेदवार मात्र मेळाव्यास अनुपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमस्थळी याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. भाजपकडून येत्या निवडणुकीत कोणाला तिकीट मिळणार, याच्या शक्याशक्यता पडताळून पाहण्यात या प्रकारामुळे अधिकच वेग आला आहे.