Leading International Marathi News Daily
शनिवार ८ ऑगस्ट २००९
 

नागरी सौंदर्यात भर टाकणारी त्रिवेणीकला
इमारतीच्या भिंतीवर चुन्याचा गिलावा करून त्यावर विशिष्ट प्रकाराने खनिजे आणि वनस्पती यांच्यापासून तयार केलेल्या रंगांचा वापर करून चित्रं काढली जात असत. म्हणूनच ही भित्तीचित्रं शेकडो वर्षांनंतर आजही टिकून आहेत. मोझेक (Mosaic) हा भित्तीचित्राचा अजून एक प्रकार. संगमरवर, ग्रेनाईट अशा प्रकारच्या किमती दगडाच्या पातळ तुकडय़ांचा वापर करून ही चित्रं भिंतीवर किंवा जमिनीवर बनवली जातात. सहा हजार वर्षांपूर्वीची मोझेक चित्रं मेसापोटेमियात आढळतात. ग्रीक व रोमन संस्कृतीमध्ये त्या कलाप्रकाराचा उपयोग मोठय़ा प्रमाणात होत असे. मूल्यवान, साधारण मूल्यवान रंगीत खडे वापरून इन्ले वर्क हा कलाप्रकार हाताळला जातो. आग्रा येथील इतमत्उद्दौला नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या भिंतीवरचे इन्ले वर्क फार उच्च प्रतीचे मानले जाते. बडय़ा संस्थानिकांच्या राजवाडय़ांमध्येही हा कलाप्रकार दृष्टीस पडतो. गेल्या शतकात वास्तुरचनेमधून हा जरा मागे पडला, पण आता पुन्हा त्याचा उपयोग सुरू झाला आहे. विशेषत: पंचतारांकित हॉटेल्सच्या अंतर्सजावटीमध्ये आता अनेक माध्यमांतून मोझेक साकारले जाते.
शिल्पकलेचा अंतर्भाव वास्तुरचनेत फार पुरातन काळापासून दिसतो. गुंफा, लेणी, स्तूप, धार्मिक प्रार्थना स्थळं आणि राजवाडे

 

व अन्य प्रकारच्या वास्तुप्रकल्पांतून विविध स्वरूपात ही कला पाहायला मिळते. भारतातील काही मंदिरांची रचना अंतर्बाह्य शिल्पमय आहे. अगदी जोत्यापासून शिखरापर्यंत. देव-देवता, मानव, दानव, प्राणी-पक्षी व फळा-फुलांनी बहरलेल्या नाना तऱ्हेच्या लता वृक्षांच्या शिल्पाकृती त्यात सामावलेल्या आहेत. अजिंठय़ाच्या भित्तीचित्रांच्या बाबतीतदेखील असेच आहे. या शिल्पांमधील व चित्रांमधील सर्वाचे हाव-भाव, त्यांची वस्त्रप्रावरणे, आभूषणे, केशरचना यांचे बारकाईने निरीक्षण केले तर त्यातील वैविध्य पाहून कलाकाराच्या कल्पनाशक्तीचे व सर्जनशीलतेचे कौतुक वाटते.
औद्योगिक क्रांतीच्या काळानंतर म्हणजे सामान्यपणे १८५० सालानंतर इमारतींमध्ये विविधता येऊ लागली. केवळ प्रार्थना स्थळं, राजमहाल, हवेल्या किंवा सामान्य प्रकारची घरं असे बांधकाम प्रकार न राहता इतर प्रयोजनासाठी वास्तुप्रकल्पांची बांधकामे होऊ लागली. कारण जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये समाजाची प्रगती होऊ लागली. वाढत्या औद्योगिकीकरणाचा तो अपरिहार्य परिणाम होता. जीवनोपयोगी वस्तूंची निर्मिती करणारे कारखाने वाढू लागले. या वस्तूंचा खरेदी-विक्री व्यवहार वाढीस लागल्याने व्यापार- उद्योगात वाढ सुरू झाली. त्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था, त्यांच्या कचेऱ्या उभ्या राहू लागल्या. कर्मचाऱ्यांच्या संख्येत भर पडू लागली. शिक्षण प्रसारात प्रगती होत असताना सांस्कृतिक क्षेत्रदेखील व्यापक होऊ लागले. सामाजिक चळवळी वाढू लागल्या. रेल्वे आली, प्रवास वाढला. त्यासाठी सुविधा वाढत राहिल्या. वैयक्तिक व सामाजिक आरोग्य सुधारू लागले. जीवनाच्या अशा विविधांगी विकासकार्याला उपयुक्त ठरणाऱ्या वास्तूंची मग बांधकामे वाढू लागली. गावांचा व नगरांचा विस्तार होऊ लागला. काही नगरे नव्याने वसू लागली. त्यात निवासी इमारती, कार्यालये, कारखाने, शाळा, विद्यालये, रुग्णालये, नाटय़गृहे, रेल्वे नि बस स्थानके, हॉटेल्स, स्टोअर्स आणि इतर कितीतरी प्रकारच्या वास्तुरचना होत राहिल्या. त्यांच्या रचनेत कधी चित्रकला व शिल्पकला यांचा उपयोग होऊ लागला.
दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर झालेल्या वास्तूरचनांचा अभ्यास केला तर असे दिसून येते की, या दोन्ही कलांचा उपयोग त्यांच्यामध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून झाला. केवळ वास्तूची शोभा त्रयस्थपणे वाढविणे इतकाच उद्देश न ठेवता वास्तुशिल्पकारांनी चित्र अथवा शिल्प किंवा चित्र व शिल्प हे कला प्रकार वास्तुरचनेचे अविभाज्य घटक आहेत, असे समजून वास्तुरचना केल्या. आता सुद्धा हाच दृष्टिकोन ठेवला जातो म्हणून प्रकल्पाच्या आखणीच्या सुरुवातीच्या काळातच चित्र व शिल्प या घटकांना कशा तऱ्हेने सामावून घेता येईल याचा विचार केला जातो आणि संबंधित कलाकाराबरोबर त्या विषयी चर्चा केली जाते. प्रस्तावित इमारतीच्या बाह्य स्वरूपात किंवा आंतर स्वरूपात अथवा दोन्ही ठिकाणी त्यांचा उपयोग केलेला दिसतो.
युरोप, अमेरिकेतील शेकडो उदाहरणे या संदर्भात देता येतील. आपल्याच देशातील काही उदाहरणे पाहू या. जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी बांधलेले मुंबईचे व्हिक्टोरिया रेल्वे स्थानक (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) त्याच्या घुमटावरील शांती व प्रगतीचा संदेश देणाऱ्या स्त्रीचा पुतळा व मुख्य दर्शनी भागावर खास बनविलेल्या रेखीव कोनाडय़ामधील (Niche) व्हिक्टोरिया राणीचा सिंहासनाधिष्ठित पुतळा (आता तो कोनाडा रिकामा आहे) या दोन शिल्पांचा समावेश आर्किटेक्ट एफ. डब्ल्यू. स्टिफन्सने या स्थानकाच्या संरचनेमध्ये सुरुवातीपासून केला होता. महात्मा फुले मंडईच्या (क्रॉफर्ड मार्केट) बाह्यांगावरील उत्थान शिल्पांचाही (relief sculptures) या बाबतीत उल्लेख करता येईल. १९६० च्या सुमाराला दिल्लीला कॅनॉट सर्कलमध्ये ओडियन सिनेमा थिएटर बांधले गेले. त्याच्या दर्शनी भागावर सतीश गुजराल यांनी डिझाईन केलेले म्युरल त्या वास्तूच्या संरचनेमध्ये सुरुवातीपासूनच समाविष्ट केले होते. त्याच काळातील चंदिगढमधील एका वास्तूमध्ये ल कार्बुझिए या फ्रेंच वास्तुशिल्पकाराने एका विशाल भित्तीचित्राचे संयोजन केले आहे. तोही मूळ संकल्पनेचाच एक घटक. १९८० च्या सुमारास वास्तुशिल्पकार चार्लस् कोरिया यांनी पणजी येथे एका हॉटेलचे डिझाईन केले तेव्हा त्या हॉटेलमधील भित्तीचित्रांची योजना व गोवा कला अ‍ॅकेडमीमधील भित्तीचित्रांची त्यांनी केलेली योजना या मूळ वास्तू संकल्पनेचाच भाग आहेत. गोव्याच्या पारंपरिक मूलभूत वास्तुरचनेच्या पैलूंचा समावेश संरचनेमध्ये करण्याचा हेतू त्यामागे होता. पुणे येथील ‘आयुका’ या संस्थेच्या वास्तूच्या मुख्य दर्शनी भागावरील विस्तृत भित्तीचित्र व मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या प्रवेश दालनात टांगलेला मला थोरला लामण दिवा आणि तेथेच खाली फरशीवर एका हऱ्यामध्ये निश्चिंतपणे विसावलेल्या मजुराचे शिल्प ही उदाहरणे या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आहेत.
तुलना करायची झाली तर पाश्चिमात्य देशांपेक्षा आपल्या देशात चित्र व शिल्प यांचा आंतर्भाव आधुनिक वास्तुरचनेमध्ये त्या मानाने खूप कमी प्रमाणात होतो, असे म्हणावे लागेल. हेन्री मूर, नॉम गॅबो, बार्बारा हेपवर्थ, जीन आर्प, जेकब एपमस्टाईन, रोझमेरी झ्वाईग, नरेंद्र पटेल, लुई रेडस्टन यांच्यासारखे नामवंत शिल्पकार आणि मार्क छगाल, जॉन मिरो, कँडिन्स्कि, पिकासो यांच्यासारखे प्रख्यात चित्रकार या सर्वाच्या कलाकृतींना सामावून घेणाऱ्या अगणित वास्तू परदेशात बघायला मिळतात. कित्येक शहरातून व गावांमधून सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्य वाढविणाऱ्या कलाकृती दिसतात. त्यांचे विषय व माध्यम यांच्यातही केवढी तरी विविधता असते. या सर्व कलाकृतींची निगा फार काळजीपूर्वक केलेली असते हे विशेष. या सर्व कलाकृती एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय होऊ शकतो.
