Leading International Marathi News Daily
रविवार, ९ ऑगस्ट २००९

आर यू अ ट्विटर?
स्क्रॅप व वॉल याच्या पुढचा टप्पा म्हणजे ट्विटर. १४० अक्षरांच्या संदेशांची ही संवादप्रणाली. ट्विटर मोबाइलला जोडले गेल्याने त्याला ‘इंटरनेटवरचे एसएमएस’ असेही म्हटले जाते. एकीकडे जगभर ट्विटरचे लोण पसरत आहे, तर दुसरीकडे नव्या स्मार्ट पिढीच्या गरजा ओळखून बोलभाषेला एसएमएसमध्ये रूपांतरीत करणारे नवे मोबाइल सेट येऊ घातले आहेत. स्मार्ट कोण? तंत्रज्ञान की ते वापरणारा माणूस, अशी स्पर्धा रंगात आली आहे. या स्मार्टनेसचा वेध घेणारे विनायक परब यांचे लेख-
बघता बघता सारेजण नेटकर झाले. आधी नेटला नाके मुरडणारेही नंतर ई-मेलशिवाय शक्यच नाही, असे म्हणू लागले. लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांना एक नवा फंडा मिळाला. त्यांनी स्वतच्या वेबसाइटस् काढल्या. त्यानंतरच्या काळात ब्लॉग आले. मात्र एवढे सारे लिहिणार कोण आणि मग आपण लिहिलेले लोकांनी का वाचायचे इथपासून लोक हे सारे का आणि केव्हा वाचणार, असे प्रश्न सुरुवातीच्या काळात विचारले गेले. हळूहळू ब्लॉगही लोकप्रिय झाले. लेखन ही काही केवळ लेखकांचीच मक्तेदारी राहिली नाही. ब्लॉगने सामान्यांनाही लिहिण्याचे आणि लोकप्रिय होण्याचे सामथ्र्य प्रदान केले. ब्लॉगर्स नावाची तरुण लेखकांची एक नवी जमातच अस्तित्वात आली. सुरुवातीस ब्लॉगला नाके मुरडणारे नंतर ब्लॉगचे वाचक झाले, त्यातलेच काहीजण त्यातून प्रेरणा घेऊन ब्लॉगर झाले. याच काळात ऑर्कुटची फेझ आली.
नाविन्याच्या पहिल्या लाटेत स्वतला झोकून देते ती तरुणाई. ऑर्कुट म्हणजे काय तर, तरुणाईचे काही तरी नवीन प्रकरण- असे म्हणणारे प्रौढही नंतर स्वत ऑर्कुटवर दाखल झाले, त्याची मजा घेऊ लागले. लंबेचौडे ब्लॉग काहीसे मागे पडले. त्यांची जागा छोटेखानी स्क्रॅपनी घेतली. आपण नेमके काय करत आहोत, आपल्या भावना या क्षणी नेमक्या काय आहेत, ते व्यक्त करण्याची संधी स्क्रॅपच्या माध्यमातून मिळाली. त्यानंतर फेसबुकने ऑर्कुटला कडवी स्पर्धा निर्माण केली. काहीसे वेगळे डिझाइन आणि युजरफ्रेंडलीनेस यामुळे फेसबुक अल्पावधीतच लोकप्रिय झाले. ऑर्कुटप्रमाणेच मग फेसबुकची वॉलही सर्वाना आपलीशी वाटू लागली.
आधी हे सारे इंग्रजीतून सुरू होते, पण पुढे त्याला युनिकोडची जोड मिळाली आणि मग भारतासारख्या देशात कम्युनिटीज्चे पेव फुटले. ऑर्कुट आणि फेसबुकवरच्या कम्युनिटीज ही चळवळ बनली. वेबसाइटवर अनेक पानांमध्ये माहिती विखुरलेली असायची आणि एखादी महत्त्वाची घटना घडली की, वेबसाइट अपडेट व्हायची. त्यावरची माहिती अद्ययावत केली जायची. नंतर ते प्रमाण दर दिवसागणिक नवीन ब्लॉग लिहिण्यापर्यंत आले. त्यानंतर स्क्रॅप आणि वॉल आली. शब्दसंख्या कमी झाली. आणि आता पुढे काय, याची वाट पाहात असतानाच ट्विटर नावाचे प्रकरण येऊन दाखल झाले. सध्या युरोप, अमेरिका आणि आशिया खंड यत्रतत्र सर्वत्र या ट्विटरने सर्वाचाच ताबा घेतला आहे. तरी अद्याप भारतामध्ये ट्विटिंग करणाऱ्यांचे प्रमाण तसे कमी आहे.
