Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

स्वाइन फ्लूविषयी महाराष्ट्र शासन बेफिकीर होते
राज्यसभेत जावडेकरांचा आरोप
नवी दिल्ली, ७ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

 

स्वाइन फ्लूमुळे पुण्यात मृत्युमुखी पडलेल्या रिदा शेखच्या प्रकरणात दोन्ही बाजूंनी चुका झाल्याचे आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद यांच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचा दावा भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी केला. राज्यसभेत शून्यप्रहरादरम्यान हा मुद्दा उपस्थित करताना रिदा शेखचे निधन होण्यापूर्वी महाराष्ट्र शासन स्वाइन फ्लूविषयी पूर्णपणे बेफिकीर होते, असा आरोप जावडेकर यांनी केला.
रिदा शेख प्रथम जहांगीर इस्पितळात गेली. तिथून तिला स्व्ॉब टेस्टसाठी रुबी इस्पितळात पाठविण्यात आले. चाचणीत काहीही आढळले नसल्याचा अहवाल रुबीने दिल्यानंतर तिला इस्पितळातून रजा देण्यात आली. पण इस्पितळातून सुटी मिळाल्यानंतरही तिचा त्रास आणखीच वाढला. कारण तिची योग्य चाचणी झालेली नव्हती. त्यामुळे ती पुन्हा जहांगीर इस्पितळात आली. त्यानंतर तिची नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ वायरोलॉजीमध्ये चाचणी घेण्यात आली. त्यात तिला स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. पण तोपर्यंत उशीर झाला आणि रिदा मृत्युमुखी पडली. तिच्या पालकांनी पोलिसात गुन्ह्याची नोंद करताना हे नमूद केले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी चूक झाली हे आरोग्यमंत्र्यांचे म्हणणे खरे नाही. उलट ते जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
कदाचित आरोग्यमंत्री चूक करणाऱ्या इस्पितळाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असतील, असा टोला जावडेकर यांनी लगावला. पुण्यात स्वाइन फ्लूची ११४ प्रकरणे त्यात शंभराहून अधिक शाळकरी मुलांचा समावेश आहे. चौदा शाळा बंद आहेत आणि स्वाईन फ्लूच्या चाचणीसाठी रांगा लागल्या आहेत. शहरात एवढी घबराट पसरली आहे की एक लाख लोक मास्क घालून फिरत आहेत.