Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

दिल्लीत हिज्बुलचे दोन अतिरेकी पकडले
नवी दिल्ली, ७ ऑगस्ट/पीटीआय

 

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला किंवा त्या दिवशी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता सरकारने वर्तवली असतानाच दिल्ली पोलिसांनी आज हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून, राजधानीत दहशतवादी हल्ले करण्याचा त्यांचा कट होता, असे प्राथमिक जाबजबाबात उघड झाले आहे. या दोघांनीही पाकिस्तानात जाऊन हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीन याची भेट घेतली होती. त्या दोघांना आजच न्यायालयासमोर हजर केले असता १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
जावेद अहमद व अशिक अली अशी या दोन दहशतवाद्यांची नावे असून, त्यांना दिल्ली पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने रात्री अकरा वाजता मध्य दिल्लीतील दर्यागंज वसाहतीत अटक केली. अहमद व अली हे पांढऱ्या मोटारीत बसले होते. त्यांना महावीर वाटिका येथील पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी पकडले. ते या भागात आले असल्याची माहिती गुप्तचरांनी दिली होती, असे सह पोलीस आयुक्त पी.एन.आगरवाल यांनी सांगितले. त्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाली होती, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर पाळत ठेवली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी असा दावा केला की, या दहशतवाद्यांकडून दोन एके-४७ रायफली, दोन हातबॉम्ब, शंभर काडतुसे, तसेच काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेले दोघेही तिशीतील आहेत. तपासकर्त्यांनी अजून ते कुठल्या देशाचे आहेत याची शहानिशा केलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार ते भारतीय असावेत, असे मत पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. दिल्लीत कुठल्या ठिकाणांना ते लक्ष्य करणार होते, असे विचारले असता पोलिसांनी सांगितले की, आम्ही त्यांचे जाबजबाब घेत आहोत. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्ली, हैदराबाद व कोलकाता या तीन शहरांत लष्कर-ए-तय्यबा ही दहशतवादी संघटना हल्ले करणार असल्याची गुप्तचरांची माहिती असल्याचे जाहीर केले होते. स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर हे हल्ले करण्यात येणार असल्याचीही माहिती मिळाली होती. दहशतवादी हल्ल्यांबाबत मिळालेल्या या माहितीनंतर दिल्ली पोलिसांनी गस्त वाढवली होती. शहरात लष्करी व निमलष्करी दले यांचे शेकडो जवान त्यासाठी तैनात करण्यात आले होते.