Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

भन्ते धम्मरत्न यांच्या हत्येचा निषेध, आज गडचिरोली बंद
गडचिरोली, ७ ऑगस्ट / वार्ताहर

कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथील भन्ते धम्मरत्न यांची हत्या करून पंचशील ध्वजाची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विविध आंबेडकरी संघटनांनी ८ ऑगस्टला

 

गडचिरोली बंद पाळण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेबद्दल पत्रकारांना माहिती देताना भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत यांनी सांगितले की, जांभूळखेडा गावाबाहेरील मोकळ्या जागेत भन्ते धम्मरत्न यांचे प्रेत एका पळसाच्या झाडाला फाशी लागलेल्या अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळून आले व प्रेताशेजारी लावलेल्या पंचशील ध्वजांवर रक्त शिंपडून ध्वजाची विटंबना करण्यात आली. या घटनेमुळे बौद्धांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून संताप व्यक्त होत असल्याचे राऊत यांनी सांगितले.
भन्ते धम्मरत्न यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी गावाजवळील मोकळ्या जागेवर भगवान बुद्धाची स्थापना करून पंचशील ध्वज लावला होता. ही मूर्ती काही समाजकंटकांनी गेल्या १३ जुलै ०९ च्या रात्री फेकून दिली होती. त्यांनीच भन्ते धम्मरत्न यांचा खून केला असावा, असा संशय व्यक्त केला. या १५ लोकांचा उल्लेख असलेली एक चिठ्ठी सुद्धा भन्तेजींच्या बॅगमध्ये आढळून आली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.भन्ते धम्मरत्न यांच्या मारेकऱ्यांवर व पंचशील ध्वजाची विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, जांभूळखेडा येथे रिपब्लिकन नेत्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, पंचशील ध्वजाचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी आंबेडकरी नेत्यांनी केली आहे.
दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा रिपब्लिकन नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पत्रकार परिषदेला रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, सी.पी. शेंडे, बी.डी. मेश्राम, पी.के. सेमस्कार, जगन जांभूळकर, सुरेखा बारसागडे, माणिकराव तुरे, लक्ष्मणराव रामटेके आदी उपस्थित होते.