Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

निवडणुकीपूर्वी ‘बेगमी’ करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत!
नवी दिल्ली, ७ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

 

राज्यातील विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी गहू, तांदूळ, खाद्यतेल आणि डाळीसारख्या जीवनावश्यक वस्तू, दाभोळ प्रकल्पासाठी वाढीव गॅस आणि शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त खतांची ‘बेगमी’ करून राज्यातील जनतेला समाधानी करण्याच्या इराद्याने आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीची वारी केली. पण त्यांना स्वाइन फ्लूच्या मुद्यावरून पाठलाग करणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांना दिवसभर गुंगारा द्यावा लागला.
महाराष्ट्राला ७० हजार टन तांदूळ, ५० हजार टन गहू आणि ३.५ हजार टन तूर डाळ तसेच पाम तेलाचा अतिरिक्त पुरवठा करण्यात यावा, अशा मागणीसह चव्हाण यांनी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लेव्हीची तीस टक्के साखरही उपलब्ध व्हावी, अशीही मागणी त्यांनी पवार यांच्याकडे केल्याचे सांगण्यात आले. चव्हाण यांनी सध्या कृष्णा गोदावरी खोऱ्यातील गॅसच्या वादात अडकलेले पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांची भेट घेऊन दाभोळ प्रकल्पासाठी ८.५ एमएमएससीएमडी गॅस टप्प्या-टप्प्याने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. महाराष्ट्राला खतांचा अतिरिक्त पुरवठा करण्याविषयी चव्हाण यांनी केंद्रीय रसायन व खते सचिव अग्निहोत्री यांची भेट घेतली. त्यांनी केंद्रीय मंत्री कमलनाथ आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांचीही भेट घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद यांच्यासोबत त्यांनी राज्याच्या आरोग्य सचिव शर्वरी गोखले यांच्यासह स्वाइन फ्लूवर चर्चाही केली. स्वाइन फ्लूविषयी अजिबात बोलायचे नाही, या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ‘मार्गदर्शक तत्त्वां’चे पालन करावे लागल्याने स्वाइन फ्लूच्या चर्चेचा प्रसिद्धी माध्यमांना ‘संसर्ग’ होऊ न देताच ते रात्री मुंबईला रवाना झाले.