Leading International Marathi News Daily
रविवार, ९ ऑगस्ट २००९

महाभारतातील चार्वाक आणि अमर्त्य सेन, देवीप्रसाद चट्टोपाध्याय इत्यादींचा चार्वाक एकच आहे का?
‘डॉ. अमर्त्य सेन आणि चार्वाक’ हा राजा पटवर्धन यांचा लेख १२ जुलैच्या लोकमुद्रामध्ये प्रसिध्द झाला होता. लेखामध्ये त्यांनी अमर्त्य सेन यांना अभिप्रेत असलेला चार्वाक महाभारतातील शांतिपर्वातला आहे तर त्यापूर्वी शल्यपर्वातही एका चार्वाकाचा उल्लेख असून तो राक्षस होता, दुर्योधनाचा मित्र होता आणि दुर्योधनाचा अंतकाळ जवळ आल्यावर दुर्योधनाने या चार्वाकाला धर्मराजाचा तेजोभंग करायला पाठविले होते, पण तिथे त्याचा वध झाला असल्याने खरा चार्वाक कोणता असा प्रश्न केला आहे. त्या संदर्भातील काही पत्रे येथे प्रसिध्द करत आहोत. डॉ. अमर्त्य सेन आणि चार्वाक’ हा १२ जुलैच्या लोकमुद्रामधील, राजा पटवर्धन यांचा लेख माहितीपूर्ण आहे आणि चांगला आहे .
डॉ. अमर्त्य सेन यांचा Argumentative India हा ग्रंथ किंवा शारदा साठे यांचा ‘वादसंवादप्रिय भारतीय’ हा त्या ग्रंथाचा अनुवाद मी वाचलेला नाही. त्यामुळे त्यांचे चार्वाकाविषयींचे विचार कळू शकलेले नाहीत.
चार्वाक हे एक अनुत्तरित कोडे आहे. चराचर सृष्टीची विविध रूपे पाहून, विविध आविष्कार पाहून तत्कालीन विचारवंतांची जिज्ञासा जागृत झाली. जीव, आत्मा, परमात्मा, मृत्यू, मानवी जीवन म्हणजे काय, त्याचे प्रयोजन काय वगैरे प्रश्नांची उकल करण्याचे यत्न होऊ लागले. वेद, उपनिषदे, आरण्यके, ब्राह्मण्ये, श्रुती, स्मृती वगैरेंमधून याविषयींची मते प्रसारित होऊ लागली. त्याचबरोबर या मतांचे खंडन करणारे विचारही मांडले जाऊ लागले. त्यातून ईश्वरवाद, निरीश्वरवाद, अध्यात्मवाद, जडवाद वगैरे दर्शने तयार झाली. दर्शन म्हणजे विशिष्ट मतांचा पुरस्कार करणारी तत्त्वप्रणाली. जे परलोकाचे अस्तित्व मानतात ते आस्तिक आणि ज्यांना परलोकाचे अस्तित्व मान्य नाही ते नास्तिक. आता परलोकाचे म्हणजे स्वर्गाचे (आणि नरकाचे) अस्तित्वच नाकारले की देवांचे अस्तित्वच संपुष्टात येते. जिथे देवच अस्तित्वात नाही तिथे त्याची नि:श्वसिते मानले गेलेले वेद,
 

उपनिषदे वगैरे आपला अर्थ गमावून बसतात, निर्थक ठरतात. वेद, उपनिषदांनी मान्यता घालवली की मग यज्ञयाग, कर्मकांडे यांचा पायाच हरवतो, अशा रीतीने एक प्रदीर्घ साखळी तयार होते. आणि नरकाचे अस्तित्व अमान्य केले की मृत्यूनंतरच्या नरकवासाला अर्थ राहत नाही. म्हणजे स्वर्ग नसल्याने पुण्य करण्याची गरज नाही तर नरक नसल्याने पापापासून भीती नाही. मृत्यूनंतर स्वर्ग किंवा नरकात जायला आत्माच नसल्याने तोही प्रश्न मिटतो. देहाचे मृत्यूनंतर भस्म होते मग त्याचे पुनरागमन कसे होईल? म्हणून आहे हेच जीवन आनंदात आणि ऐश्वर्यात व्यतीत करा, ऐपत नसेल तर कर्ज काढा, पण सर्व सुखे भोगा. (इथे तूप पिणे म्हणजे सर्व सुखे भोगणे असा आहे. याचा अन्नशुद्धीशी संबंध नसावा.) हे आहे चार्वाकदर्शनाचे ढोबळ स्वरूप.
