Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

भाजपचे कोल्हापुरात रास्ता रोको आंदोलन
कोल्हापूर, ९ ऑगस्ट / विशेष प्रतिनिधी

‘महाराष्ट्राला चहूबाजूने खड्डय़ात घालणाऱ्या राज्यकर्त्यांनो चले जाव’ असा नारा देत रविवारी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा शाखेच्या वतीने येथील कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर कळंबा फिल्टर हाऊस येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान बराच काळ वाहतूक अडकून राहिल्याने पोलिसांनी दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांना अटक करून त्यांची कालांतराने सुटका केली.

विकासासाठी राजकारण न आणता सहकार्य करण्याची गरज- शरद पवार
सोलापूर, ९ऑगस्ट/प्रतिनिधी
शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एखादे चांगले काम होत असेल व त्या माध्यमातून नव्या सुविधा येत असतील तर त्यात राजकारण न आणता सर्वानी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. येथील सात रस्ता भागातील शासकीय दूध योजनेच्या जागेपैकी सहा एकर जागेत सहा कोटी ५७ लाख खर्च करून होत असलेल्या नव्या जिल्हाधिकारी कार्यालयासह महसूल भवनाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पवार यांच्या हस्ते रविवारी दुपारी पार पडला.

सांगलीत पावसाअभावी पिके वाळू लागली
सांगली, ९ ऑगस्ट/ गणेश जोशी

राज्यात यंदा सार्वत्रिक पावसाने उशिरा हजेरी लावली, त्याचे परिणाम अद्यापही कायम असून आज रविवारपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार या वेधशाळेच्या अंदाजाकडे सर्वाच्याच नजरा लागून राहिल्या होत्या. जुलै महिनाअखेर सांगली जिल्ह्य़ात केवळ २५ ते ४० टक्के कमी पाऊस झाला आहे, तर ७० टक्के क्षेत्रात पेरणी झालेली पिके तहानलेली आहेत.

..तर स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी- पृथ्वीराज चव्हाण
कराड, ९ ऑगस्ट/वार्ताहर
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चा सुरू झाली आहे. वरिष्ठ पातळीवर लवकर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. पण जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांनी टोकाची भूमिका घेतल्यास निवडणूक स्वतंत्रपणेम लढवली जाईल असा इशारा काँग्रेसचे महासचिव तथा पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देताना, आघाडीबाबत सकारात्मक भूमिकाही बोलून दाखविली.

चितळीत ठेकेदाराच्या कार्यालयाची मोडतोड
टेंभू योजनेतील कालव्याचा भराव फोडला
सातारा, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी
टेंभू योजनेचे खटाव-माणच्या हक्काचे पाणी डावलल्याच्या निषेधार्थ आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना, शेतकरी संघटना व मित्र पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांनी चितळी (ता. खटाव) येथील येरळा जलसेतूवर इशारा मोर्चा काढून कालव्याचा भराव व ठेकेदार प्रसाद अ‍ॅण्ड कंपनीच्या कार्यालयाची मोडतोड केली. या प्रकरणी पोलिसांनी आमदार येळगावकर यांच्यासह ५० कार्यकर्त्यांना अटक केली.

भगवानमामांना अभिवादनासाठी उद्या ‘भक्तिरंग’
कराड, ९ ऑगस्ट/वार्ताहर

कराडच्या मारुतीबुवा कराडकर मठाचे दिवंगत मठाधिपती भगवानमामा कराडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी येत्या ११ ऑगस्ट रोजी ‘भक्तिरंग’ हा तालुक्यातील भजनी मंडळांचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कराड केंद्रातर्फे आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या कराड केंद्राचे सचिव मोहनराव डकरे यांनी दिली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे आपल्या मातोश्री विठाईंबरोबर मारुताबुवांच्या मठात अनेकदा पुराण ऐकायला जात असत. कराडकर मठाच्या पालखीबरोबर स्वत: यशवंतराव चव्हाण आपल्या आजीबरोबर पायी पंढरपूरला गेले होते. त्यांच्या ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रात मारुतीबुवा कराडकर मठाशी असलेले जिव्हाळय़ाचे नाते मांडले आहे.

साताऱ्यात अन्न मानवाधिकाराच्या मागणीसाठी मोर्चा
सातारा, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

येथील बालाजी ट्रस्ट, व्यसनमुक्त युवा संघटना व अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्या युवक क्रांती दलाच्या वतीने महागाई विरोधात अन्न मानवाधिकाराच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.बालाजी ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, व्यसनमुक्त युवा संघटनेचे अध्यक्ष विलासबाबा जवळ व अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. जीवनावश्यक वस्तूंचे आकाशाला भिडलेले भाव व व्यापारी साठेबाजांनी निर्माण केलेली कृत्रिम टंचाई यामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुष्किल झाले आहे. पोषण आहारातील कडधान्य, डाळीचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने रेशनवर त्याचा पुरवठा करावा. साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. बेपर्वा पुढारी सत्ताधाऱ्यांवर या वेळी अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी कडाडून हल्ला केला.

