Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा -मुनगंटीवार
चंद्रपूर, ७ ऑगस्ट/ प्रतिनिधी

अत्यल्प पावसामुळे ७० टक्के पेरणी व रोवणीची कामे खोळंबलेल्या या जिल्हय़ाला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली

 

आहे.
या जिल्हय़ात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्यातील प्रश्नरंभीचे तीन आठवडे दडी मारल्यानंतर जुलैच्या मध्यापर्यंत तुरळक पावसाने जिल्हय़ात हजेरी लावली. आता ऑगस्ट महिना उजाडला तरीही संततधार पाऊस न झाल्यामुळे जिल्हय़ातील सर्व प्रमुख नद्या, नाले कोरडे पडले आहेत. गेल्या वर्षी ५ ऑगस्टपर्यंत जिल्हय़ात ४९५ च्या सरासरीने ७४२८ मि.मी. पाऊस पडला होता. यावर्षी पावसाची सरासरी ३७४ असून आतापर्यंत ५६१६ मि.मी. पाऊस झाला आहे. प्रश्नरंभी झालेल्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी साडेचार लाख हेक्टर कापूस, सोयाबिन व धानाच्या रोवणीची लागवड केली. यामध्ये धानाच्या एक लाख ५० हजार क्षेत्रापैकी अत्यल्प पावसामुळे केवळ ५० हजार हेक्टर क्षेत्रात रोवणी झाली आहे. एक लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, ५१ हजार हेक्टर क्षेत्रात कापूस, २७ हजार हेक्टर क्षेत्रात तूर, ६२ हजार हेक्टर क्षेत्रात मूल व ६५ हजार हेक्टर क्षेत्रात कडधान्य अशी एकूण ८५ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने हे पीक हातून गेल्यातच जमा आहे. जुलैच्या शेवटी मुसळधार पाऊस येईल. या आशेवर धान उत्पादकांनी रोपे वाढविली. कडक उन्हामुळे रोपे करपल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.
जिल्हय़ातील ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, मूल, गोंडपिंपरी, पोंभूर्णा, चंद्रपूर या धान उत्पादक तालुक्यामध्ये पावसाने दडी मारल्याने धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे तर काही ठिकाणी धानावर लष्करी अळी व उंट अळीने आक्रमण केल्याने उभे पीक फस्त होत असल्याचे दिसून येत आहे.
मूल, सिंदेवाही, नागभीड परिसरातील शेतकऱ्यांनी रोप वाचवण्यासाठी तलावातील पाण्याचा आधार घेतला. परंतु पाऊस नसल्यामुळे पाण्याचा साठा संपत चालला आहे. सिंचन प्रकल्पातील पाण्याची पातळी खालावली आहे. सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रश्नदुर्भाव झाल्याने सोयाबीन पीकही धोक्यात आले आहे. पावसाने या जिल्हय़ाकडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या डोळय़ात पाणी आले आहे. जनावरांच्या चाऱ्यांचाही भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. अन्य जिल्हय़ातून चारा खरेदी करण्याची गरज भासू लागली आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर जिल्हय़ात आत्महत्यांचे सत्र सुरू होईल. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या जिल्हय़ाला तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी आमदार मुनगंटीवा यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व महसूल मंत्री डॉ. पतंगराव कदम यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.