Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

ग्रंथालय कर्मचाऱ्याचे सोमवारी धरणे
बुलढाणा, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय आणि महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाच्यावतीने सोमवार, १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ५ या वेळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रंथालय सेवक वेतनश्रेणी व अनुदान वाढीसाठी धरणे धरणार असल्याची माहिती संघाचे कार्यवाह नेमीनाथ सातपुते

 

यांनी दिली.
महाराष्ट्रातील दहा हजारांवर शासनमान्य अनुदानित सार्वजनिक वाचनालयातील सुमारे १६ हजारांवर ग्रंथपाल व कर्मचाऱ्यांच्या वेतवाढीबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी डिसेंबर २००८ मध्ये आश्वासन दिले होते.
२६ मे २००९ मध्ये राज्य ग्रंथालय परिषदेच्या बैठकीतही त्यांनी तसेच आश्वासन पुन्हा दिले व ग्रंथालय चळवळीच्या अन्य प्रलंबित समस्याही एक महिन्याच्या आत सोडविण्याचे मान्य केले.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या शिष्टमंडळाने १५ जून २००९ रोजी निवेदन सादर केले. तेव्हा त्यांनी १५ दिवसांत ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी बैठक बोलावून चर्चा करू, असे मान्य केले.
परंतु, दिलेल्या आश्वासनांची अद्यापपर्यंत अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल संघ आणि महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथपाल कर्मचारी संघाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात १० ऑगस्ट २००९ या राष्ट्रीय ग्रंथपाल दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणे धरण्यात येणार असून या धरणे आंदोलनात बुलढाणा जिल्ह्य़ातील सर्व ग्रंथालय कार्यकर्ते आणि कर्मचारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बुलढाणा जिल्हा ग्रंथालय संघ आणि बुलढाणा जिल्हा कर्मचारी संघाच्यावतीने ग्रंथमित्र भास्कर देशपांडे, डॉ. जनार्दन फिरके, रामराव ढोरे, प्रश्न. किसन वाघ, पंजाब गायकवाड, नेमीनाथ सातपुते, बबन आखरे यांनी केले आहे.
चंद्रपुरात सोमवारी आंदोलन
चंद्रपूर - जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने सोमवारी येत्या १० ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते ५ या वेळात आंदोलन आयोजित केले आहे. धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष भरत पोटदुखे, कार्याध्यक्ष प्रश्नचार्य मदन धनकर, उपाध्यक्ष प्रश्न. मुकुंद उगे, प्रमुख कार्यवाह अनिल बोरगमवार यांनी केले आहे.