Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

लोकमानस

महाराष्ट्र सर्पदंशाच्या समस्येबाबत प्रतिगामी का?
दरवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या बातम्या वाढतात. दवाखान्यात उपचार सुरू असतानाच सर्पदंश झालेली व्यक्ती मरण पावली किंवा आधुनिक उपचारासाठी मोठय़ा

 

दवाखान्यात नेत असताना व्यक्ती मरण पावली, असे या बातम्यांत असते. मात्र या समस्येचा सतत २२ वर्षे पाठपुरावा करत असूनही मला शासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. सर्पदंशावर खेडोपाडी त्वरित डॉक्टरी उपचार सर्रास उपलब्ध व्हावेत म्हणून मी १९८७ पासून डॉ. साळुंके, डॉ. ढोके, डॉ. विमलताई मुंदडा, डॉ. शिंगणे, डॉ. दौलतराव आहेर, मुख्यमंत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांना लेखी पत्राद्वारे व ई मेलद्वारे विनंती केली. त्यात ज्या मागण्या केल्या त्या अशा- १)ग्रामीण भागातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनुभवी डॉक्टरद्वारे सर्पदंशाची लक्षणे व इलाज यांचे प्रशिक्षण द्यावे.२) वैद्यकीय अधिकाऱ्यांना इनटूबेशनचे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. ३) राज्याच्या त्या त्या भागांतील विषारी सर्पाचे फोटो व दंशामुळे येणारी लक्षणे ही प्रत्येक सरकारी दवाखान्यात उपलब्ध व्हावीत. ४) अ‍ॅम्बुबॅग, लॅरिगोस्कोप, बॅटरी सेल, इनडोटेकियल टय़ुब्स सतत उपलब्ध व्हावीत. ५) प्रतिलस, निओस्टिगमिन, अ‍ॅटरोपिन, अ‍ॅडरीनॅलिन, स्टेरॉइड्स, अँटिहिस्टामिन, ऑक्सिजन यांचा योग्य पुरवठा व्हावा. ६) ग्रामीण रुग्णालयात कमीत कमी एक तरी कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्र व ते चालविणारे वैद्यकीय अधिकारी असावा. ७) ग्रामीण भागामध्ये खासगी दवाखान्यातही शासनाने विनामूल्य प्रतिलस उपलब्ध करावी व ती विनामूल्य रुग्णास दिली आहे, हे डॉक्टरांनी लेखी द्यावे व विनामूल्य प्रतिलसीचे पैसे घेतल्यास तो दखलपात्र गुन्हा ठरवावा.
सर्पदंशाचा रुग्ण हा सरकारी डॉक्टरांनी खासगी दवाखान्याकडे न पाठवता, ताबडतोबीने त्याच्यावर उपचार व्हावेत, असा कडक नियम व्हावा कारण खासगी दवाखान्यात प्रतिलस, व्हेण्टिलेटर, डायलिसिस व इतर औषधोपचारांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो व रुग्ण बरा झाला तरी तो कर्जबाजारी होतो. परिणामी त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. यातून कुटुंबप्रमुख आत्महत्येस प्रवृत्त होतो. आदिवासी व आश्रमशाळेतील वसतिगृह व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा. मुलांच्या पायांत बूट असावेत. तसेच रात्री त्यांना पलंगावर, मच्छरदाणीत झोपवावे म्हणजे मण्यारसारखे साप अंथरुणात शिरणार नाहीत. सर्पदंश, विंचूदंश टळतील तसेच डासामुळे होणारे मलेरियासारखे आजार टाळता येतील. निरनिराळ्या प्रांतामध्ये त्या भागातील एका जिल्हा रुग्णालयात सर्पदंश व विषबाधा संशोधन व उपचार केंद्र स्थापित करावेत, अशी विनंती मी डॉ. शिंगणे व राजेश टोपे यांना केली आहे. रात्री-अपरात्री सर्पदंशाचा रुग्ण खासगी वाहनाने सरकारी रुग्णालयात भरती झाल्यास त्याचा खर्च देण्याची सरकारने तरतूद करावी. मी माझ्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनामूल्य माहिती व स्लाइडद्वारे माझा अनुभव केव्हाही देण्यास तयार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व उपसंचालकांना वारंवार विनंती करूनही वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर माझे सर्पदंशावरचे भाषण अजूनही होऊ शकलेले नाही. निव्वळ प्रतिलस केव्हा व किती द्यायची याचे जरी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले तरी शासनाचे प्रतिलसीवर होणारे लाखो रुपये वाचतील. नुकतेच एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याने दवाखान्यात अ‍ॅम्बुबॅग उपलब्ध नाही म्हणून सांगितले, तसेच एका शेतकऱ्याला प्रतिलसीअभावी जीव गमवावा लागला.
एक भारतीय नागरिक म्हणून ही कळकळीची विनंती प्रसारमाध्यमाद्वारे करीत आहे व यश येईपर्यंत हे करीतच राहणार कारण Snake bite is a life threatening, unnoticed, sudden onset accident like earthpuake in the family of poor farmer and farm labors. Young and earning member of farmer family is prone to this accident. Victim should be provided with all possible help (money. transport and treatment) and facilities required for saving life at private or government hospital. It is our moral duty to save the honest, dedicated, devoted and sincere slaves of motherland or son of soil.
The attending doctor gets immense satisfaction when the serious poor victim of snake bite recovers
डॉ. हिंमतराव बावस्कर, महाड, रायगड