१९६७ साली कॅनडात माँट्रिएल येथे जागतिक प्रदर्शन भरले होते. त्यात जगातील अनेक देशांचे प्रदर्शन कक्ष होते. प्रत्येक देशाने कक्षाच्या उभारणीत आपल्या देशातील नामवंत कलाकारांचा उपयोग करून घेतला होता. त्याचा परिणाम असा झाला की, सर्वसामान्य जनतेमध्ये दृककलेविषयी ओढ निर्माण झाली. लहान-मोठय़ा प्रमाणात वास्तूप्रकल्प, नगररचना, निसर्ग रचना, लँडस्केप डिझाइनिंग, अभियांत्रिकी प्रकल्प यात वेगवेगळ्या प्रकाराने चित्र व शिल्प या कलांचा उपयोग करण्याकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात झाली. आपल्याकडे भारतामध्ये गेल्या पाच-दहा वर्षांच्या कालावधीत या दृक् कलांचा अंतर्भाव नव्याने उभ्या होत असलेल्या वास्तू प्रकल्पात वाढू लागला आहे. प्रकल्पाच्या अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद होऊ लागली आहे. निसर्ग रचनाकाराला (लँडस्केप आर्किटेक्ट) वास्तुप्रकल्पाच्या उभारणीत महत्त्वाचे स्थान प्राप्त होत आहे. प्रकल्पाच्या प्रारंभिक अवस्थेमध्येच त्याचा सहभाग केला जातो. याच तऱ्हेने प्रकल्पाच्या संरचनेच्या सुरुवातीला चित्रकार, शिल्पकार यांना सामावून घ्यायला हवे. त्यामुळे नियोजित चित्राचा किंवा शिल्पाचा विषय, त्याची जागा, आकार, त्याचे माध्यम, रंगसंगती, प्रकाशयोजना इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचा विचार सुरुवातीपासून होईल. तसे झाले तरच प्रस्तावित वास्तुप्रकल्पात या कलाकृती एकरूप झाल्यासारख्या वाटतील.
लुई रेडस्टन या वास्तुशिल्पकाराने चाळीस वर्षांपूर्वी ‘आर्ट इन आर्किटेक्चर’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. अमेरिका व कॅनडा याखेरीज इतर पंचवीस देशांतील वास्तुप्रकल्पांमध्ये समाविष्ट झालेल्या दृक्कला प्रकारांचे सचित्र आणि सटीप वर्णन या पुस्तकामध्ये आहे. लुई रेडस्टनने त्याच्या वास्तुनिर्मितीमध्ये स्वत: डिझाईन केलेली भित्ती चित्रं व विटांच्या साह्याने बनविलेली भित्ती चित्रं यांचा उपयोग केला आहे. या लेखामध्ये पूर्वी उल्लेख केलेल्या व इतर कितीतरी चित्रकारांची नि शिल्पकारांच्या कलाकृतींची छायाचित्रं या पुस्तकामध्ये समाविष्ट केली आहेत. वास्तुरचना, चित्रकला, शिल्पकला या विषयातील व्यावसायिक आणि विद्यार्थी तसेच ज्यांना या विषयात रस आहे, अशा सर्वासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
वास्तुशिल्पकला (आर्किटेक्चर) या विषयाचा अभ्यास करीत असताना शिल्पकला, चित्रकला यांचा सहभाग संरचनेत (डिझाईनमध्ये) कशा प्रकारे करायला हवा याची जाण विद्यार्थ्यांना होणे गरजेचे आहे. या विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या संपर्कात यायला हवे. या विषयावर आपसात वैचारिक देवाणघेवाण करायला हवी. या विषयातील व्यावसायिकांच्या बरोबर याबद्दल चर्चा करायला हवी. दरवर्षी हे विद्यार्थी अभ्यास सहलीला जातात तेव्हा चित्रकला, शिल्पकला यांचा समावेश असलेल्या खास वास्तुप्रकल्पांना त्यांनी भेट द्यायला हवी. त्या प्रकल्पांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. कलात्मकतेच्या दृष्टिकोनातून आपसात व आपल्या प्राध्यापकांच्या बरोबर त्यावर चर्चा केली पाहिजे, असे जेव्हा होऊ लागेल तेव्हा दृककलांचा उपयोग वास्तुरचनेमध्ये करण्यासंबंधीची जाण वाढीस लागेल व या कलांची योजना वास्तुप्रकल्पांमधून व नागरी प्रकल्पांमधून जास्त प्रमाणात होईल. पर्यायाने अशा प्रकारच्या त्रिवेणी कलासंगमातून नागरी सौंदर्यात भर पडेल. एका गोष्टीचे भान मात्र सांभाळावे लागेल; ते म्हणजे या दृक्कलांचा उपयोग करीत असताना त्यांचा दर्जा उच्च प्रतीचा राहील याची खबरदारी घ्यायला विसरून चालणार नाही. (समाप्त)
भा.द.साठेलेखक
संपर्क -९३२३७५३०५८