Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

अप्पर वर्धाचे पाणी पांढुर्णाला नेण्यास विरोध
मोर्शीत शिवसैनिकांची बसवर दगडफेक
मोर्शी, ७ ऑगस्ट / वार्ताहर

अप्पर वर्धा धरणाचे पाणी पांढुर्णाला वळविण्याच्या निर्णयाच्या विरोधात शिवसैनिकांनी शहरात मध्यप्रदेश आगाराच्या बसवर दगडफेक केली. यात बसच्या काचा फुटल्या. शिवसैनिकांनी बस पेटवून देण्याचा प्रयत्न केला. अप्पर वर्धा धरणाचे पाणी मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे पोहोचवण्यासाठी सुमारे ८५ कोटी रुपयांच्या ‘जल आवर्धन’ योजनेला केंद्र सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाने मंजुरी दिली असून महाराष्ट्र सरकारनेही या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे.

नव्या ठिकाणांवरून हल्ले करा
नक्षलवाद्यांना केंद्रीय समितीचे आदेश
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर, ७ ऑगस्ट

पक्षावरील बंदीनंतर केंद्र सरकार नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढय़ात निमलष्करी दलांना उतरवणार असल्याने प्रत्युत्तर देण्यासाठी अतिशय सज्ज राहा, लोकसंघटना बांधणीकडे तातडीने लक्ष द्या व लष्करी दले विखुरली जावीत यासाठी नव्या ठिकाणांवरून हल्ले करा, असे आदेश माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने देशभरातील नक्षलवाद्यांना एका पत्रकातून दिले आहेत. केंद्र सरकारने माओवादी व त्यांच्याशी संलग्नित सर्व संघटनांवर नुकतीच बंदी घातली आहे. या बंदीच्या पाश्र्वभूमीवर पंधरवडय़ापूर्वी छत्तीसगडमधील अबुजमाड परिसरात देशभरातील प्रमुख नक्षलवाद्यांचा समावेश असलेल्या केंद्रीय समितीची बैठक झाली.

लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न
मन्नानबेग मिर्झा

अपक्ष असतानासुद्धा आमदार संजय देशमुख यांनी शासनाकडून कोटय़वधी रुपयांचा निधी खेचून आणून दिग्रस विधानसभा मतदारसंघात विकासाची कामे केली. या मतदारसंघात १९९९ व २००४ या दोन्ही निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. शेतकरी असो की जनसामान्य माणूस असो त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यात आमदार संजय देशमुख नेहमीच प्रयत्नशील असतात. आमदार देशमुखांचा जनसंपर्कही दांडगा आहे. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची फळी निर्माण केल्याने अनेक विकासाची कामे आमदार देशमुखांनी मार्गी लावली. रस्ते, सिंचन, पाणीपुरवठा, शिक्षणाच्या सोयींकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.

‘साहित्याने उपेक्षितांचे आकाश व्हावे’.. प्रश्न. डॉ. वासुदेव डहाके
प्रश्न. अजय चिकाटे

सामाजिक चळवळीतील एक प्रश्नमाणिक कार्यकर्ता, वक्ता, प्रश्नध्यापक, वैचारिक लेखक समीक्षक अशा अनेक नात्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक वर्तुळात प्रश्न.डॉ. वासुदेव डहाके यांचे नाव परिचित आहे. त्यांच्या षष्टय़ब्दीपूर्ती निमित्ताने ८ ऑगस्टला त्यांचा सत्कार सोहोळा आयोजित करण्यात आला आहे, त्यानिमित्ताने त्यांची ही विशेष मुलाखत.. कौटुंबिक पाश्र्वभूमीसंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतानाडॉ. डहाके म्हणाले, माझी जन्मतारीख व वर्ष नेमके कोणते हे मला ठाऊक नाही.

