Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

बुलढाणा ‘अर्बन’ च्या महिलांनी कारागृहात बांधल्या राख्या
बुलढाणा, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

बुलढाणा अर्बन संस्थेच्या महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा कारागृहातील बंदीबांधवांना राख्या बांधून रक्षाबंधन सोहोळा उत्साहात साजरा केला.
बंधू प्रेमाचा संदेश देणारा रक्षाबंधन सोहोळा बुलढाणा अर्बन संस्थेच्यावतीने दरवर्षी कारागृहातील बंदीजनांसाठी साजरा करण्यात येतो. बुलढाणा अर्बन संस्थेच्या स्थापनेपासूनच हा उपक्रम दरवर्षी

 

राबविण्यात येत असल्याने या सोहोळ्याला आगळेवेगळे महत्त्व आहे.
जिल्हा कारागृहात झालेल्या रक्षाबंधन सोहोळ्याला बुलढाणा अर्बनचे संचालक डॉ. सुकेश झंवर, जिल्ह कारागृह अधीक्षक प्रदीप पाथ्रीकर व देशपांडे उपस्थित होते.
प्रश्नरंभी संस्थेच्या वतीने संजय कस्तुरे यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देऊन द्वेषभावना नाहीशी करून परस्पर स्नेहभाव वाढविणाऱ्या रक्षाबंधनाचे महत्त्व विषद केले.
यावेळी डॉ. सुकेश झंवर यांनी रक्षाबंधनानिमित्त सर्व बंदी बांधवांना शुभेच्छा दिल्या.
आज रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असताना वाईट घटना टाळता येऊ शकतात. गतकाळातील वाईट गोष्टी व कटू आठवणी मागे टाकून बंदीबांधवांनी नव्या दमाने व नव्या जोमाने आयुष्याला प्रश्नरंभ करावा आणि आजच्या रक्षाबंधनाच्या सणाची हीच ओवाळणी टाकावी, असे आवाहन डॉ. झंवर यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा कारागृह अधीक्षक प्रदीप पाथ्रीकर यांनी बुलढाणा अर्बनच्या रक्षाबंधन उपक्रमाचे कौतुक करून संस्थेचा कारागृहातील बंदीसाठी कार्य करण्याचा नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन राहिला असल्याचे सांगितले.
कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या बंदींनी क्षणिक रागांमुळे व क्षणिक कारणांमुळे घडलेला हा गुन्हा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच येथून गेल्यानंतर बंदींनी समाजात ताठमानाने व सन्मानाचे जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा कारागृहातील २५० बंदीबांधवांना संस्थेच्या महिला कर्मचाऱ्यांनी राख्या बांधल्या तर कारागृहातील महिला बंदी भगिनींनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा केला. यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांनाही राख्या बांधण्यात आल्यात.
या कार्यक्रमासाठी नम्रता पाटील रिता चव्हाण, अरुण दलाल, संजय कस्तुरे, विजय गव्हाणे, सुधाकर मानवतकर, वाय.डी. बोर्डे, धनंजय ठाकरे, रवींद्र सपकाळ, मुकेश काळे, दीपक चव्हाण, वैशाली भोरसे, संध्या भोरकडे, अर्चना गोमासे, मनीषा सुरडकर, सीमा चव्हाण, संध्या काळे, कीर्ती काळे आदी उपस्थित होते.