Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

खान्देश विकासासाठी संस्कृती व विकास मंचचा जाहीरनामा
धुळे / वार्ताहर

 

खान्देशच्या सांस्कृतिक व एकात्मिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या निरनिराळ्या १५ गरजांचा पहिल्या टप्प्यातील जाहिरनामा खान्देश संस्कृती व विकास मंचतर्फे प्रसिद्धीस देण्यात आला आहे. यासाठी दोन दिवस झालेल्या बैठकीत धुळे शहरासह साक्री, शिंदखेडा, अमळनेर, पाचोरा, जळगाव, चाळीसगाव व मालेगाव तालुक्यातून सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांत खान्देशातील विकासाच्या अनुशेषाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. राज्य शासनाने नाशिक येथे मंत्रीमंडळाची बैठक बोलावून काही हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. ती खान्देशातील जनतेची एकप्रकारे फसवणूक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. खान्देश पॅकेजच्या नावाखाली मोठय़ा रकमेच्या आकडय़ांची धुळफेक लोकप्रतिनिधींकडून केली जात असल्याचा सर्वाचा आक्षेप होता. या पाश्र्वभूमीवर, खान्देशच्या विकासाचे पॅकेज व प्रत्यक्ष सामाजिक प्रश्न सोडवणुकीसाठी करावयाचा अभ्यास आणि तंत्रज्ञानावर आधारीत विकासाची कार्यवाही यामध्ये अंतर असल्याने खान्देश संस्कृती व विकास मंचाकडून जाहिरनाम्याची चर्चा घडवून आणण्यात आली. खान्देशच्या विकासाच्या संदर्भात ५० कलमी जाहिरनाम्यातील पहिल्या टप्प्यात मालेगाव जिल्हा निर्मिती करावी, धुळे जिल्ह्याचा विस्तार आणि जळगावचे विभाजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. खान्देश महसूल विभाग स्वतंत्र करावा, त्याचे केंद्र भौगोलिकदृष्टय़ा मध्यवर्ती ठिकाणी असावे, खान्देशसाठी स्वतंत्र वैधानिक महामंडळ स्थापन करावे, त्यातून नाशिक व अहमदनगर जिल्ह्य़ास वगळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
नंदुरबार व मालेगाव नभोवाणी केंद्र निर्माण करावे व स्थानिक कलावंतांना, प्रश्नांना संधी आणि बोली भाषेमध्ये बातमीपत्र व कार्यक्रम होतील याकडे लक्ष द्यावे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव बदलून ते खान्देश विद्यापीठ करावे, नारपार व दमणगंगा नदीवर प्रकल्प करण्यासाठी त्याचा राष्ट्रीय योजनेत समावेश करावा, नर्मदा खोऱ्यातील राज्याच्या वाटय़ाचे पाणी सातपुडा डोंगर रांगात बोगदा करून देव व इतर नद्यांमध्ये वळवावे यांचा जाहिरनाम्यात समावेश आहे. धुळे ते नरडाणा रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी बीओटी तत्वाचा वापर करावा ही मागणी करण्यात आली आहे. या शिवाय शिक्षण, आरोग्य क्षेत्रात व तालुकानिहाय विकास कामांच्या गरजांबद्दल पुढील टप्प्यातील बैठकीत चर्चा घडवून आणली जाणार आहे. साक्री तालुक्यातील फड पद्धतीचे पुर्नजीवन करण्यासाठी पांझरा नदी बारमाही करण्याचा प्रयोग करण्यासाठी पुढील दोन महिन्यात स्वतंत्रपणे कार्यशाळा घेण्याचे बैठकीत निश्चित झाले. खान्देशातील तालुका हे विकासाचे एकक मानून तालुका पायाभूत सुविधा निर्मितीचा आग्रह धरला जाणार असल्याचे मंचचे संयोजक अविनाश पाटील यांनी सांगितले. बैठकीत प्रा. डॉ. मु. ब. शहा, प्राचार्य जे. जी. खैरनार, कृषीमित्र वसंत ठाकरे, साहेबराव कुंवर, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.