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना नवसंजीवनी
नळ पुन्हा सुरू होणार
भंडारा, ७ ऑगस्ट / वार्ताहर

बंद पडलेल्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी ‘जीवन संजीवनी’ प्रकल्प राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील थकित वीज देयकांच्या अदायगीअभावी बंद पडलेल्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना, पुन्हा चालू व्हाव्यात याकरिता शासनाने, महाराष्ट्र शासनाचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि ऊर्जा विभागाच्या समन्वयाने ‘जीवन संजीवनी’ नावाची योजना आखली आहे. या योजनेनुसार ज्या ग्रामपंचायती या योजनेमध्ये सहभागी होतील, त्या ग्रामपंचायतींना थकित मुद्दल रकमेपैकी ५० टक्के रक्कम महावितरण कंपनीला भरावी लागेल.

गोंदियात उद्या ‘आयटक’ची पेंशन अधिकार परिषद
गोंदिया, ७ ऑगस्ट / वार्ताहर

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक)च्या वतीने ९ ऑगस्टला दुपारी १२ वाजता कामगार भवनात रामनगर येथे ‘पेंशन’ अधिकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेला महाराष्ट्र आयटकचे सरचिटणीस सुकुमार दामले, सचिव शिवकुमार गणवीर मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आयटकचे अध्यक्ष हौसलाल रहांगडाले राहणार आहेत. या कार्यक्रमात पेंशनच्या मागणीला घेऊन लढा देणाऱ्या विविध कामगार संघटनाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यात अंगणवाडी-बालवाडी, ग्रामपंचायत कर्मचारी, घरेलू कामगार (मोलकरीण) बिडी कामगार, शेतमजूर अंशकालीन स्त्री परिचर व हमाल व विद्युत कर्मचारी शामील होणार आहेत. या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन रामचंद्र पाटील, शेखर कनोजिया, देवाजी वासनिक, करुणा गणवीर, नंदा पारवे, शालू भोयर, यशोदा रावत, भैयालाल शहारे, प्रल्हाद उके, यादोराव टेंभरे व भागीरथ नेवारे यांनी केले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्व सामान्यांनाही मिळावा -मिश्रा
वर्धा, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

आधुनिक तंत्रज्ञान मर्यादित लोकांपुरतेच न राहता त्याचा लाभ सर्वसामान्यांनाही मिळावा, असे मत दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकश मिश्रा यंनी व्यक्त केले. सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व देवळी गायनॉकोलॉजी सोसायटीतर्फे प्रसूतीशास्त्रावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. मिश्रा बोलत होते. याप्रसंगी बोलताना विद्यापीठाचे कुलपती खासदार दत्ता मेघे हे म्हणाले की, निरोगी जीवन जगायला मिळणे हा प्रत्येक मनुष्याचा निसर्गदत्त अधिकार आहे. म्हणून या संस्थेतील प्रत्येक सेवेचा लाभ समाजाच्या सर्वस्तरावर पोहचविण्याचे प्रयत्न प्रत्येक कर्मचाऱ्याने करावे. संस्थेचे समन्वयक डॉ. एस.एस. पटेल, अधिष्ठाता डॉ. व्ही.के. देशपांडे, गायनॉकोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष डॉ. नरेंद्र मल्होत्रा (आग्रा), स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. कमल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत डॉ. मल्होत्रा, डॉ. प्रणय शहा, डॉ. मानसी परेख (मुंबई), डॉ. प्रणय शहा (अहमदाबाद), डॉ. दिलीप गोडे यांनी विविध शस्त्रक्रियांची प्रश्नत्यक्षिकांसह माहिती दिली. संचालन डॉ. सौमित्रा इनामदार, डॉ. नीना आचार्य, डॉ. मीना खत्री यांनी केले.