वेगवेगळ्या तत्त्वप्रणालींची अनेक दर्शने आहेत. त्यांचे मुख्यत: दोन भाग पडतात. एक आस्तिक दर्शने आणि दुसरा नास्तिक दर्शने. पूर्वी लिहिण्याची कला विशेष प्रगत नव्हती किंवा ती सामान्यजनांपर्यंत रुजली नव्हती. गुरु-शिष्य परंपरेतून, मौखिक शिक्षणातून वेदादी आस्तिक दर्शन ग्रंथ पुढील पिढय़ांपर्यंत शिकविले गेले. हे ग्रंथ म्हणजे ईश्वराची नि:श्वसिते मानले जात असल्याने त्यातील प्रत्येक शब्द शुद्ध स्वरूपात जतन केला जात असे. प्रत्येक ग्रंथ अनेकांना मुखोद्गत असल्याने त्यात बदल होण्याचा प्रश्न नव्हता. या उलट नास्तिक दर्शनांना दीर्घ गुरु-शिष्य परंपरा नव्हती. त्यामुळे ही दर्शने पुढील पिढय़ांना उपलब्ध होऊ शकली नाहीत आणि काळाच्या ओघात नष्ट झाली.
या नास्तिकांना लोकायतिक म्हणतात. लोकायत म्हणजे ईहलोकविषयक प्रणाली. लोक म्हणजे ईहलोक आणि आयत म्हणजे आधार. दुसराही एक अर्थ आहे. लोक म्हणजे सामान्य जन. या समाजाला जे व्यवहारात दिसते ते लोकायतिक, प्रत्यक्षवाद लोकायतिकाचा आधार होता तर प्रामाण्यवाद आस्तिकांचा पाया होता. लोकायतिकालाच पुढे चार्वाकदर्शन असे नाव मिळाले. (अश्रद्ध, पाखंडी, वितंडा ही आणखी काही नावे.)
चार्वाक ही काही एकच व्यक्ती नाही. नास्तिक तत्त्वज्ञान मानणारे ते सर्व लोकायतिक किंवा चार्वाक म्हणून ओळखले जात. यात ब्राह्मण आहेत, राक्षस आहेत, दैत्य आहेत, ऋषिमुनी आहेत, इतकेच काय पण कधी कधी देवही आहेत. थोडक्यात नास्तिकांची ही उपाधी आहे.
देवांचा गुरू बृहस्पती हा पहिला चार्वाक असल्याचे मानले जाते. वेगवेगळ्या कालखंडात अनेक ग्रंथांतून याचा उल्लेख आहे. मैत्रायणी उपनिषदामध्ये एक मनोरंजक कथा आहे. असुरांचा गुरू शुक्र याला देवेन्द्राने कपटाने आश्रमातून दूर नेले आणि हा बृहस्पती शुक्र बनून तिथे असुरांचा गुरू बनला. तिथे दहा वर्षे राहून असुर विद्यार्थ्यांना विपरीत तत्त्वे शिकवली आणि या तत्त्वांच्या आचरणाने असुरांचा नाश ओढवला. हे तत्त्वज्ञान पुढे तर्कशुद्ध रीतीने मांडले गेले आणि बार्हस्पत्य किंवा लोकायत दर्शन म्हणून ओळखले जाऊ लागले.
अजित केशकंबली हाही एक प्रख्यात चार्वाक म्हणून ओळखला जातो. अजित हे त्याचे खरे नाव, पण मानवी केसांचे कांबळे अंगावर घेऊन फिरायचा म्हणून केशकंबली हे नाव त्याला मिळाले. हा बुद्धापेक्षा वडील होता आणि एक चांगला आचार्यही होता. त्याने लोकायत मताची फेरमांडणी करून आपला वेगळा पंथ निर्माण केला. अजित केशकंबलीच्या पंथातून बौद्ध आणि जैन धर्माची निर्मिती झाली असे काहींचे मत आहे. अजित आणि त्याच्या पाच नास्तिक सहकाऱ्यांनी बौद्धापूर्वीच ब्राह्मण धर्माविरुद्ध टीकेची झोड उठवली होती. पण पुढे बुद्धाचे प्रखर व्यक्तिमत्त्व, आर्जवी स्वभाव, वक्तृत्व आणि संघटनकौशल्य यापुढे अजित मागे पडला आणि विस्मृतीत गेला. मात्र बौद्ध आणि जैन वाङ्मयातून त्याची निंदा झालेली आहे.
