Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न
मन्नानबेग मिर्झा

अपक्ष असतानासुद्धा आमदार संजय देशमुख यांनी शासनाकडून कोटय़वधी रुपयांचा निधी खेचून आणून दिग्रस विधानसभा मतदारसंघात विकासाची कामे केली. या मतदारसंघात १९९९ व २००४ या दोन्ही निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. शेतकरी असो की जनसामान्य माणूस असो त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यात आमदार संजय देशमुख नेहमीच प्रयत्नशील असतात. आमदार देशमुखांचा जनसंपर्कही दांडगा आहे. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची फळी निर्माण केल्याने अनेक विकासाची कामे आमदार देशमुखांनी मार्गी लावली. रस्ते, सिंचन, पाणीपुरवठा, शिक्षणाच्या सोयींकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.

 

दिग्रस येथे ३ कोटी ४० लाखांची कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना भवानी टेकडीवर मंजूर करून आणण्यात त्यांना यश मिळाले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी १० कोटी रुपयांची शैक्षणिक इमारत, धावंडा नदीमुळे बाधीत झालेल्या ९५७ लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न त्यांच्या पुढाकाराने निकालात निघाला. एवढेच नव्हे तर धावंडा नदीवरील दोन्ही पूल उंच करण्यासाठी २२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मतदारसंघातील विकासाची कामे करून घेण्यासाठी १७ कोटीची तरतूद शासनाने केली आहे. आर्णी व दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले. इमारतींची कामे पूर्ण झाली आहे.
३० हजार हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि तीनशे कोटी रुपये खर्चाच्या अरुणावती प्रकल्प पूण करण्यासाठी आमदार देशमुखांनी पाठपुरावा केला. आर्णी पंचायत समिती, तहसील कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षणकेंद्र, ग्रामीण रुग्णालय या चारही इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून सिंगद येथे १०० घरकुलांची योजना पूर्ण झाली. रस्ते, जवाहर व्याप्ती योजनेंतर्गत विहिरी, इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल अशा महत्त्वाच्या योजनासुद्धा आमदार देशमुखांच्या प्रयत्नाने मार्गी लागल्या आहेत. संजय देशमुख यांनी क्रीडा व खनिकर्म राज्यमंत्री म्हणून काम सांभाळले. आर्णी पालिका व्हावी म्हणूनही आमदार देशमुखांनी पाठपुरावा केला.
दिग्रस विधानसभा मतदारसंघातून आर्णी तालुका वगळण्यात आला असून दिग्रसला आता दारव्हा व नेर परिसर जोडण्यात आला आहे. नवीन पुनर्रचनेत दिग्रस-दारव्हा-नेर असा मतदारसंघ अस्तित्वात आल्याने आमदार संजय देशमुख यांनी या भागात सुद्धा जनसंपर्क वाढवला आहे. शिक्षणाच्या दृष्टीने आमदार देशमुख यांनी सैनिक शाळा, फार्मसी कॉलेज, बी.एड., बी.पी.एड., बी.एस्सी. कॉलेज, डी.एड. कॉलेज अशा महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था या भागात आणल्याने मुलांना शैक्षणिक सोय उपलब्ध झाली आहे. जात-धर्म यांचा विचार न करता आमदार देशमुख आपल्या कार्यामुळे विकासाचा ठसा उमटविण्यात यशस्वी ठरले आहे.
मार्गी लागलेली कामे
दिग्रस व आर्णी मुख्य रस्त्याचे दुतर्फी काम.
क्रीडा संकुल आर्णी.
पाणीपुरवठा योजना दिग्रस.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक इमारत.
धावंडा नदीवरील पुलांची उंची वाढविण्यासंबंधी जमीन खरेदी.
तहसील कार्यालय आर्णी.
पंचायत समिती आर्णी.
औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आर्णी.
अपूर्ण राहिलेली कामे -
आर्णी येथील न्यायालयाची इमारत.
पुनर्वसनाचा प्रश्न.
कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना.
मतदारसंघातील प्रमुख प्रश्न -
पाणीपुरवठा
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन
पुन्हा निवडून आल्यास -
दिग्रस-दारव्हा-नेरचा औद्योगिक विकास
तालुक्यातील संपूर्ण रस्ते मुख्य रस्त्याशी जोडण्याचे काम.