Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना नवसंजीवनी
नळ पुन्हा सुरू होणार
भंडारा, ७ ऑगस्ट / वार्ताहर

बंद पडलेल्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी ‘जीवन संजीवनी’ प्रकल्प राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील थकित वीज देयकांच्या अदायगीअभावी बंद पडलेल्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना, पुन्हा चालू व्हाव्यात याकरिता शासनाने, महाराष्ट्र शासनाचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

 

आणि ऊर्जा विभागाच्या समन्वयाने ‘जीवन संजीवनी’ नावाची योजना आखली आहे.
या योजनेनुसार ज्या ग्रामपंचायती या योजनेमध्ये सहभागी होतील, त्या ग्रामपंचायतींना थकित मुद्दल रकमेपैकी ५० टक्के रक्कम महावितरण कंपनीला भरावी लागेल. उर्वरित ५० टक्के रक्कम पुढील सहा महिन्यांत हप्ते पाडून भरण्याची यात तरतुदी आहे. पूर्ण मुद्दल रकम भरून झाल्यानंतर ग्रामपंचायतीला संपूर्ण व्याजमाफीचा लाभ मिळेल. व्याजाच्या एकूण रकमेपैकी २५ टक्के रक्कम शासनाचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग करेल. उर्वरित ७५ टक्के व्याजाची रक्कम महावितरण कंपनीकडून माफ करण्यात येईल. संपूर्ण व्याज माफीचा लाभ संबंधित ग्रामपंचायतीला यामुळे मिळणार आहे.
या योजनेचा लाभ ग्रामपंचायती सोबत, जिल्हा परिषद, जीवन प्रश्नधीकरण अशा ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांच्या संबंधित संस्थांनाही घेता येईल. त्यांना थकित वीज बिलाच्या मुद्दल रकमेपैकी ५० टक्के रक्कम एकरकमी भरावी लागेल.
संबंधित संस्थेला ही मूळ रक्कम स्वत:च्या उत्पन्नातून किंवा १२व्या वित्त आयोगाच्या उपलब्ध होणाऱ्या निधीमधून ३१ ऑक्टोबर २००९ पर्यंत भरता येईल. या योजनेमध्ये भाग घेण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर ठेवण्यात आली आहे. ५० टक्के रक्कम भरल्यानंतर जे हप्ते पाडून मिळतील, ते नियमित भरण्यासोबतच चालू वीज देयके वेळेवर भरणे बंधनकारक राहील. ग्राहक संस्थांना तसा ठराव मंजूर करून तसे महावितरण कंपनीला हमीपत्र सादर करावे लागेल. या योजनेसंबंधी सविस्तर माहिती पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे उपलब्ध आहे.
या योजनेत सहभागी होण्याकरिता करायचे अर्ज पंचायत समितीत उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा संपूर्णपणे पंचायत राज संस्थांच्या क्षेत्रात आल्याने पंचायतराज संस्थांकडे अधिकाधिक जबाबदारी देण्याचा पुरोगामी निर्यण शासनाने घेतला. मात्र, थकित बिलांमुळे अनेक योजना बंद पडल्या, त्यावर शासनाने ‘जीवन संजीवनी’ योजना देऊन ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांना जीवन संजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे.