Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

चिंब चिंब भिजवण्यासाठी वरुणराजाला साकडे
प्रिय वरुणराजा,

वर्षा ऋतूला सुरुवात झाल्यापासून आम्ही तुझी चातकासारखी वाट बघत आहोत पण, तुझे रौद्ररूप काही अनुभवायला मिळाले नाही. गेल्या काही वर्षापासून तुझ्य़ात निर्माण झालेली अनियमितता तुझी नाराजी दर्शवून जात आहे. राजा, एवढे नाराज व्हायला झाले काय? असा प्रश्न आम्हा सर्वाना

 

पडला आहे. ऋतूच्या प्रश्नरंभी तू साधारणपणे सर्वत्र बरसला. चंद्रपरच्या सीमेवर असलेल्या गावांमध्येही तू हजेरी लावली. शहरावर तुझी अवकृपा कायम राहिली. कुठेही बरसेल पण, या शहरावर नाही अशी भूमिका तर तू घेतली नाही ना असा शंकायुक्त सूर आता उमटू लागला आहे. गेल्या वर्षी तू प्रश्नरंभी आला तेव्हा स्वत:सोबत आम्ल घेऊन आला अशी चर्चा सुरू झाली. आम्ही वाढवत नेलेल्या प्रदूषणाचे घटक तू स्वत:मध्ये मिसळवून घेतले नाहीत. उलट आमच्यावर त्याचा वर्षाव करून मोकळा झाला. आम्ही लगेच हाकाटी सुरू केली. आम्लाचा पाऊस पडला म्हणून ठिकठिकाणी चर्चा घडवून आणली. त्यामुळे नाराज होऊन तू यंदा बुट्टी तर मारायचे ठरवले नाही ना अशी शंका आता येऊ लागली आहे.
राजा, आता श्रावण सुरू झाला. खरे तर या मोसमात तुझ्य़ा तुरळक सरी अंगावर घेत, सूर्यासोबत चाललेला तुझा लपंडावाचा खेळ बघत जगण्याची आम्हाला खाशी सवय झालेली पण, यंदा तुझ्य़ा तुषारांची जागा अंगातल्या घामाने घेतली आहे. सूर्यासोबतच तुझा लपंडाव तर दिसेनासा झाला आहे. आज येशील, उद्या येशील म्हणून आम्ही आकाशाकडे डोळे लावून बघतो तर तुझे घनरूपच तेवढे दिसते. उलटपक्षी त्या रूपातून तू आम्हाला वाकुल्या तर दाखवत नाही ना असा भास सतत होत राहतो. काहीजण तर आता तू त्यात तरबेज झालाय असेही बोलू लागले आहेत. काहींना तर आकाशात तुझा सुरू असलेला घनरूप अवस्थेतला खेळ बघायची सवय झाली आहे. तुझ्या न येण्याला केवळ तूच जबाबदार आहे असेही आम्हाला म्हणायचे नाही. आम्हीही खूप अंशी कारणीभूत आहोत याची जाणीव आता सर्वाना होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षात आम्ही पर्यावरणाचा ऱ्हास कसा होईल यासाठी नेटाने कामाला लागलो. प्रदूषण वाढेल याची अजिबात चिंता केली नाही. हे शहर व त्याच्या आजूबाजूचा परिसर खनिज संपत्तीने समृद्ध आहे. त्याची जाणीव साऱ्यांना असल्याने प्रत्येकजण नवा उद्योग आणण्यात मग्न झाला आहे. यामुळे एकाच जिल्हय़ात किती उद्योग असावेत याचे भानही आम्हाला राहिले नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नही कुणी केला नाही. निसर्गाच्या चक्रातच बदल घडवून आणण्यात आम्ही केव्हा तरबेज झालो तेच आम्हाला समजले नाही. याचा राग तुला आला असणार आणि म्हणूनच तू न येण्याचा निर्णय घेतला असावा असे आता वाटू लागले आहे. काही तपापूर्वी हाच परिसर तुझ्य़ासाठी सर्वार्थाने अनुकूल होता. घनदाट जंगलावर, त्यात राहणाऱ्या प्रश्नणीमात्रांवर बरसणे तुला आवडायचे. रौद्र रूप दाखवताना तुला आसूरी आनंद व्हायचा. त्यामुळे आमची त्रेधातिरपट उडायची, तुझ्य़ा प्रकोपाने काहींना जीव गमवावा लागायचा, तेव्हा आम्हीच तुला राजा, आता थांब अशी आळवणी करायचो. कधी तू ऐकायचा तर कधी दुर्लक्ष करायचा. आता आळवणी तीच आहे पण, संदर्भ मात्र बदलला आहे. उद्योग हवे, खनिज हवे म्हणून आम्ही जंगले नष्ट केली. नद्याचे स्वरूप पार बिघडवून टाकले. नाले नाहीसे केले तर तलाव गिळंकृत केले. या साऱ्यातून तुझी खप्पामर्जी ओढवून घेतली. परिसराची एवढी वाईट अवस्था करूनही तू येत राहिलास तेव्हा आम्ही आणखी निर्ढावलो. कितीही चुका केल्या तरी तू नेमाने बरसत राहणार असे गृहीत धरून आम्ही आणखी चुका करत राहिलो. अखेर तू यावर्षी आम्हाला धडा शिकवायचे ठरवलेले दिसते. म्हणून आता एकेकजण काळजी व्यक्त करू लागला आहे. राजा, तू कट्टी घ्यायची ठरवली तरी आम्हाला तुझ्य़ाशी अबोला धरता येणार नाही. कारण तुझे नसणे हे आमचे अस्तित्व संपवणारे आहे. तुझ्य़ाशिवाय आमचे जगणे अर्थहीन आहे. तू आलाच नाहीस