ट्विटरने आजवर केवळ नेटवर असलेली ही चळवळ प्रत्यक्षात थेट मोबाइलवर नेण्याचे क्रांतीकारी काम केले. सुरुवातीस लोक दिवसातून एकदा ब्लॉगवर व्यक्त व्हायचे. नंतर ते स्क्रॅप व वॉलवर आले, तेव्हा त्यांची शब्दसंख्या कमी झाली होती. ट्विटरने तर शब्दसंख्येला आणखी मर्यादा घातली ती १४० शब्दांची. एका बाजूला हे सारे होत असतानाच लोकांच्या व्यक्त होण्याच्या प्रमाणामध्ये मात्र वाढ होत होती. म्हणजे पूर्वी दिवसातून एकदा ब्लॉगवर व्यक्त होणारे लोक दिवसातून पाच-सहा वेळा स्क्रॅप किंवा वॉलवर लिहू लागले. आणि आता ट्विटरवर तर ते दिवसातून १५-२० वेळा अपडेट देतात, म्हणजेच ट्विटिंग करतात.
www.twitter.com ही मोफत असलेली सोशल नेटवर्किंग साइट आणि मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट आहे. १४० अक्षरांचे संदेश, ज्याला ट्विटस् म्हणतात, ते आपल्याला या वेबसाइटवर देता येतात. हे संदेश आपल्या ऑथर्स प्रोफाइलच्या पानावर म्हणजेच आपल्या होमपेजवर पाहाता येतात. ज्या व्यक्ती ट्विटरची सेवा स्वीकारतात त्यांना ते पाहाता येतात, त्यांना फॉलोअर्स म्हणतात. आपले संदेश केवळ आपल्या मित्रांनाच पाहाता येतील, अशी सोयही करता येऊ शकते. (रेस्ट्रिक्टेड अ‍ॅक्सेस). किंवा ते सर्वानाच पाहाता येतील (ओपन अ‍ॅक्सेस), अशीही सोय करता येते. खरे तर स्क्रॅप किंवा वॉलच्या माध्यमातून अशा प्रकारचे संदेश पाहण्याची सोय होती. पण ट्विटर मोबाईलला जोडले गेल्याने आपल्या दोस्ताने अपडेट दिला की, तो दुसऱ्याक्षणी मोबाईलवर एसएमएस रूपाने येतो. यालाच रिअल टाइम अपडेट म्हणतात. त्यामुळेच या ट्विटरला तुफान लोकप्रियता मिळाली.
अमेरिकेत तर आता लहान-मोठय़ा कार्यालयांपासून ते सरकारी कचेऱ्या, मोठे मॉल्स, म्युझियम्स, शाळा, विद्यपीठे सर्वत्र ट्विटिंग जोरात सुरू आहे. कारण मोठय़ा कार्यालय, संस्थांमध्ये कोण कुठे आहे, हे शोधणे खूप कठीण जाते. मात्र तुम्ही तुमचा ग्रुप केलेला असेल आणि तुम्ही कुठे आहात, काय करता आहात, याचे अपडेट वेळोवेळी देत असाल, तर सर्वानाच एकमेकांचा ठावठिकाणा समजतो आणि काम करणे सोपे होते. या मोबाइल एसएमएस सेवेमुळेच ट्विटरला ‘इंटरनेटवरचे एसएमएस’ असेही म्हटले गेले. या क्रांतिकारी शोधाचा वापर सध्या मुक्तपणे केला जातोय.
