Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

विविध

‘देशात १३ महिने पुरेल एवढाच धान्यसाठा’
नवी दिल्ली, ७ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

पुढचे तेरा महिने पुरतील एवढाच गहू आणि तांदळाचा साठा सरकारी गोदामांत आहे. कच्ची साखर आणि खाद्यतेलाची आयातीद्वारे मागणी व पुरवठय़ातील तफावत भरून काढण्यात येत आहे. भाजीपाल्याच्या किंमतीतील वाढ तात्पुरती आहे. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत, असे प्रतिपादन लोकसभेतील महागाईवरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज केले. आटोक्याबाहेर चाललेली महागाई कशी कमी होणार हे मात्र त्यांच्या उत्तरातून स्पष्ट न झाल्यामुळे संतप्त विरोधकांनी सभात्याग करून निषेध नोंदविला. लोकसभेचे कामकाज त्यानंतर अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

‘एच-२ बी’ व्हिसासाठी.. त्वरा करा हो त्वरा करा!
वॉशिंग्टन, ७ ऑगस्ट/वृत्तसंस्था
शेतीबाह्य उद्योगातील नोकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या ‘एच-२ बी’ व्हिसासाठी विशेष मोहिमेद्वारे अर्ज स्वीकारण्याची घोषणा अमेरिकेच्या नागरिकत्व आणि स्थानांतर सेवा विभागाने केली आहे.‘एच-१ बी’ हा व्हिसा व्यावसायिक व तंत्रज्ञांना अमेरिकेतील नोकरीसाठी दिला जातो. या व्हिसाधारकांना शेतीबाह्य उद्योगांत आपल्या आप्तांना आणण्यासाठी ‘एच-२ बी’ व्हिसा दिला जातो.

पहिल्या महिला छायाचित्रकार होमी व्यारावाला यांचा
टाटांच्या ‘नॅनो’ ला ‘नो’!
बडोदा, ७ ऑगस्ट / पी.टी.आय.
भारतातील पहिल्या महिला छायाचित्रकार होमी व्यारावाला यांनी नॅनोचे बुकिंग रद्द करण्याचा निर्णय आज जाहीर केला. टाटा कंपनीने दिलेले वचन न पाळल्याच्या निषेधार्थ आपण ‘नॅनो’चे बुकिंग रद्द करत आहोत, असे ९६ वर्षीय व्यारावाला यांनी टाटा कंपनीला कळवले आहे. टाटा कंपनीने होमी व्यारावाला यांना पहिली नॅनो देण्याचे वचन दिले होते.

निवडणुकीपूर्वी ‘बेगमी’ करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत!
नवी दिल्ली, ७ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी गहू, तांदूळ, खाद्यतेल आणि डाळीसारख्या जीवनावश्यक वस्तू, दाभोळ प्रकल्पासाठी वाढीव गॅस आणि शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त खतांची ‘बेगमी’ करून राज्यातील जनतेला समाधानी करण्याच्या इराद्याने आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीची वारी केली.

स्वाइन फ्लूविषयी महाराष्ट्र शासन बेफिकीर होते
राज्यसभेत जावडेकरांचा आरोप
नवी दिल्ली, ७ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
स्वाइन फ्लूमुळे पुण्यात मृत्युमुखी पडलेल्या रिदा शेखच्या प्रकरणात दोन्ही बाजूंनी चुका झाल्याचे आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद यांच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचा दावा भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी केला. राज्यसभेत शून्यप्रहरादरम्यान हा मुद्दा उपस्थित करताना रिदा शेखचे निधन होण्यापूर्वी महाराष्ट्र शासन स्वाइन फ्लूविषयी पूर्णपणे बेफिकीर होते, असा आरोप जावडेकर यांनी केला.

दिल्लीत हिज्बुलचे दोन अतिरेकी पकडले
नवी दिल्ली, ७ ऑगस्ट/पीटीआय

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला किंवा त्या दिवशी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता सरकारने वर्तवली असतानाच दिल्ली पोलिसांनी आज हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून, राजधानीत दहशतवादी हल्ले करण्याचा त्यांचा कट होता, असे प्राथमिक जाबजबाबात उघड झाले आहे. या दोघांनीही पाकिस्तानात जाऊन हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीन याची भेट घेतली होती. त्या दोघांना आजच न्यायालयासमोर हजर केले असता १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

तामिळी बंडखोरांचा स्वयंघोषित नेता पद्मनाथन याला अटक
कोलंबो, ७ ऑगस्ट/पीटीआय

तामिळी बंडखोरांचा स्वयंघोषित नेता सेल्वरास पद्मनाथन याला दक्षिण आशियातील एका देशातून ताब्यात घेऊन विमानाने श्रीलंकेत आणण्यात आले. एलटीटीई संघटना तस्करीच्या माध्यमातून श्रीलंकेत शस्त्रास्त्रे कशा रीतीने आणायची याची चौकशी पद्मनाथन याच्याकडे केली जात आहे. पद्मनाथन हा ‘केपी’ नावाने ओळखला जातो. त्याला कोणत्या देशातून अटक करून श्रीलंकेत आणण्यात आले याचा तपशील उघड करण्यात आलेला नाही. मात्र त्याच्या चौकशीतून तामिळी प्राबल्य असलेल्या घटकांशी एलटीटीईचे कसे संबंध होते यावर अधिक प्रकाश पडू शकेल.श्रीलंका सरकारचे प्रवक्ते केहेलिया राम्बुकवेला यांनी पद्मनाथन याच्या अटकेबाबत फारशी माहिती दिली नसली तरी तामिळसमर्थक वेबसाईटने यासंदर्भात म्हटले आहे की, मलेशियातील कौलालंपूर येथून सेल्वरास पद्मनाथन याला अटक करण्यात आली व त्यानंतर त्याला श्रीलंकेत नेण्यात आले.

देणग्या घेतल्या नाही, तरच शाळा शुल्क ठरवू शकणार
नवी दिल्ली, ७ ऑगस्ट / पीटीआय

विद्यार्थी-पालकांकडून देणग्या घेतल्या नाही, तरच शाळांचा शुल्क ठरविण्याचा अधिकार अबाधित राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. राजधानी दिल्ली आणि परिसरातील शाळांनी ४० टक्क्य़ांपर्यंत शुल्कवाढ केल्यानंतर पालक संघटना व काही संस्थांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निकालावर संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. त्यावर निर्णय देताना न्या. एस. बी. सिन्हा, न्या. एस. एच. कपाडिया आणि न्या. सायरिक जोसेफ यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने टीएमए पै व पी. ए. इनामदार यांच्या संदर्भातील याचिकांबाबत दिलेल्या निर्णयानुसार खासगी संस्थाचालकांना शुल्करचना ठरविण्याचा, त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. त्या निर्णयाचा खंडपीठाने पुनरुच्चार केला. परंतु, त्यासाठी काही अटी स्पष्ट केल्या. त्यानुसार विद्यार्थी-पालकांकडून कोणत्याही स्वरूपात देणगी घेतल्याचे स्पष्ट झाले, तर शुल्कासंदर्भातील शाळांचा अधिकार गमवावा लागेल.

भाववाढीवर सचिव समितीची बैठक
नवी दिल्ली, ७ ऑगस्ट/वृत्तसंस्था

दिवाळी आणि दसरा जवळ येऊन ठेपत असताना साखर आणि डाळींचे भाव कडाडत असल्याने या भाववाढीच्या प्रश्नात तोडगा काढण्यासाठी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली सचिव समितीची १२ ऑगस्टला बैठक होणार आहे. सध्या २८ ते ३० रुपये किलो या दराने मिळणारी साखर महागण्याची चिन्हे आहेत. तूरडाळीचे भावही कडाडले आहेत. या पाश्र्वभूमीवर अन्नधान्याच्या वाढत्या किंमतीने सामान्य माणूस हैराण झाल्यावरून संसदेतही जोरदार चर्चा झाली होती. तिची दखल घेत सचिव समितीची ही बैठक होत आहे. कॅबिनेट सचिव के. एम. चंद्रशेखर हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत अन्न, कृषी, वाणिज्य आणि वित्त सचिव सहभागी होतील.

सपचे अधिवेशन
लखनऊ, ७ ऑगस्ट/वृत्तसंस्था

समाजवादी पक्षाचे तीन दिवसांचे राष्ट्रीय अधिवेशन १९ ऑगस्टपासून आग्रा येथे सुरू होत आहे.
सार्वत्रिक निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसने सपशी तोलूनमापून वागायला सुरुवात केल्याने केंद्र सरकारला पाठिंबा चालू ठेवण्याबाबत अधिवेशनात निर्णय होणार आहे. उत्तर प्रदेशातील बसप सरकारबाबतही काँग्रेस दुटप्पी वर्तन करीत असल्याचा सपचा आरोप आहे.