प्राचीन संस्कृत, पाली आणि प्राकृत वाङ्मयातून अनेक पात्रांच्या तोंडी चार्वाक विचार घातलेले आढळतात. प्रल्हादाचा पुत्र विरोचनाचा छांदोग्योपनिषदात तसेच भागवत, नारद पुराण, गणेश पुराण वगैरेंमध्ये उल्लेख आहे. तो ईहवादी, ऐहिक सुखे भोगणे हाच पुरुषार्थ असल्याचे मानणारा होता. त्याचा पुत्र बळी आणि नातू बाणासुर हेही चार्वाकवादीच होते.
प्रदेशी (पालीमध्ये पायसि) हे बौद्ध आणि जैन ग्रंथांतील पात्र. मृत्यूनंतर स्वर्गात किंवा नरकात गेलात की तिकडून दूतांकरवी तेथील माहिती कळवा असे त्याने पापी तसेच पुण्यवान लोकांना सांगितले होते, पण तिकडून एकही दूत आला नाही म्हणजे स्वर्गही नाही आणि नरकही नाही असे त्याने अनुमान काढले. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्यांना रांजणात बंद करून ठेवले. ते भरताच रांजण उघडून पाहिले. पण त्यातून प्राण बाहेर पडताना ‘दिसला’ नाही. तसेच गुन्हेगारांचे मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर वजन केले पण वजन कमी न होता त्यात वाढ झाली म्हणजे जीव किंवा आत्मा वेगळा नसतो असे त्याने जाहीर केले.
रामायणाच्या अयोध्याकांडात रामाला वनवासात जाण्यापासून परावृत्त करू पाहणारा जाबाली; महाभारताच्या शांतिपर्वामध्ये प्राण किंवा जीव पंचमहाभूतांपासून वेगळे नसल्याचे सांगणारा भारद्वाज मुनी; सर्व माणसे ब्रह्मदेवानेच निर्माण केलेली असल्याने त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ क्रम लावण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन करणारा भृगूऋषी हे सर्व थोडेफार चार्वाकवादीच होते. चार्वाकांची ही यादी आणखी वाढू शकेल.
चार्वाकांची बरीच दर्शने लुप्त झालेली आहेत. आस्तिक दर्शनांतून त्यांचे बरेच उल्लेख आढळतात. हाच त्यांच्याबद्दलचा पुरावा. जयराशी भट्ट हा एक विलक्षण चार्वाक इ. स.च्या सातव्या-आठव्या शतकांत होऊन गेला. ‘तत्त्वोपप्लव सिंह’ हा त्याचा ग्रंथ. वैदिक, बौद्ध आणि जैन यांच्यावर त्याने सडकून टीका केलेली आहे. चार्वाकवाद्यांचा हा एकमेव प्राचीन ग्रंथ उपलब्ध असावा. चौदाव्या-पंधराव्या शतकांच्या सुमारास मध्वाचार्य, गुणरत्न या पंडितांचे ‘सर्व दर्शन संग्रह’, ‘षड्दर्शन संग्रह’ तयार झाले. या ग्रंथांतून निरनिराळ्या दर्शनांचे साररूपात संकलन करण्यात आले आहे. या ठिकाणी चार्वाकदर्शनाची जुन्या भारतीय सूत्र पद्धतीने अठ्ठावीस सूत्रांद्वारे ओळख करून दिलेली आहे.
थोडक्यात, चार्वाक ही एकच एक व्यक्ती नव्हती तर विशिष्ट मतप्रणाली बाळगणाऱ्यांची ती उपाधी होती. चार्वाकांच्या विचारप्रणालीने आपल्या धर्मविचारांमध्ये वादळे निर्माण केली. वैदिक धर्म, ब्राह्मणी धर्म, हिंदू धर्म, बौद्ध धर्म आणि जैन धर्म या पाच धर्माच्या उदयास्ताला कारणीभूत ठरणारे हे तत्त्वज्ञान जगातील अगदी पहिले तत्त्वज्ञान असावे. या विचारसरणीने तर्कशास्त्राचा पाया घातला, पण या धर्मानी चार्वाकांची निंदाच केलेली आहे.
