Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शेअर बाजाराचा संपूर्ण अभ्यास गरजेचा - ठाकूर
चाळीसगाव / वार्ताहर

 

शेअर बाजार हा विषयच असा की त्याबद्दल खूपच उत्सुकता असते. शेअर बाजारात गुंतवणूक करायला हरकत नाही. परंतु त्या आधी त्याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. कर्ज काढून शेअर विकत घेऊ नयेत किंवा शिल्लक रक्कम सर्वच्या सर्व गुंतवू नये. कारण निर्देशांकात सातत्याने चढ-उतार होत असतो. त्यासाठी बाजाराची कार्यपद्धती समजून घेणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सीडीएसएलचे वरिष्ठ अधिकारी चंद्रशेखर ठाकूर यांनी केले.
येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या विद्यमाने व सीडीएसएलच्या सौजन्याने येथील ना. बं. वाचनालयाच्या सभागृहात आयोजित ‘श.. शेअर बाजाराचा’ या कार्यक्रमात ‘स्लाईड शो’ च्या माध्यमातून ठाकूर यांनी शेअर बाजारातील किचकट बाबी समजावून सांगितल्या. स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक अशोक गुजर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी सुभाषचंद्र ठाकूर, रमेश कांकरिया, संजय जकातदार, विकास कुलकर्णी, दिलीप चित्रे, वसंत पांडे, दिलीप चेन्नई, मधुकर शिंदे उपस्थित होते.
शाखा प्रबंधकांनी चाळीसगाव स्टेट बँकेच्या शाखेत ‘डिमॅट अकाऊंट’ लवकरच सुरू करण्यात येत असून खातेदारांच्या जागृतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. बाजाराबद्दल जेवढे कुतूहल असते तेवढीच धास्ती सुद्धा असते. या व्याख्यानानंतर धास्ती दूर होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सूत्रसंचालन दीपक जोशी यांनी केले. समारोप संतोष काळे यांनी केला. बँकेचे कर्मचारी प्रताप पाटील यांनी अपंगत्वावर मात करून अविरत २५ वर्षे सेवा केली म्हणून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहून ठाकूर यांनी शेअर बाजाराशी संबंधित एक दिवसाची कार्यशाळा चाळीसगाव येथे घेण्याचे अभिवन दिले. श्रोत्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे त्यांनी निरसनही केले. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, संस्थेमुळे माणूस मोठा नसून प्रामाणिक माणसांमुळे संस्था मोठी होते. यावेळी त्यांनी डिमॅट, ऑन लाईन ट्रेडींग, आय.पी.ओ. आदी संकल्पनांचेसुलभ विवेचन व विश्लेषण केले.