तर बळीराजाने काय करायचे, त्यांच्या मागे निमूटपणे जाणाऱ्या जनावरांनी काय करायचे, आम्ही प्यायचे तरी काय, नुसता कोक पिऊन जगण्याची ऐपत असणारे असे कितीजण असणार ? शेवटी आम्ही सारे तुझ्य़ावर अवलंबून आहोत. याची जाणीव जशी आम्हाला आहे तशी तुलाही असणार, मग एवढा राग कशासाठी धरतोस राजा, प्लीज एकदाचा येऊन जा! आता आम्हालाही आम्ही केलेल्या चुकांची उपरती होऊ लागली आहे. म्हणूनच तुला बरसण्यासाठी आवश्यक असलेल्या जंगलात खाण नको म्हणून आम्ही सारे एक झालो आहोत. आता आणखी उद्योग नको अशी भूमिका सर्वत्र रूजायला सुरुवात झाली आहे. कारण एका मोकळय़ा श्वासाची किंमत काय असते याची जाणीव आम्हाला झालेली आहे. सध्याच्या प्रदूषित वातावरणाने आणि कमालीच्या उकाडय़ाने आम्ही त्रस्त झालो आहोत. आपले शारीरिक स्वास्थ्य हरवून बसलो आहोत. अनेक व्याधींनी आम्हाला ग्रासले आहे. अशा बिकट अवस्थेत तूही पाठ फिरवतो म्हणशील, कर्मचाऱ्यांसारखा संपावर जातो म्हणशील तर आमच्या अस्तित्वाला ग्रहण लागेल. राजा, असे काही करू नको, भविष्यात तू नाराज होणार नाहीस याची काळजी आम्ही घेऊ, हे पोकळ आश्वासन नाही तर आंतरिक तळमळीतून उमटलेला हुंकार आहे. तू न आल्यामुळे अस्वस्थ झालेले चेहरे आता बघवत नाही रे! सारे तुझी वाट बघत आहेत. तुझे बरसणे अंगावर झेलण्यासाठी आतूर झाले आहेत. तू यावा म्हणून कुणी करूणा भाकत आहेत तर कुणी देवाला साकडे घालत आहे. ते काहीही असले तरी सर्वशक्तीमानरूपी तूच आहेच आणि तुझ्य़ातच देवत्वाचा वास आहे. तू तुटक स्वरूपात बरसला तरी अनेकांच्या चेहऱ्यावर उठणारे आनंदाचे तरंग आम्हाला आता आणखी बघायचे आहे. तेव्हा लवकर ये आणि चांगली झडी लाव, नाही तर उद्योग भरपूर पण, पावसाचा अनुशेष असा नवा शिक्का आमच्या पाठीवर बसेल. कोणत्याही अनुशेषाची आम्ही आता धास्तीच घेतली आहे रे! तेव्हा हा नवा संदर्भ आम्हाला चिकटवू नको. आमच्याकडून आजवर ज्या चुका झाल्या त्याबद्दल एकदाची माफी दे! शेवटी आम्हीही हाडामांसाचे बनले आहोत. चुकणे हा माणसाचा स्वभावधर्मच आहे, तेव्हा एकदा माफ कर आणि सर्वार्थाने बरसून आम्हाला चिंब भिजवून टाक राजा!
आडमुठेपणाचा कळस
लोहारामधील कोळसा खाणीच्या मुद्यावरून आंदोलन करणाऱ्या इको-प्रश्ने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या आश्वासनानंतर जो गोंधळ घातला तो खेदजनक व अनेक स्वयंसेवी संस्थांना नाराज करणारा आहे. या खाणीला विरोधाच्या मुद्यावर साऱ्या संघटना आपापसातले मतभेद विसरून एकत्र आल्या होत्या. त्यामुळे या आंदोलनाचे स्वरूप व्यापक झाले. अशावेळी सर्वाना पटेल अशीच भूमिका साऱ्यांनी घेणे अपेक्षित असते पण, उपोषण केवळ आम्ही करीत आहोत म्हणून या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी इतरांना वेठीस धरण्याचा जो प्रकार केला त्याने अनेकांची मने दुखावली आहेत. खाणीच्या मुद्यावर केंद्रीय मंत्र्यांनी थेट उपोषणकर्त्यांशी बोलणे, लेखी पत्र देणे ही महत्त्वाची घडामोड असतानासुद्धा पंतप्रधान बोलले पाहिजेत असा आग्रह धरणे अनाठायी व अप्रस्तुत होते पण, प्रसिद्धीची हवा डोक्यात गेलेल्या या आंदोलकांना हा आग्रह धरताना त्याचेही भान राहिले नाही. याच नादात त्यांनी केवळ आम्ही प्रश्नमाणिक, इतर सगळे बनावट अशी जी भाषा वापरली त्यामुळे अनेकांना धक्का बसला. कोणतेही आंदोलन करताना तारतम्य बाळगावे लागते. एकदा त्याकडे दुर्लक्ष झाले की गणिते बिघडतात. याची जाणीव या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात ते एकटे पडण्याची शक्यता जास्त आहे.
जाताजाता
ताडोबाजवळ कोळसा खाण नको या मुद्यावर सर्वाचे एकमत होत असताना जिल्हा परिषदेच्या एका पदाधिकाऱ्याला वेगळाच साक्षात्कार झाला. त्याने या खाणीच्या समर्थनार्थ एक पत्रक काढले. ते कुणीही प्रकाशित केले नाही तेव्हा सर्व माध्यमे पर्यावरणवाद्यांना विकली गेली आहे असे पत्र अदानी समूहाच्या कार्यालयात पाठवून हा पदाधिकारी मोकळा झाला. धंदेवाईक राजकारणाचा हा उत्तम नमुना आहे.
देवेंद्र गावंडे