Leading International Marathi News Daily

रविवार, ९ ऑगस्ट २००९

‘स्वाईन फ्लू’च्या पहिल्या बळीने मुंबई हादरली!
मुंबई, ८ ऑगस्ट / प्रतिनिधी

पुण्यात ‘स्वाईन फ्लू’चा पहिला बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना करण्यास सुरूवात केलेली असतानाच मुंबईतही आज ‘स्वाईन फ्लू’चा पहिला बळी गेला. या रोगाची लक्षणे आढळलेल्या फमिदा पानवाला (५३) या महिलेला गंभीर अवस्थेत कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आज तिचा मृत्यू झाला. ‘स्वाईन फ्लू’बाबत नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही, असे आवाहन आज पालिका प्रशासनाने केले आहे. जनतेच्या सोयीसाठी गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालय आणि मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालय या ठिकाणी या रोगावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मनीषा पाटणकर- म्हैसकर यांनी दिली. याशिवाय वांद्रे येथील भाभा, बोरिवली येथील भगवती, घाटकोपर येथील राजावाडी आणि कस्तुरबा या चार रुग्णालयात लाळेचे नमुने तपासण्यासाठी घेतले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कस्तुरबा रुग्णालयात सकाळी नऊ ते रात्री नऊवाजेपर्यंत संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. या रुग्णालयाची क्षमता १०० खाटांनी वाढविण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

देशात उपासमारीची भीती नाही - पंतप्रधान
दुष्काळामुळे महागाई मात्र आणखी वाढणार
नवी दिल्ली, ८ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

मान्सूनला झालेला विलंब तसेच अनेक भागांमध्ये अपुरा पाऊस पडल्यामुळे देश अत्यंत अवघड परिस्थितीला तोंड देत आहे. धान्यसाठा पुरेसा असला तरी यंदा खरीप हंगामात धान्योत्पादनात घट होण्याच्या शक्यतेमुळे डाळ, साखर आणि भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव येत्या काही महिन्यात आणखी वाढू शकतात. पण आम्ही कुठल्याही स्थितीत नागरिकांवर उपासमारीची पाळी येऊ देणार नाही. त्यासाठी केंद्र आणि राज्यांना त्यासाठी सामूहिकपणे, प्रभावी व तातडीने पावले उचलावी लागतील, अशी भावना आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशातील विविध भागांमध्ये उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना व्यक्त केली. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्यांना हवे ते अतिरिक्त साह्य देण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे प्रतिबद्ध असल्याची ग्वाही मनमोहन सिंग यांनी आज सकाळी संसदीय सौंधात विविध राज्यांच्या मुख्य सचिवांच्या बैठकीत बोलताना दिली. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारही उपस्थित होते.दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना राज्यांतर्फे दिल्या जाणाऱ्या डिझेल सबसिडीतील ५० टक्के भार केंद्र सरकारने उचलण्याचे ठरविले आहे. शिवाय अशा राज्यांना शेतीच्या कामासाठी अतिरिक्त वीज देण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.देशातल्या १४१ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी एकाही राज्याने विस्तृत निवेदन तयार करून केंद्राकडे दुष्काळासाठी मदतीची मागणी केलेली नाही.

फलटणजवळ विष घालून पस्तीसहून अधिक मोरांची शिकार
पुणे, ८ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

सातारा जिल्ह्य़ात फलटणजवळ मोरांची मोठय़ा प्रमाणात शिकार होत असून, तेथील निंबळक गावात गेल्या आठवडय़ात सुमारे पस्तीसपेक्षा जास्त मोर व लांडोरांची विष घालून शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोरांची आतडी व इतर अवशेष तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. मोरांना विष मिसळलेले ज्वारीचे दाणे खायला घालून त्यांना मारण्यात आल्याचे याबाबतच्या तपासात स्पष्ट झाले आहे. निंबळक गावातील शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार दिली आहे. निंबळक परिसरात मोरांची संख्या अधिक आहे. मात्र गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये त्या परिसरात मोरांची डोकी व पिसे पडल्याचे शेतकऱ्यांना पाहायला मिळाले. त्याचबरोबर आसपास दिसणाऱ्या मोरांची संख्यासुद्धा कमी झाल्याचे त्यांच्या ध्यानात आले.त्यामुळे त्यांनी बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे पर्यावरण अधिकारी व वन्यजीव अभ्यासक डॉ. महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. गायकवाड यांनी याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि स्वत: या अवशेषांचे चित्रणही केले.

पोलिसांच्या शस्त्रास्त्र खरेदीत शासनाचा हस्तक्षेप नाही - उपमुख्यमंत्री
मुंबई, ८ ऑगस्ट / प्रतिनिधी

राज्याच्या पोलीस दलासाठी आवश्यक शस्त्रात्रे, दारुगोळा तसेच उपकरणे यांच्या खरेदीत राज्य शासन कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करीत नाही, असे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज स्पष्ट केले आहे. दारुगोळा आणि अत्याधुनिक शस्त्रात्रांच्या खरेदीसाठी शासनाचा तो आदेश लागू होत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांचे बंधन ठरले खरेदीतील मोठा अडथळा’ या शीर्षकाखाली आज प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने स्पष्टीकरण करताना भुजबळांनी सांगितले की, पोलीस व कारागृह खात्यातील खरेदीत मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या तसेच वृत्तपत्रांमधून बातम्या येत होत्या. यामुळेच २९ मे २००० मध्ये राज्य शासनाने एका आदेशान्वये २५ लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या खरेदीसाठी गृह खात्याची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले.

बैतुल्ला जिवंत असल्याचा दावा
वॉशिंग्टन, ८ ऑगस्ट/वृत्तसंस्था

तालिबानी कमांडर बैतुल्ला मसूद हा क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार झाल्याबाबत अमेरिकेला पक्की खात्री नाही. तालिबानी गोटातूनही मसूद मारला गेला नसून सुरक्षित असल्याचा दावा आज केला गेला. मसूद मारला गेल्याचे सांगितले जात असले तरी त्याची पडताळणी अद्याप झालेली नाही, असे अमेरिकेच्या अध्यक्षीय प्रासादाचे प्रवक्ते रॉबर्ट गिब्ज यांनी आज वार्ताहरांना सांगितले. अर्थात मसूदसारखे अतिरेकी खरोखरच मारले गेले असतील तर पाकिस्तानी जनतेसाठीही तो मोठा दिलासा आहे, असेही त्यांनी नमूद केले. परराष्ट्र प्रवक्ते रॉबर्ट वूड यांनीही मसूदच्या मृत्युला दुजोरा दिला नाही. मसूद ठार झाल्याच्या बातम्या आहेत पण या क्षणापर्यंत आमच्या माहितगारांकडून त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही, असे वूड म्हणाले. मसूद मारला गेल्याच्या वृत्तानंतर अमेरिकेने आता ‘हक्कानी नेटवर्क’ या अतिरेकी संघटनेला आणि तालिबानी म्होरक्या मुल्ला ओमर याला लक्ष्य केले आहे. जलाउद्दिन हक्कानी याच्या अतिरेकी गटाने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार माजविला आहे.

 

प्रत्येक शुक्रवारी