भारतात अद्याप मोबाइलवरील इंटरनेट सुविधा तेवढी चांगल्या दर्जाची उपलब्ध झालेली नाही. थ्रीजी मोबाइल सेवा आता कुठे सुरू झाली आहे. ती आणखी स्वस्त उपलब्ध होईल, त्यावेळेस आपल्याकडेही ट्विटरसारख्या सेवांचा वापर खूप मोठय़ा प्रमाणावर वाढेल. तरीही ट्विटिंग करणाऱ्या भारतीयांमध्ये दररोज वाढ होतेच आहे. सध्या तरी त्यात पत्रकारांचा भरणा अधिक आहे. खास करून २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पत्रकारांमध्ये ट्विटिंग करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. हायप्रोफाईल सीईओ आणि इतर कॉपरेरेट अधिकाऱ्यांमध्येही त्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात ट्विटरच्या वाढीचे प्रमाणे हे महिन्याला १३८२ टक्के एवढे मोठे आहे. फेसबुकच्या सदस्य संख्येमध्ये २२८ टक्के मासिक वाढ आहे. ट्विटर उत्सुकतेपोटी सुरू करून नंतर सोडून देणाऱ्यांचे प्रमाणही बरेच आहे. मात्र नवीन सदस्य झालेल्यांपैकी किमान ४० टक्के जण ट्विटर कायम राहतात. मुळात त्यांच्या वाढीचे प्रमाण खूप अधिक असल्याने कायम राहणाऱ्यांची संख्याही तशी मोठीच आहे.
२००६मध्ये जॅक डोर्सी याच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना आली. ओडेओ नावाच्या पॉडकास्टींग कंपनीमध्ये काही तरी नवीन क्रिएटिव्ह करण्याच्या उद्देशाने झालेल्या एका बैठकीत त्याने ही कल्पना प्रथम मांडली. छोटेखानी गटाला एकमेकांच्या संपर्कात राहाता यावे आणि रिअल टाइम अपडेटस् एकमेकांना देता यावेत, ही त्याच्या मागची प्राथमिक कल्पना होती. २१ मार्च २००६ रोजी डोर्सेने ‘जस्ट सेटिंग अप माय ट्विटर’ हा पहिला संदेश पाठवला. त्यानंतर त्याच वर्षी जुलै महिन्यात ही सेवा अनेकांना खुलू करून देण्यात आली. दरम्यान बिझ स्टोन आणि इव्हॉन विल्यम्स यांनी ओडेओ ही कंपनी ताब्यात घेतली आणि ओडेओ व ट्विटर डॉटकॉम विकत घेतले. नंतर २००७ साली एप्रिल महिन्यात ट्विटर ही स्वतंत्र कंपनी सरण्यात आली. ‘साऊथ बाय साऊथवेस्ट फेस्टिव्हल’मध्ये त्याचवर्षी ट्विटरला तुफान लोकप्रियता मिळाली. रोजच्या २० हजार ट्विटस् वरून दररोज ६० हजार ट्विटस् नोंदले गेले. त्या फेस्टिवलमध्ये मोठाले स्क्रीन्स लावण्यात आले होते आणि आपण कुठे आहोत, त्याचे अपडेस् सर्वजण मोबाइलवरून पाठवत होते, जे त्या स्क्रीनवर दिसत होते. त्याच फेस्टिवलमध्ये भल्याभल्यांना या तंत्रज्ञानाने भुरळ घातली.
आता चर्चा सुरू आहे- ट्विटरच्या पुढे काय? एवढे सारे झाल्यावर ट्विटरवाली मंडळी थोडीच गप्प बसणार? ट्विटरला आता त्या त्या देशांमध्ये स्थानिक रूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक मोबाईल कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात आपल्याकडे एअरटेल, वोडाफोन, बीपीएल अथवा आयडिया सोबत ट्विटरही मिळू शकेल.. तेही आपापल्या भाषेत..
आपल्या फॅन्सनी आपल्याला फॉलो करावे म्हणून प्रियांका चोप्रा, मल्लिका शेरावत यांनीही ट्विटिंग करायला सुरुवात केली आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बराक ओबामांनी याचा सर्वाधिक वापर केला होता. बराक ओबामांपासून प्रियांका चोप्रा, मल्लिका शेरावतपर्यंत सारेजण ट्विटरवर आहेत. आय ट्विटर.. सो, आर यू अ ट्विटर ऑर स्टिल बॅकवर्ड?
vinayakparab@gmail.com