संदर्भ- १) चार्वाक- इतिहास आणि तत्त्वज्ञान
- प्रा. सदाशिव आठवले
२) चार्वाकदर्शन- प्रा. आ. ह. साळुंखे
पद्माकर शं. कुलकर्णी, ठाणे

डॉ. अमर्त्य सेन आणि चार्वाक या लेखात राजा पटवर्धन यांनी चार्वाकासंबंधी काही प्रश्न उभे केले आहेत. महाभारतातील शांतिपर्व व शल्यपर्वातील चार्वाकाचा संदर्भ देत पटवर्धन लेखाच्या शेवटच्या भागात प्रश्न उभा करतात की, चार्वाक जर भौतिकवादी तत्त्वज्ञ असता तर पांडवांच्या न्याय्य बाजूची बूज राखायला त्याला काय हरकत होती. तो दुर्योधनाच्या बाजूचा म्हणजे अन्यायाचा पक्षपाती होता. मित्र होता. त्याला न्यायाची चाड नव्हती. महाभारतात त्याला सरळ सरळ राक्षस म्हटले आहे. याशिवाय लेखाचा शेवट करताना त्यांनी विचारले आहे की, महाभारतातील वरील चार्वाक आणि डॉ. अमर्त्य सेन म्हणतात तो चार्वाक एकच आहे का? असो. डॉ. सेन यांचा चार्वाक व महाभारतातील चार्वाक एकच की वेगळे हा निर्णय लावण्यापूर्वी पटवर्धनांच्या चार्वाकासंबंधी बनलेल्या मताचा परामर्श घेता येईल; मग तो चार्वाक कुठला का असेना. चार्वाकाच्या भौतिकवादी असण्यावर आक्षेप नोंदवताना पटवर्धनांनी ‘पांडवांच्या न्याय्य बाजूची बूज’ न राखल्याने त्याला न्यायाची चाड नव्हती हा निष्क र्ष काढला आहे. येथे त्यांनी पांडवांची बाजू न्याय्य होती हे गृहीतच धरले आहे.
बहुधा त्यांनी दुर्गा भागवतांचे ‘व्यासपर्व’ वाचले नसावे. व्यास पर्वमधील कर्णासंबंधीचे ‘एकाकी’ व अर्जुनासंबंधी ‘परीकथेतून वास्तवाकडे’ या प्रकरणातील दोन उतारे या संदर्भात महत्त्वाचे आहेत. ‘एकाकी’मध्ये दुर्गाताई म्हणतात.. ‘युद्ध हे एकच पहिले व शेवटचे धर्मबद्ध कृत्य त्याने (दुर्योधनाने) अंगिकारले आणि नवल असे की, एकदा युद्धाचा स्वीकार केल्यानंतर मात्र कपटापेक्षा शौर्याचाच आधार त्याने घेतला. अश्वत्थाम्याचे अगदी अखेरचे कृत्य सोडल्यास दुर्योधनाच्या बाजूने कपट झाले नाही. जे जे काही लबाडीचे झाले ते सारे पांडवांच्याच बाजूने झाले.’ (पान ५६). ‘परीकथेतून वास्तवाकडे’ या प्रकरणात दुर्गाताई म्हणतात.. ‘जयद्रथवधापासून कृष्णाच्या सांगीप्रमाणे अनेक बरीवाईट धोरणे अर्जुनाला ‘युद्धनीतींच्या नावाखाली खपवावी लागली. कौरवांचे धोरण युद्धनीती अति स्वच्छ असावी असे, तर कृष्ण-अर्जुनाचे धोरण सर्वसाधारण दैनंदिन नीती युद्ध व युद्धकालीन नीती प्रसंगानुरूप असे होते.’ (पान ७७). हे दोन्ही उतारे स्वयंस्पष्ट असल्याने त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.
महाभारतात चार्वाकाला सरळ सरळ राक्षस असे म्हटल्याने पटवर्धनांचा निष्कर्ष अगदी पक्का झालेला दिसतो. त्या ‘राक्षसा’संबंधानेही काही खुलासा करणे आवश्यक आहे. ‘बळीवंश’कार डॉ. आ. ह. साळुंखे त्यांच्या ‘बळीवंश’ या साक्षेपी कृतीमध्ये ‘राक्षस’ या संज्ञेचा पुढीलप्रमाणे परिहार करतात.. ‘प्राचीन भारतात देव म्हटल्या जाणाऱ्या मानवसमूहाच्या विरोधात असलेला राक्षस हा एक अत्यंत प्रभावी समाज होता. देव राक्षसांच्या हल्ल्यांची सतत भीती बाळगत असत आणि त्यांच्या नाशासाठी प्रार्थना, व्रते, यज्ञ वगैरे करीत असत. अत्यंत क्रूर आणि दृष्ट म्हणून त्यांची प्रतिमा रंगविण्यात आली आहे. वास्तविक रीत्या राक्षस हे या देशातील मूळच्या लोकांच्या संरक्षणव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक होते, हे स्पष्ट आहे. अलीकडे जसे उच्च प्रशिक्षण घेतलेले ‘कमांडो फोर्स’ असतात. तसेच राक्षस हे असुर वगैरेंच्या सैन्यदलातील अत्यंत कडवे सैनिक व अधिकारी होते, असे दिसते. संस्कृत भाषेतील रक्षण करणे या अर्थाचा ‘रक्ष्’ हा धातू राक्षस या शब्दाशी संबंधित आहे, हे उघडच आहे.