गणेशोत्सव जरा सांभाळून!
पुणे आणि मुंबई शहरांमध्ये ‘स्वाइन फ्लू’चे थैमान चालू आहे आणि आणखी काही दिवस त्यात काही खंड पडेल, अशी शक्यता दिसत नाही. ‘स्वाइन फ्लू’ने नागरिक एवढे हैराण झाले असतानाच गणेशोत्सवाची तयारीही सुरू आहे. अनेक गणेश मंडळांचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य त्यांनीही लक्षात घेणे गरजेचे आहे. गणपती, त्यांची आरास, त्यांचे देखावे पाहायला दरवर्षी गर्दी उसळत असते. श्रीगणेशाच्या आगमनाच्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी तर गर्दीचा पूर लोटतो. पुण्यात देखावे पाहायला बाहेर पडणाऱ्यांना आवरता येणे अवघड होत असते. गर्दी हेच स्वाइन फ्लू पसरण्याचे मूळ आहे, हे लक्षात घेतले तर मंडळांनी हा उत्सव साधेपणाने साजरा करावा, ही विनंती आहे. नागरिक जर शाबूत राहतील, तर या उत्सवांना किंमत राहणार आहे. उत्सवाचा भपकेबाजपणा कमी करावा, देखावे मर्यादित ठेवावेत आणि गर्दी होणार नाही, हे पाहावे. हा समजूतदारपणा दाखवला गेला तर पुढल्या वर्षी आणखी जोमाने आपल्याला हा उत्सव साजरा करता येईल. नागरिकांनीही जरा सांभाळून, गर्दी टाळून उत्सव साजरा केला तर स्वाइन फ्लूचा धोका आणखी वाढणार नाही.
भाग्यश्री आपटे, पुणे

चिनी वस्तू विकत घेऊ नका
अलिकडेच केंद्र सरकार चिनी उत्पादनांच्या आयातीवर र्निबध घालणार अशा आशयाच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. अखिल भारतीय ग्राहक पंचायत चिनी उत्पादनांच्या विरोधात सातत्याने समाजप्रबोधन करत आहेत. ही उत्पादने आयात करूनही फारच स्वस्त मिळतात, आकर्षक असतात, पण टिकाऊ नसतात. चिनी उत्पादनात वापरलेला कच्चा माल आरोग्याला अपायकारक असतो. चिनी खेळण्यात वापरलेले रंग मुलांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतात. चिनी मोबाइल हँडसेटमध्ये डोळ्याला त्रास होऊ नये अशी यंत्रणाच वापरलेली नसते. चिनी वस्तू विकणारा विक्रेताही या वस्तू विकल्याच्या पावत्या देत नाही. या वस्तूंच्या दर्जाबाबत ग्राहक कोणाकडेच दाद मागू शकत नाही. दर्जेदार वस्तूंची खरेदी महाग पडली तरी अखेरीस स्वस्तच पडते. चिनी वस्तूची स्वस्त वाटणारी खरेदी मात्र महाग पडते. घातक चिनी उत्पादके खरेदीच करणार नाही, असे प्रत्येक ग्राहकाने ठरवले तर भारतातील चिनी वस्तूंची बाजारपेठ निष्प्रभ होण्यास वेळ लागणार नाही.
विद्यालंकार घारपुरे, दापोली, रत्नागिरी

महाराष्ट्राने गोव्याचा आदर्श घ्यावा
सध्या डायबिटिस पेशंट्सच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होतेय. नियमित गोळ्या घेऊनही डायबिटिस नियंत्रणात राहात नाही, त्यांच्यासाठी मोफत ‘इन्शुलिन’ पुरविण्याची गोवा शासनाने नुकतीच घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनानेसुद्धा यावर विचार करावा. अ‍ॅन्जिओप्लास्टी/बायपास सर्जरी यासाठी येणारा जवळपास ३/४ लाखांचा खर्च गोरगरीब जनतेला झेपत नाही. पालिका/शासन रुग्णालयात गरीबांना परवडेल अशा माफक फीमध्ये शस्त्रक्रिया व्हायला हव्यात.
कृष्णा काजरोळकर, विक्रोळी, मुंबई