Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

अप्पर वर्धाचे पाणी पांढुर्णाला नेण्यास विरोध
मोर्शीत शिवसैनिकांची बसवर दगडफेक
मोर्शी, ७ ऑगस्ट / वार्ताहर

अप्पर वर्धा धरणाचे पाणी पांढुर्णाला वळविण्याच्या निर्णयाच्या विरोधात शिवसैनिकांनी शहरात मध्यप्रदेश आगाराच्या बसवर दगडफेक केली. यात बसच्या काचा फुटल्या. शिवसैनिकांनी बस

 

पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
अप्पर वर्धा धरणाचे पाणी मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे पोहोचवण्यासाठी सुमारे ८५ कोटी रुपयांच्या ‘जल आवर्धन’ योजनेला केंद्र सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाने मंजुरी दिली असून महाराष्ट्र सरकारनेही या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. एकीकडे अमरावती जिल्ह्य़ात सिंचनाचा अनुशेष असताना लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याने मोठा वाद उफाळून आला आहे.
पांढुर्णा-मोर्शी-छिंदवाडा (क्र. एमपी२८ए ३१३३) ही बस प्रवासी घेऊन पांढुर्णाकडे जात असताना शिवसैनिकांनी जयस्तंभ चौकात अडवली. सर्व प्रवाशांना खाली उतरविले. बसला आग लावण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीमुळे बसचे नुकसान झाले आहे.
बसचालक गजानन मिलापपुरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख डॉ. अनिल बोंडे, पालिकेचे माजी उपाध्यक्ष आप्पा गेडाम, पांडव, दिगांबर डाहाके, किशोर गांगडे, अनिल बाहेकर, प्रमोद कानफाडेसह २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. वृत्त लिहिपर्यंत आरोपींना अटक व्हायची होती. डॉ. बोंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क कला असता, ‘प्रश्नण गेले तरी बेहत्तर पण पाण्याचा एक थेंबही मध्यप्रदेशात जाऊ देणार नाही’, असे सांगून केंद्रीय मंत्री कमलनाथ व राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा निषेध केला.
अप्पर वर्धा धरणाची उभारणी अमरावती जिल्ह्य़ाची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी करण्यात आली होती. सिंचनाचा प्र्ना अजूनही सुटलेला नाही. विदर्भाला आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्राने लुटले आणि आता ते कमी पडले की काय, महाराष्ट्राचे राज्यकर्ते विदर्भाचे पाणी मध्य प्रदेशाला देण्यासाठी आसुसलेले आहेत. विदर्भातील जनतेला लुबाडण्याचा हा प्रकार असून या योजनेला राज्य शासनाने गती दिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे डॉ. बोंडे यांनी सांगितले.