अर्थात, त्या धातूपासून राक्षस व रक्षस् हे शब्द बनले, असे मानण्यापेक्षा या शब्दांपासून रक्ष् हा धातू संस्कृत भाषेमध्ये स्वीकारला गेला, असे म्हणणे ऐतिहासिकदृष्टय़ा सत्याला अधिक जवळ जाणारे आहे. ते कसेही असो, राक्षस हे रक्षण व्यवस्थेशी संबंधित असलेले लोक आहेत, एवढे नक्की (पान ६७).
आता महाभारतातील चार्वाक आणि अमर्त्य सेन, देवीप्रसाद चट्टोपाध्याय इत्यादींचा चार्वाक एकच आहे का? या समस्येने ग्रस्त होण्याचे कारण नाही. ‘आपल्याला जो चार्वाक समजतो तो त्याच्या इतरांनी दिलेल्या वचनावरून’ हे पटवर्धनांनी अचूकपणे टिपले आहे. चार्वाकदर्शन किंवा चट्टोपाध्याय ज्याला ‘लोकायत’ दर्शन म्हणतात ते एक अवैदिक दर्शन (तत्त्वज्ञान) आहे. वैदिकांनी ते नष्ट करणे, ही त्यांची निकड होती. केवळ ग्रंथच नव्हे तर अशा तत्त्ववेत्त्यांची हत्या करणे व त्याला ‘वध’ संबोधून हत्येचे उदात्तीकरण करणे, हे वैदिक परंपरेचे ठळक वैशिष्टय़ आहे. पण वैदिकांच्या हल्ल्याचे लक्ष्य बनलेले कुठलेही तत्त्वज्ञान कधीही नष्ट झाले नाही. या अवैदिक तत्त्वज्ञानांमधील जीवनवाद इतका अस्सल आहे की, डॉ. सेनसारख्यांना तो ‘अमर्त्य’ वाटत आहे! चार्वाक व्यक्ती होता की समूह हे गूढ जेव्हा उकलायचे तेव्हा उकलेल. जाता जाता आणखी एक संदर्भ ‘चार्वाका’संबंधी देणे आवश्यक आहे.. थोर प्राच्यविद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील म्हणतात.. ‘तंत्र, सांख्य व लोकायत यांनी भोगवादापासून आपली सुटका करून घेतलेली नसली, तरी ती विषमताविरोधी व समतावादी तत्त्वज्ञाने होती हे विसरता कामा नये. सांख्य पुरुषप्रधान बनत गेल्याने जरी ते वेदान्ती छावणीत ओढले गेले, तरी तंत्र व लोकायत यांनी आपला विषमताविरोध व समतावाद तेवत ठेवला. लोकायताचे जनकत्व पुरुष चार्वाकाकडे देण्यात येत असले, तरी १.३.४७ या पाणिनीय सूत्रावरील ‘वदते चार्वी लोकायते’ या काशिकावृत्तीनुसार व चार्वी ही अनार्य वेस्सवना (कुबेरा) ची पत्नी असल्याने या तत्त्वज्ञानाचे जननीत्व स्त्रियांकडे जाते. (याची चर्चा मी खं. १ मध्ये केली आहे.)’ (पान ७९, जात्यन्तक भांडवली लोकशाही व तिची समाजवादी पूर्ती- शरद पाटील)
चार्वाकाला दूषणे देणारे टीकाकार सर्वाधिक ज्या ‘ऋणं कृत्त्वे धृतं पिबेत’चा आधार घेतात ते वचन मुळात संपूर्णपणे असे आहे- ‘यावज् जीवेत् सुखं जीवेद्। ऋणं कृत्त्वे घृतं पिबेत। भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:? (जोपर्यंत जगायचे तोपर्यंत सुखाने जगावे, कर्ज काढून तूप प्यावे. शरीराची राख झाल्यावर परतून थोडेच येता येणार आहे?) या वचनाचा रोख मोक्ष, स्वर्ग व पुनर्जन्माचे गाजर दाखवून शोषित जनतेला एका भ्रमात जगायला लावणाऱ्या देवांवर आहे. शोषित जनतेचे भ्रम तुटले की ती क्रांतिप्रवण होते. म्हणून जनतेला अशा वेगवेगळ्या भ्रमात ठेवणाऱ्या कालच्या व आजच्या देवांच्या पासून जनतेचे रक्षण करणे हे ‘राक्षस’ चार्वाकाचे परम कर्तव्य ठरते. असा ‘राक्षस’ चार्वाक, डॉ. सेन यांच्या लेखणीतून ‘अमर्त्य’ झाला आहे.
