Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

अंजनगावसुर्जीत लोकशाही दिनाला तिलांजली
अंजनगावसुर्जी, ६ ऑगस्ट / वार्ताहर

जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेऊन त्याची सोडवणूक तत्पर करण्यासाठी राज्य सरकारने महिन्याच्या पहिल्या सोमवारी ‘लोकशाही दिन’ कार्यक्रम राबवणे या संकल्पनेलाच अंजनगावसुर्जी येथे

 

तिलांजली देण्यात आली आहे.
१९ डिसेंबर ९९ च्या शासन आदेशानुसार तहसील कार्यालयात सर्व संबंधित शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांनी उपस्थित राहून पूर्ण आस्थेने व गांभीर्याने लोकशाही दिन राबवणे महत्त्वाचे असता सोमवारी ३ ऑगस्टला येथील तहसील कार्यालयात लोकशाही दिनासाठी कुणीच हजर नसल्याचे चित्र वृत्तप्रतिनिधींना तक्रार दाखल करण्यास आलेल्या कारला येथील चंद्रसेन वानखडे यांनी निदर्शनास आणून दिले.
शासन आदेशाची प्रत दाखवत त्यांनी आदेशानुसार लोकशाही दिनाचे फलक लावून टेबल लावणे गरजेचे असल्याचे सांगितले. ९ वाजतापासून तक्रारकर्त्यांना टोकण क्रमांक देणे, १० वाजता रितसर कामकाजास सुरुवात करून १२ वाजेपर्यंत संबंधित विभागाच्या तक्रारीची त्या, त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून निपटारा करून जनतेची कामे करणे हा या दिनाचा उद्देश असता यापैकी एकही बाब येथे उपलब्ध नसल्याचे दाखवून दिले. याच कारणाने लोक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. अनेकांच्या तक्रारी घेण्यासाठी येथे कोणी नसल्या कारणाने तक्रारकर्ते परत गेल्याचे वानखडे म्हणाले. लोकशाही दिन असता अधिकारी का नाहीत याचा मागोवा घेतला असता ३ ऑगस्टला आमदार भारसाकळे यांचा वाढदिवस असल्यामुळे अधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दर्यापूरला गेल्याचे कळले. अधिकाऱ्यांना जनतेच्या कामापेक्षा आमदारांचा वाढदिवस अधिक महत्त्वाचा वाटतो का, असा प्रश्न तक्रारकर्त्यांनी उपस्थित केला.