अचानक डुकरे मेल्याने इचलकरंजीत घबराट
इचलकरंजी, ९ ऑगस्ट / वार्ताहर

स्वाइन फ्लूचा प्रश्नदुर्भाव पश्चिम महाराष्ट्रात पसरत असलेल्या शक्यतेच्या पाश्र्वभूमीवर शहरात दहा डुकरे मृत्यू पावल्याने आसरानगर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन केलेल्या भागातील नागरिकांत घबराट पसरली. पालिका कर्मचाऱ्यांचा संप असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून बचत गटाकरवी मृत्यू पावलेली डुकरे मैल खड्डय़ात पुरली. डुकरे पालन करणाऱ्या समाजातील अंतर्गत वादातून विषप्रयोग करून डुकरांना मारले असल्याचे मुख्याधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. स्वच्छतेच्या कामाचा ठेका घेतलेल्या बचत गटांची मोट जुंपून मेलेली डुकरे तत्काळ मैल खड्डय़ात नेऊन पुरण्यात आली. दरम्यान नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन आणखी तीव्र करण्याचे ठरविले आहे. उद्या शनिवारी महात्मा गांधी पुतळ्याजवळ रास्ता रोको करण्यात येणार आहे. श्रेय वादातून स्वतंत्र दुकाने थाटलेल्या कामगार संघटना या निमित्ताने एकत्र येणार आहेत.

स्वाइन फ्ल्युमुळे सोलापुरात आजची पोलीस भरती लांबणीवर
सोलापूर, ९ऑगस्ट / प्रतिनिधी
पुण्यानंतर सोलापुरातही स्वाइन फ्ल्यूची साथ पसरण्याची शक्यता असल्याच्या पाश्र्वभूमीवर उद्या सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे.
येथील शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्ल्यूचा एक रुग्ण काल शनिवारी दाखल झाला असून त्यानंतर खोकला, पडसे व अंगदुखीमुळे त्रस्त झालेले अनेक रुग्ण स्वाइन फ्ल्यूची भीती बाळगून तपासणीसाठी रुग्णालयात येत आहेत. पुणे व आसपासच्या जिल्ह्य़ात या आजाराची साथ पसरण्याची शक्यता गृहीत धरून प्रतिबंध म्हणून पोलीस भरतीची प्रक्रिया तूर्त थांबविण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलीस भरतीची पुढील तारीख नंतर जाहीर केली जाईल. तथापि, यापूर्वी जाहीर केलेले जे उमेदवार अर्ज घेऊन येतील, त्यांचे अर्ज स्वीकारून त्यांना पोहोच दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

धनगर समाज महासंघाचा आज सांगलीमध्ये मोर्चा
इस्लामपूर, ९ ऑगस्ट/ वार्ताहर

महाराष्ट्र धनगर समाज महासंघ सांगली जिल्ह्य़ाच्या वतीने धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवार, १० ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे धनगर समाज महासंघाचे राज्य चिटणीस नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे यांनी सांगितले.
महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सांगली येथील राम मंदिरपासून सोमवारी सकाळी अकरा वाजता या मोर्चास सुरुवात होऊन तो स्टेशन चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश झाला पाहिजे, या मागणीसाठी हा मोर्चा आहे. राज्य शासनाच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश होत नसल्याचा आरोप करून यामुळे धनगर समाज औद्योगिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मागे पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

विहिरीच्या पाण्यावरून तरुणाचा खून; तिघे अटकेत
इचलकरंजी, ९ ऑगस्ट/वार्ताहर
शेतातील सामूहिक विहिरीतील पाण्याचा पाईप नेण्याच्या वादातून नरंदे (ता.हातकणंगले) येथे सर्जेराव रामचंद्र अणुसे (वय २०) याचा तिघाजणांनी खून केला. या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी रविवारी सर्जेरावचा चुलता विठ्ठल सिद्धू अणुसे, चुलतभाऊ मंगू अणुसे, वहिनी विजयमाला यांना अटक केली. नरंदे येथील माईनबुडी या भागात सर्जेराव अणुसे व विठ्ठल अणुसे या चुलत्या-पुतण्यांचे शेत आहे. दोघांच्या शेतात सामूहिक विहिरीतून पाणीपुरवठा होतो. शनिवारी सायंकाळी विहिरीतील पाईप नेल्यावरून सर्जेराव व विठ्ठल यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. सर्जेराव हा गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा असल्याने त्याच्याकडून आगळीक घडण्यापूर्वी मंगू अणुसे याने त्याला पाठीमागून धरून ठेवले, तर विठ्ठलने खोऱ्याने सर्जेरावच्या डोक्यावर घाव घालण्यास सुरुवात केली.या मारामुळे गंभीर अवस्थेतील सर्जेरावला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना आज दुपारी त्याचा मृत्यू झाला.

आटपाडीत गटसचिवांचे लेखणी बंद आदोलन
आटपाडी, ९ ऑगस्ट/ वार्ताहर
शासकीय सेवेत गटसचिवांना सामावून घ्यावे व प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी आटपाडी तालुक्यातील २३ गट सचिवांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. गट सचिवांच्या या आंदोलनामुळे विविध कार्यकारी संस्थांचे कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्य़ातील सर्व गटसचिव सांगली जिल्हा परिषदेवर आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात सर्व गट सचिवांनी सहभागी होण्याचे आवाहन सचिव संघटनेचे अध्यक्ष दुर्योधन चव्हाण, सदस्य बाबुराव विभुते व बाळासाहेब सपाटे यांनी केले आहे.