किशोर मांदळे, भोसरी, पुणे
‘चार्वाक दर्शन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, नास्तिक मताचा प्रवर्तक, कोणी चार्वाक नावाची व्यक्ती असावी, असा एक समज आहे. ही विचारपरंपरा वेदांइतकीच प्राचीन आहे. तिचे खरे नाव ‘लोकायत’ किंवा ‘बार्हस्पत्य मत’ (बृहस्पतीप्रणीत विचार) असे आहे. पण या नास्तिक मताचा प्रवर्तक म्हणून, चार्वाक नावाची कोणी व्यक्ती होऊन गेली, याला इतिहासात पुरावा नाही. मग हा चार्वाक आला कोठून?
लेखकाने म्हटल्याप्रमाणे चार्वाक ही महाभारतातील एक व्यक्तिरेखा आहे. जो राक्षस होता आणि दुर्योधनाचा मित्र होता. त्याने भारतीय युद्धात कृष्णनीतीने विजय मिळविणाऱ्या पांडवांचा विशेषत: जबाबदार व्यक्ती म्हणून राजा युधिष्ठिराचा धिक्कार केला. यासाठी तो ब्राह्मण रूपाने इतर ब्राह्मणांत मिसळून आला होता. त्याचे कपट लक्षात आल्यावर अन्य ब्राह्मणांनी त्याला ठार केले. नास्तिक मत आज ज्याच्या नावाने ओळखले जाते, तो हाच चार्वाक का?
या प्रश्नाची उत्तरे लोकायत ऊर्फ चार्वाक मताची विचारप्रणाली, तिचा प्रभाव व प्रतिक्रिया यामध्ये आहेत. या प्रणालीचे निषेधात्मक रूप असे- ईश्वराला अस्तित्व नाही. त्यामुळे वेद हे ईश्वरनिर्मित आणि अपौरुषेय आहेत, असे म्हणणे निर्थक आहे. वेदांना स्वत:प्रामाण्य नाही.
याच वेदांच्या परंपरेतल्या, यज्ञयाग, पूजाअर्चा, अग्निहोत्र, श्राद्ध, स्वर्ग-नरक, कर्म- कर्मफळ, पूर्वजन्म- पुनर्जन्म, मोक्ष या सर्व कल्पना व कर्मकांड ही लोकांना लुबाडण्यासाठी, बनेल हितसंबंधियांनी निर्माण केलेले भ्रमजाल आहे. पातिव्रत्य हे मूल्य नसून स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे, जुलमी पुरुषांचे एक हत्यार आहे. वर्णाश्रम व जातिभेद हे अशास्त्रीय आहेत. या विचारांची विधायक बाजू अशी- स्वत:ची बुद्धी हेच खरे प्रमाण आहे. हे ऐहिक जीवनच खरे आहे. शेती, व्यापार, गोपालन, प्रशासन आणि उपयुक्त शास्त्रांचे अध्यापन अशा साधनांनी काम करून द्रव्य मिळवावे आणि सर्व सुखोपभोग मेळवून नीतीने जगावे. स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे.
लोकायत मत हे त्याच्या तर्कशुद्धता, सरळपणा आणि माणसाच्या हिताची कळकळ यामुळे लोकप्रिय झाले. त्याला लाभलेल्या ‘लोकायत’ या अभिधानाचे हेच कारण आहे. पण हेच तत्त्वज्ञान, वर उल्लेखिलेल्या हितसंबंधियांच्या मुळावरही येणारे होते. म्हणून त्यांनी लोकायत मताचे ग्रंथ नष्ट केले. तरीही या मताचा प्रभाव एवढा होता की, बाकीच्या दार्शनिकांना आपले मत मांडताना लोकायत मताला पूर्वपक्ष करून खोडावे लागले आहे. पूर्वपक्ष म्हणून मांडलेले हे विचार बहुतांशी विकृत आणि विपर्यस्त रूपात आहेत. तरीही, त्यांच्या साह्य़ाने त्यांच्या मूळ रूपापर्यंत पोहोचता येते. ही उपलब्धी सर्वदर्शन संग्रह सारख्या संकलनात्मक ग्रंथांतील तुटपुंजा भाग आणि बाकी वेद, उपनिषदे, पुराणे, प्राचीन शास्त्रग्रंथ, कथा- काव्ये-नाटके यांच्यातले उल्लेख, निर्देश यावरून आज आपल्याला माहीत झालेल्या नास्तिक, लोकायत वा चार्वाक दर्शनाचे चित्र तयार झाले आहे.
