Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

पहिल्या महिला छायाचित्रकार होमी व्यारावाला यांचा
टाटांच्या ‘नॅनो’ ला ‘नो’!
बडोदा, ७ ऑगस्ट / पी.टी.आय.

 

भारतातील पहिल्या महिला छायाचित्रकार होमी व्यारावाला यांनी नॅनोचे बुकिंग रद्द करण्याचा निर्णय आज जाहीर केला. टाटा कंपनीने दिलेले वचन न पाळल्याच्या निषेधार्थ आपण ‘नॅनो’चे बुकिंग रद्द करत आहोत, असे ९६ वर्षीय व्यारावाला यांनी टाटा कंपनीला कळवले आहे. टाटा कंपनीने होमी व्यारावाला यांना पहिली नॅनो देण्याचे वचन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात व्यारावाला यांना पहिली नॅनो मिळालेली नाही. कंपनीने काल वडोदरा शहरात १६ नॅनो कारचे वितरण केले. यात व्यारावाला यांचे नाव कुठेही नव्हते. त्यामुळे त्या प्रचंड नाराज झाल्या होत्या. यापूर्वीही त्यांनी टाटा कंपनीला पहिली नॅनो न मिळाल्यास बुकिंग रद्द करण्याचा इशारा जाहीरपणे दिला होता.
टाटा कंपनीने ९ एप्रिल रोजी ९५ हजार रुपये अग्रीम राशी जमा करून दोन महिन्यात पहिली नॅनो देण्याचे आश्वासन मला दिले होते. माझे आयुष्य किती शिल्लक राहिले आहे मला माहीत नाही. प्रत्येक दिवशी नॅनोचे काय झाले, अशी विचारणा करून मी आता थकले आहे. कंपनीकडून मला कोणतेही ठोस व समाधानकारक उत्तर दिले जात नाही, असे व्यारावाला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.दरम्यान स्थानिक नॅनो वितरकाने या घटनेबाबत काहीही माहीत नसल्याचे स्पष्ट केले.