आनंद लिमये यांचा चंद्रपुरात सत्कार
चंद्रपूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

प्रश्नमाणिकपणे कार्य केल्यास जीवनात यशस्वी होतो. म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माणुसकीची भावना ठेवून प्रश्नमाणिकपणे कामे करावी, असे प्रतिपादन नागपूर विभागाचे आयुक्त आनंद लिमये यांनी केले. बचत साफल्य भवनात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल व विकास शाखेतर्फे आनंद लिमये यांना निरोप देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आनंद लिमये यांची बदली पुणे येथे महाऊर्जाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून झाली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी एन.बी. वटी, राजस्व महिला मंचच्या अध्यक्ष मिताली लिमये, कार्यकारी अभियंता संगीता जयस्वाल आदी उपस्थित होते. यावेळी काळभोर यांनी आनंद लिमये यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला, तर राजस्व महिला मंचतर्फे मिताली लिमये यांचा सत्कार सचिता भुसारी, अर्चना काळे, वंदना सौरंगपते यांनी केला. महसूल कर्मचारी संघटनेचे मंगेश क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी एस.के. जाधव, दिलीप कुळकर्णी, खंडविकास अधिकारी माटे, उमेश काळे, मिताली लिमये यांचीही भाषणे झाली. प्रश्नस्ताविक उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी यांनी केले. आभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी खामनकर यांनी मानले.

शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी
चंद्रपूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

गेल्या वीस दिवसांपासून पाऊस नाही. आजवरची सारी नक्षत्रे कोरडी गेलेली आहेत. धान, सोयाबीन कापूस व इतर पिके पूर्णत: करपलेली असून शेतकरी बांधवांना दुबार पेरणीची चिंता भेडसावू लागलेली आहे. अशा अडचणीच्या स्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखे मार्ग अनुसरू नये यासाठी शासनाने चंद्रपूर जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा व पुढील अनर्थ टाळावा, अशी मागणी रिपाइंचे वरिष्ठ नेते व्ही.डी. मेश्राम यांनी केली आहे. मेश्राम यांनी पत्रकात म्हटले आहे की, शासकीय यंत्रणेच्या हालचाली दुष्काळसदृश्य यासंदर्भात असल्याचे कळते परंतु, वस्तुस्थिती वेगळी असून कास्तकारांनाच नाही तर सर्वाना भयावह अशा अवर्षणाला तोंड द्यावे लागत आहे. नद्या, नाले, तलाव ओस पडलेली आहेत, विहिरींच्या पाण्याची पातळी खाली गेलेली आहे, पाण्याचे भयानक दुर्भिक्ष जाणवू लागलेले आहे. जनावरांना चारा नाही, पाणी नाही तसेच पावसाच्या अभावामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आवासून उभा आहे. ही सर्व भयावह स्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने चंद्रपूर जिल्हा विनाविलंब दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा व कास्तकार बांधवांना तातडीने मदतीचा हात द्यावा, असे व्ही.डी. मेश्राम यांनी म्हटले आहे.

पंचायत समितीच्या विशेष पथकाची कारवाई
मेहकर, ७ ऑगस्ट / वार्ताहर

लोणार तालुक्यातील आरडव गावात पंचायत समितीच्या पथकाने उघडय़ावर शौचास करणाऱ्या आठ जणांवर दंडात्मक कारवाई केली. मेहकर तालुक्यात मात्र असे पथक केव्हा सक्रिय होणार, असा सवाल पर्यावरणवाद्यांना पडला आहे. ‘सुजल महाराष्ट्र निर्मल महाराष्ट्र’ अभियानांतर्गत संपूर्ण गावातील प्रत्येक घरी शौचालय बांधावे, अशी मोहीम हाती घेतली आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना शौचालय असल्याचे प्रमाणपत्र नसल्यास पगार देण्यास मनाई करण्यात येत आहे. याचा चांगला परिणाम जाणवत आहे. शेतकरी शेतमजुरांना पंचायत समितीमार्फत शासकीय अनुदानावर शौचालय बांधण्याची सुविधा दिली गेली असली तरी अनेक गावात शौचालयांची निर्मिती होऊ शकली नाही. अशा ठिकाणी आता अधिकारी कायद्याच्या वाडगा उभारत आहेत. याचा प्रत्यय लोणार पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी अरविंद गुडधे यांनी आरडवच्या गावाकऱ्यांना दिला. त्यांनी तालुका पातळीवर ‘गुड मॉर्निग’ पथकाची नियुक्ती केली. या पथकाने आरडव या गावी सकाळी ६ वाजता अचानक भेट दिली असता उघडय़ावर शौचास करताना ८ जण आढळले. त्यांना प्रत्येकी १०० रुपये दंड ठोठोवून आठ दिवसात घरी शौचालय न बांधल्यास पुढील कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