अशा सर्वाना पुरून उरलेल्या या विचाराला, विचारानेच भिडण्याऐवजी, त्याला बदनाम करण्यासाठी चार्वाक विरोधकांनी एक नामी शक्कल काढली. लोकायत किंवा बृहस्पतीप्रणीत मत म्हणून जवळजवळ दोन हजार वर्षे ओळखल्या जाणाऱ्या या दर्शनाला त्यांनी इसवी सनाच्या आठव्या शतकापासून, महाभारतातील चार्वाक राक्षसाचे नाव दिले. कुत्र्याला ठार करायचे असल्यास, तो ‘पिसाळलेला आहे’ असे आधी म्हणा आणि मग त्याला गोळी घाला, अशी ही नीती आहे.
चार्वाक निरवंदकांची आणखी एक बहादुरी म्हणजे चार्वाक विचाराचे सारभूत सूत्र म्हणून प्रसिद्ध असलेला पुढील श्लोक-
यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।
(जोवर जगणे आहे, तोवर सुखाने जगावे. कर्जबाजारीपण आले तरी आपले तूपसाखर रोटी खाणे सोडू नये. मरणानंतर राख झाल्यावर हे शरीर सुख भोगावयाला परत थोडेच येणार आहे!)
लोकायताच्या मूळ श्लोकांत ‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत’ हे शब्द नाहीत. ‘नास्तिमृत्युरगोचर:।’ हे मृत्यूच्या जाणिवेचे शब्द आहेत. श्लोकाधर्माच्या अदलाबदलीची चार्वाक विरोधकांची ही चलाखी केव्हढी बेमालूम आहे! मूळ श्लोक आणि त्याचे श्लोकांतर ‘सर्वदर्शनसंग्रह’ या ग्रंथात पाहायला मिळते.
कृषिगोरक्षवाणिज्य दण्डनीत्यादिभि: बुधै:।
एतेरैव सदोपायैर्भोगाननुभवेद्भुवि:।।

(शेती, गोपालन, व्यापार, प्रशासन सेवा इत्यादी कामे करून मिळालेल्या द्रव्याच्या साह्य़ाने सुखोपभोग घ्यावेत.) हा ज्या लोकायतांचा आदर्श आहे, ते ऋण काढून सण करा’, असे म्हणणारच नाहीत (लेखकाने म्हटल्याप्रमाणे ‘सर्वदर्शनसंग्रह’ हा ग्रंथ मध्वाचार्याचा नसून माधवाचार्याचा आहे. मध्वाचार्य हे तेराव्या शतकातले द्वैतमतस्थापक तर माधवाचार्य हे चौदाव्या शतकातले).
सारांश, नास्तिक मतप्रवर्तक चार्वाक ही व्यक्ती ऐतिहासिक नसून काल्पनिक आहे आणि राक्षस चार्वाक ही महाभारतातली व्यक्तिरेखा आहे. त्याचा लोकायत मताशी असलेला संबंध बादरायणी आहे.
अशा परिस्थितीत डॉ. अमर्त्य सेन यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशांच्या संदर्भात राक्षस चार्वाकाचा हवाला का द्यावा हे समजत नाही.
क. ह. ठाकूरदेसाई, कर्जत
आधारग्रंथ- चार्वाक : ‘इतिहास आणि तत्त्वज्ञान (दुसरी
आवृत्ती १९८०) लेखक- प्रा. सदाशिव आठवले,
प्रकाशक- प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई

उत्तरे
भाग १ : ५ प्रश्नांची साखळी
१. हृदय, यकृत, येळकोट ही एकाच लेखकाची पुस्तके या साहित्यप्रकाराची आहेत-
२. पहिल्या प्रश्नाचे उत्तर असणाऱ्या साहित्यप्रकाराला मराठीत आजवर दोन वेळा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यापैकी एक हे पुस्तक होते-
३. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असणारे पुस्तक या लेखकाचे आहे-
४. तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर असणाऱ्या लेखकाचे हे नाटक प्रसिद्ध आहे.
