Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

ग्रंथविश्व

भारतीय शास्त्रीय संगीत
पाऊलखुणा आणि शक्यता

 

भारतीय संगीतात गायन, वादन व नर्तन या तीनही कलांचा एकत्रित समावेश आहे. एकेका कलेकरिता आयुष्य वाहून घेतलेली शेकडो मंडळी या क्षेत्रात आहेत. त्यात गुरू, शिष्य व कलाकार मोठय़ा संख्येनं. मात्र संगीताचा ‘शास्त्र’ या रूपात तात्त्विक अभ्यास करणारी ‘संगीतशास्त्री’ (म्युझिकॉलॉजिस्ट) मंडळी फार फार कमी आहेत. प्रो. रमणलाल उर्फ आर. सी. मेहता यांचा समावेश या अल्पसंख्याकांनध्ये होतो. आज नव्वदी ओलांडलेले प्रो. मेहता किराणा घराण्याची विधिवत तालीम लाभलेले गायक आहेत. १९७८ साली ते बडोदा विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झाले. १९७० साली त्यांनी पुढाकार घेऊन ‘इंडियन म्युझिकॉलॉजिकल सोसायटी’ची स्थापना केली होती, ते काम आजतागायत चालू आहे.
प्रस्तुत पुस्तकात त्यांनीच निवडलेल्या त्यांच्या सवरेत्कृष्ट लेखांचं व निबंधांचं संकलन केलेलं आहे. त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीतल्या सर्वोत्तम लिखाणाचं हे संकलन आहे. ‘इंडियन क्लासिकल म्युझिक अँड घराना ट्रॅडिशन’ (भारतीय शास्त्रीय संगीत व घराण्यांची परंपरा) या पुस्तकात १२ प्रकरणं व तीन उपप्रकरणं (अ‍ॅपेंडिक्स) आहेत. पहिल्या तीन प्रकरणांमध्ये भारतीय विचारसरणी व तत्त्वज्ञानाचा संगीतावरील प्रभावाचा ऊहापोह केलेला आहे. १९९० च्या सुमारास भोपाळ येथे झालेल्या तीन व्याख्यानांचा यात गोषवारा आहे. संगीताचा ठाऊक असलेला इतिहास दोन हजार वर्षांचा. त्यातल्या दोन शतकांच्या वाटचालीतल्या पाऊलखुणांचा मागोवा घेत असताना मेहता यांनी पुढील शतकातील शक्यतांचा अंदाज व्यक्त केला आहे. आजपर्यंतच्या ‘अभिजातते’चाही आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखक ‘किराणा’ घराण्याचे गायक. मात्र पुस्तकात ‘आग्रा’ घराण्याच्या गायकी व शैलीचा विचार एका प्रकरणात तपशिलवारपणे दिलेला आहे. तो मुळातून वाचावा असा आहे. उपप्रकरणांमध्येही (अ‍ॅपेंडिक्स) या घराण्याच्या वंशावळीचा तक्ता दिला असून नडियादच्या रोहित देसाई यांच्या सहयोगानं आग्रा घराण्यात प्रचलित असलेल्या रागांची व चिजांची यादी दिलेली आहे. एकूण २३१ राग व ९६२ बंदिशींच्या प्रथम चरणांची अकारविल्हे सूची दिली असून अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असावा.
विशेष म्हणजे ही सूची देसाई या एका रसिक संग्राहकानं बनवली असून ती उपलब्ध ध्वनिमुद्रणांवर आधारित आहे. संगीताचे विद्यार्थी, अभ्यासक व रसिकांना ती फारच उपयोगी ठरेल. ३१ जणांची ही ध्वनिमुद्रणं असून त्यात चारच स्त्रिया आहेत. (चंदा कारवारकरीण ऊर्फ बाबलीबाई ऑफ गोवा, जोहराबाई आग्रेवाली, श्रीमती नार्वेकर व इंदिरा वाडकर). बहुतेक पुरुष गायक त्यांच्या सांगीतिक नावानंही प्रसिद्ध होते. जसे ‘प्रेम पिया’ (फैयाज खान), ‘प्रेमरंग’ (शराफत हुसेन खान). आग्रा घराण्याविषयीची ही मौलिक माहिती हेच या ग्रंथाचं खास आकर्षण. आधुनिक काळातले या घराण्याचे खलिफा (नेते) फैयाज खानच होते. त्यांचं काम व निवासही बहुतांशी बडोद्यासच होता. त्यामुळे इथं आग्रा घराण्याचा इतक्या तपशिलात जाऊन अभ्यास झाला असावा.