कुहीत स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर
कुही, ७ ऑगस्ट / वार्ताहर

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर नुकतेच झाले. प्रश्नस्ताविक संस्थेचे प्रश्नचार्य सी.के. तिवारी यांनी केले. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायात पडावे. कारण एखाद्याने स्वत:चा उद्योग सुरू केला तर त्याला स्वयंरोजगाराची संधी प्रश्नप्त होतेच. याखेरीज त्याचा उद्योग व्यवसाय सुव्यवस्थित चालू झाला तर इतर ४-५ व्यक्तींना रोजंदारीची संधी निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी नंदनवार यांनी सांगितले की, प्रत्येक क्षेत्रात प्रतिस्पर्धी आहे. प्रतिस्पर्धेमध्ये टिकावयाचे असेल तर कौशल्याचा वापर स्वयंरोजगाराकरिता करावा, असे आवाहन प्रशिक्षणार्थी यांना केले. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक नेवल यांनी उद्योग सुरू करण्याच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध स्वयंरोजगार योजनेविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ए.एम. इंगळे यांनी केले. आभार पी.एम. गेडाम यांनी मानले.

‘अभियांत्रिकी’च्या विद्यार्थ्यांनी सोडला वृक्षारोपणाचा संकल्प
वर्धा, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘वृक्षारोपण’ एक सामाजिक उपक्रम म्हणून सर्वत्र राबविण्याचा संकल्प सोडला. महाविद्यालयात ‘बायोडिझेल’ या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना नागपूरचे पर्यावरणतज्ज्ञ प्रश्न.डॉ. जीवन दोंतुलवार यांनी ‘बायोडिझेल’चे भविष्यातील महत्त्व, निर्मिती प्रक्रिया, पर्यावरण याबाबत माहिती देऊन निंब, करंज अशा वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन केले. पर्यावरणासाठी अर्थसंकल्पात अल्प तरतूद म्हणजे याकडे अद्याप गांभिर्याने बघितल्या जात नसल्याचे चिन्ह होय, असे मत प्रश्न.डॉ. सचिन मांडवगडे यांनी व्यक्त केले. संस्थाध्यक्ष शंकर प्रसाद अग्निहोत्री यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण जिव्हाळ्याची एक बाब म्हणून अभ्यासण्याचा सल्ला दिला. प्रश्नचार्य डॉ. भालचंद्र गोगटे व व्हीएनआयटीचे प्रश्न.डॉ. मांडवगडे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. शोधप्रबंधासाठी पुरस्कार प्रश्नप्त करणारे विनिता राऊत, प्रियंका इनानी, स्नेहा श्रुती, निशा कोटवाणी व मृण्मय गाडबैल यांचा सचिव सचिन अग्निहोत्री यांच्या हस्ते रोख पुरस्कार देऊन यावेळी गौरव करण्यात आला.

तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात लुबाडणूक
साकोली, ७ ऑगस्ट / वार्ताहर

तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात मोठय़ा प्रमाणात लुबाडणूक करण्याचे प्रकार घडत असल्याचा शेतकरी व विद्यार्थ्यांचा आरोप आहे. राज्य शासनाने जाती प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र व क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्याचे व नूतनीकरण करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना दिले असले तरी उत्पन्न व हलफनाम्यावर स्वाक्षऱ्याचे अधिकार तहसीलदार तसेच नायब तहसीलदारांना दिले आहेत. मात्र, जुन्या नियमबाह्य़ हलफनाम्याच्या शिक्क्यांचा वापर करून मोठय़ा प्रमाणात लुबाडणूक करण्याचे प्रकार तहसील कार्यालयात सुरू आहेत. शालेय व महाविद्यालयीन उत्पन्न दाखल्याची प्रवेश व शिष्यवृत्ती अर्ज भरताना आवश्यकता मोठय़ा प्रमाणात आहे. राज्य शासनाने उत्पन्न व हलफनामे सेतू केंद्रात सादर करण्याचे निर्देश आहेत. सेतू केंद्रात प्रती प्रमाणपत्र १२ रुपयांप्रमाणे दर आकारले जातात. मात्र, सेतू केंद्रात जात प्रमाणपत्र अधिवास, क्रिमिलेअर, उत्पन्न व हलफनामे तयार करण्यासाठी गर्दी वाढल्याने आठवडा लोटूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थी हताश झाले आहेत. शासनाकडून दुष्काळग्रस्त निधीचे वाटप सुरू असून
सर्व प्रमाणपत्रांसाठी सेतू राज्य शासनाने अनिवार्य केले असताना तहसील कार्यालयात नियमबाह्य़ जुन्या हलफनामा शिक्क्यांचा वापर करून सेतूला बगल देऊन शेतकरी व विद्यार्थ्यांची सर्रास लूट सुरू असल्याची तक्रार आहे.

अकोला जनता बँकेच्या अध्यक्षपदी रमाकांत खेतान
अकोला, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

अकोला जनता को-ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी रमाकांत खेतान यांची तर उपाध्यक्षपदी भीमराव धोत्रे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या मुख्य कार्यालयात गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी रमाकांत खेतान यांची तर उपाध्यक्षपदी भीमराव धोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेचे मावळते अध्यक्ष साकरचंद शाह यांची नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांचे स्वागत केले. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आर.एम. शर्मा यांनीही खेतान व धोत्रे यांचे स्वागत केले.

पीककर्ज वाटप आढावा बैठक
बुलढाणा, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त म्हणजे १३१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक नवीन सभासदांना पीककर्ज वाटप करू शकत नाही. नवीन पीककर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका तसेच ग्रामीण बँकांकडे पीककर्जाची मागणी करावी. या बँकांनी नवीन शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी नुकतेच दिले. खरीप पीककर्ज वाटपाबाबत जिल्ह्य़ातील सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक, व्यवस्थापक यांची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पीककर्जाबाबत आढावा घेतला.

हलबांच्या समस्येवर मंत्री समितीला साकडे
भंडारा, ७ ऑगस्ट / वार्ताहर

महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या जात पडताळणी मंत्री समितीचे प्रमुख नारायण राणे यांच्याशी भारतीय हलबा महापंचायतचे अध्यक्ष धनंजय दलाल यांनी नुकतीच चर्चा केली. जात पडताळणीच्या नावावर कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला नोकरीतून काढू नये किंवा त्यांचे पदावतरण करू नये, अशी मागणी दलाल यांनी यावेळी केली. १५ जून १९९५ नंतर नोकरीत लागलेल्या कर्मचारी, अधिकारी यांना जात पडताळणीच्या कारणावरून नोकरीतून काढण्यात आले आहे. त्यांची सेवाज्येष्ठता कायम ठेवून त्यांना पूर्ववत पदावर घ्यावे, जात पडताळणी अधिनियम २००१ हा कायदा ज्या दिवसापासून लागू करण्यात आला त्यापूर्वीच्या जातप्रमाणपत्रांना तो लागू करू नये, कायद्यातील पूर्वलक्षी प्रभावाचे कलम दुरुस्त करण्यात यावे, शिवाय ज्यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले, त्यांच्यावर पोलीस कार्यवाही फौजदारी गुन्हे दाखल करणे, कोर्टकेसेस इ. बाबी न करता त्यांना सेवासंरक्षण द्यावे, आदी मागण्याही त्यांनी केल्या. या चर्चेत धनंजय धार्मिक, आर. मुगम, आर.एम. घटाळे, बंडू खडगी, डी.एन. ढोमणे, विजय पखोले, रूपचंद मौदेकर, पुंडलिक नंदुरकर, श्रावण भानारकर, प्रश्न. विश्वनाथ आसई, प्रश्न. शंकर बोरीकर, क्रिष्णा घरडे, रामदास टाकळीकर सहभागी झाले.