५. चौथ्या प्रश्नाचे उत्तर असणाऱ्या नाटकात यांची प्रमुख भूमिका होती-

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार श्याम मनोहर यांनी अत्यंत प्रयोगशील नाटके लिहिली. यकृत, हृदय, येळकोट, प्रेमाची गोष्ट (?) ही त्यातलीच. प्रेमाची गोष्ट (?) मध्ये डॉ. लागू आणि निळू फुले यांच्या भूमिका होत्या. नाटक या प्रकाराला आजवर दोन वेळा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’ आणि एलकुंचवारांचे ‘युगांत.’ ‘आत्मकथा’ हे महेश एलकुंचवारांचेच आणखी एक नाटक. त्यात डॉ. लागू यांनी प्रमुख भूमिका केली होती.
म्हणून उत्तरे आहेत :
१- ड. नाटक, २- क. युगांत, ३- ड. एलकुंचवार, ४- क. अत्मकथा, ५- अ. डॉ. लागू.

भाग २ : खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा-
६. ‘शोभायात्रा’ आणि ढोलताशे’ या दोन्ही नाटकांचे लेखक एकच आहेत.
उत्तर : चूक. ‘शोभायात्रा’ हे नाटक शफाअतखान यांचे तर ‘ढोलताशे’ हे नाटक चं. प्र. देशपांडे यांचे आहे.
७. ‘आश्रमहरिणी’ आणि ‘ब्राह्मणकन्या’ या एकाच लेखकाच्या कादंबऱ्या नाहीत.
उत्तर : बरोबर. ‘आश्रमहरिणी’ ही वा. म. जोशी यांची तर ‘ब्राह्मणकन्या’ ही केतकरांची कादंबरी होय.
८. ‘भिन्न’, ‘धुळीचा आवाज’ आणि ‘तत्पुरुष’ हे तीनही कवितासंग्रह एकाच कवयित्रीचे आहेत.
उत्तर : चूक. ही तीनही पुस्तके कविता महाजन यांचीच असली तरी ‘धुळीचा आवाज’ आणि ‘तत्पुरुष’ हे कवितासंग्रह आहेत तर ‘भिन्न’ ही कादंबरी आहे.
९. ‘अश्वत्थाची सळसळ’ हा कमलाकर नाडकर्णी यांचा कलासमीक्षेचा ग्रंथ पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.
उत्तर : चूक. ‘अश्वत्थाची सळसळ’ हा कलासमीक्षेचा ग्रंथ आहे आणि तो पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केला असला तरी तो कमलाकर नाडकर्णीचा नसून ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा आहे.
१०. ‘सौंदर्यमीमांसा’ आणि ‘सौंदर्यानुभव’ हे रा. भा. पाटणकरांचे ग्रंथ सौंदर्यशास्त्रावरचे आहेत आणि त्याबद्दल पाटणकरांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
उत्तर : चूक. रा. भा. पाटणकरांना ‘सौंदर्यमीमांसा’ या ग्रंथाबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला हे खरे पण ‘सौंदर्यानुभव’ हा ग्रंथ मात्र प्रभाकर पाध्ये यांचा आहे.
भाग ३ : खाली दिलेल्या विधानांत रिकाम्या जागी विधानांखाली दिलेल्या पर्यायांपैकी शब्द भरा :
११. ‘दीपावली’ या दिवाळी विशेषांकाचे ....... हे एक संपादक होते.
१२. ........ हे ‘सत्यकथा’ मासिकाचे संपादक होते.
१३. आवाज दिवाळी अंकाचे खास आकर्षण म्हणजे ........ यांची चित्रे.
१४. सध्या ‘मौज’ दिवाळी अंकाचे संपादन .... करतात.
१५. ....... हे ‘हंस’ दिवाळी अंकाचे संपादक आहेत.
पर्याय :
अ. गजेंद्रगडकर ब. आनंद अंतरकर क. रॉय किणीकर ड. अनंत अंतरकर ई. पत्की
उत्तरे : ११- क, रॉय किणीकर, १२- ड, अनंत
अंतरकर, १३- ई. पत्की, १४- अ, गजेंद्रगडकर,
१५- ब, आनंद
संजय भास्कर जोशी

prashnamudra@gmail.com

विजेत्यांना ‘राजहंस’ प्रकाशनातर्फे
प्रथम - रुपये १००० , द्वितीय- रुपये ५००,
आणि तृतीय- रुपये ३००

अशी बक्षिसे दिली जातील.
चौदा किंवा त्याहून जास्त उत्तरे बरोबर देणाऱ्या सर्र्व स्पर्धकांना राजहंस प्रकाशनातर्फे सवलत कुपनांची भेट दिली जाईल.