सहाव्या प्रकरणात घराण्यातल्या गायकीचं अनुकरण व आदर्श प्रकटीकरण, व्यक्तिगत शैलीविकासाच्या शक्यता व घराणं पुढं नेणाऱ्या बाबींची चर्चा केली आहे. सातव्या प्रकरणात संगीतविषयक संशोधन व संग्रहाची माहिती आहे. या अवाढव्य कामात गुंतलेल्या व्यक्ती व संस्थांचा परामर्श घेण्यात आला आहे. संगीत मुद्रित करून, गोठवून व साठवून ठेवायची विद्या जेमतेम १०० वर्षांची. अशा संगीताला प्रो. मेहता ‘डबाबंद संगीत’ (उंल्लल्ली िट४२्रू) असा शब्द सुचवतात. अशा संगीतचं महत्त्व मोठं असून अशा प्रयत्नांना सर्वाकडून प्रोत्साहन मिळावं, असा ते आग्रह धरतात.
आठवं प्रकरण हे गेल्या शतकातले सूफी संत व गायक ‘हजरत इनायत खान आर. पठाण’ (१८८२-१९२७) यांच्या जीवनावर आहे. कंठ व वाद्य संगीताच्या माध्यमातून पाश्चिमात्यांना अध्यात्माचे पाठ देणारे ते पहिले भारतीय दूत (अँम्बॅसेडर). १९१० साली त्यांच्या ध्वनिमुद्रिका ग्रामोफोन कंपनीने बनविल्या होत्या. त्या आजही सूफी पंथाच्या अनुयायांमध्ये श्रद्धेनं व भक्तिभावानं ऐकल्या जातात.
नऊ ते १२ या चार प्रकरणांत संगीतविषयक अनेक महत्त्वाच्या बाबींची चर्चा केलेली आहे. सुगम संगीतात ‘शब्द’ व त्यांचे अर्थ फार महत्त्वाचे. उलट ख्याल संगीतात ‘स्वरा’ला महत्त्व फार. बंदिश व चिजांचे शब्द म्हणजे ‘स्वर टांगून ठेवायच्या खुंटय़ा’ असं मानणारे अनेक गवई आहेत. पूर्ण चीज वा बंदिश न गाणं, जे काही गायचं त्याचे शब्द श्रोत्यांना कळणार नाहीत, असेच उच्चार जाणीवपूर्वक करणं यातच धन्यता मानणारी मंडळीपण पुष्कळ आहेत. तर काहीजण सुरुवातीलाच बंदिशीचे शब्द व त्यांचा अर्थ श्रोत्यांना समजावून सांगतात. परदेशी मंडळी समोर असतील तर अगदी इंग्रजीतूनही बायोडेटाबरोबर हे सगळं साहित्य आवर्जून वाटलं जातं. अशा वेळी ख्याल संगीतात शब्दांचं महत्त्व किती व कसं हा नेहमीचाच वादाचा विषय. या वादाचे गेल्या शे-दीडशे वर्षांतले अनेक पैलू लेखकानं विस्तारानं उलगडले आहेत.
‘संगीत’ ही प्रामुख्याने दोन्ही कानांनी ऐकावयाची. कानांची ग्रहण मर्यादा २० ते २० हजार कंपनसंख्येइतकीच. स्वनातीत (अल्ट्रासाऊंड) ध्वनी हा मानवी कानांना ऐकू येत नाही. यालाच ‘अनाहत नाद’ म्हणतात की काय? या ध्वनीलहरींना माणसाची इतर इंद्रिये कसा प्रतिसाद देतात? त्यांचं असं काही निराळं संगीत असतं काय? वैद्यकीय उपचार व संगीतोपचार अशा स्वरूपात संगीताचा परिणाम मनुष्याच्या विविध इंद्रियांवर कसा होतो? यावर संगीतशास्त्री व वैज्ञानिक करत असलेल्या संशोधनाविषयीही लेखकानं विवेचन केलेलं आहे. एकूणात प्रो. मेहतांच्या या निबंधसकलनाचं संदर्भमूल्य मोठं आहे.
डॉ. सुरेश चांदवणकर
इंडियन क्लासिकल म्युझिक अँड घराना ट्रॅडिशन, लेखक :
प्रा. रमणलाल सी. मेहता;
प्रकाशक : रीडवर्दी पब्लिकेशन, नवी दिल्ली (२००८); पृष्ठे- २५२; किंमत रु. ७८०.