महर्षी विद्या मंदिरात पर्यावरणरक्षणाचे धडे
भंडारा, ७ ऑगस्ट / वार्ताहर

रेल्वेच्या नोकरीनिमित्त ठिकठिकाणी होणाऱ्या वास्तव्यात वनराई करणारे नरेश शर्मा (८२) यांनी बेला येथील महर्षी विद्या मंदिर व कनिष्ठ महविद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांना पर्यावरण रक्षणाचे पाठ विविध उदाहरणे व प्रश्नत्यक्षिकांद्वारे दिले. नरेश शर्मा येथील ‘सिव्हील फोरम फॉर प्रिव्हेंशन ऑफ एनव्हारमेंटल पोल्यूशन थ्रू प्लॉन्टस’ या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र गुप्ते, सचिव विनायक वंजारी उपस्थित होते. ग्लोबल वार्मिगची भीषणता आणि प्रत्येकाचे कर्तव्य यावर नरेश शर्मा यांनी मार्गदर्शन केले. २००४ चे नोबल पीस प्रश्नईस व इंदिरा गांधी अवार्ड मिळविणाऱ्या वंगारी मुटा मॅथ्यू या केनिया येथील प्रश्नध्यापिकेने तीन कोटी झाडे लावून केलेली पर्यावरण सेवा, शिक्षिकांना आदर्श आहे, असे ते म्हणाले. शिक्षिका, प्रश्नचार्य व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांनी चर्चा घडवून आणली. राधेय मंत्री, निखिल शेंडे, आसावरी उपाध्याय, अक्षय अग्रवाल, विपुल देशमुख, गायत्री पेटकर, वंदना लुटे, पद्मजा गंगने, ज्योती राजदे, प्रेरणा नागदेवे, दीपाली ईश्वरकर यांनी भाग घेतला. याप्रसंगी नरेश शर्मा यांनी निसर्ग अभ्यासविषयक लेखसंग्रहाचा एक ग्रंथ प्रश्नचार्य श्रुती ओहळे यांना विद्यालयाकरिता भेट म्हणून प्रदान केला.

चंद्रपुरात उद्या महिला मेळावा
चंद्रपूर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

गिरिजा प्रतिष्ठान आणि महिला राजसत्ता आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्टला चिंचाळा, नागाळा परिसरातील महिलांचा मेळावा, गुणवंत विद्यार्थी व ग्रामीण महिला कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. घुग्घुस मार्गावरील एमआयडीसी असोसिएशनच्या सभागृहात आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन गिरीजा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्यां सौ. वंदना हस्ते यांच्या हस्ते होणार आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच देवराव आत्राम राहतील. प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रभू राजगडकर हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती विजय बलकी, एमआयडीसी असो.चे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा, प्रश्न.डॉ. पद्मा पंडे, विदर्भ विकास मंचचे राजेश पिंजरकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष महिला राजसत्ता आंदोलनाच्या जिल्हा संघटिका मालती सगने आहेत. या कार्यक्रमात ग्रामीण भागातील महिला व दहावी, बारावीत प्रश्नणिव्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. या कार्यक्रमाला लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पुष्पा लहामगे, भारती मेश्राम, प्रमिला दुरुगकर, प्रश्न. प्रमोद शंभरकर यांनी केले आहे.

जकातच्या विरोधात उद्यापासून व्यापार बंद
अकोला, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

जकात कराच्या विरोधात ९ ऑगस्टपासून व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने घेण्यात आला असून १५ ऑगस्टला मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे. जकात कर रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य व्यापारी संघाच्या नेतृत्वाखाली ९ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात आंदोलन केले जाणार आहे. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. ९ ऑगस्टपासून व्यापार बंद ठेवणे, काळ्या फिती लावून जकात कराचा निषेध करणे, असे या आंदोलनाचे स्वरूप आहे. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना करण्यात आले. अध्यक्ष अशोक जळमिया, अशोक गुप्ता, गोपाल खंडेलवाल, कमलेश वोरा, रमेश कोठारी, निकेश गुप्ता, कासमभाई डोडिया आदी यावेळी उपस्थित होते.