Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

लोकलला धडकली लोकल!
नऊ प्रवासी जखमी
रेल्वेमार्फत चौकशीचे आदेश

मुंबई, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

माहीम रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एका बोरिवली लोकलला आज दुपारी मागून आलेल्या अंधेरी लोकलने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. दोन्ही लोकलचे मोटरमन व गार्ड मात्र आश्चर्यकारकरीत्या या अपघातातून बचावले. मानवी चुकीमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, रेल्वे सुरक्षितता आयुक्तांमार्फत (सीआरएस) या अपघाताची चौकशी केली जाणार आहे. पश्चिम रेल्वेवरील जम्बो ब्लॉकमुळे चर्चगेटहून दुपारी १२.३८ वाजता निघालेली नऊ डब्यांची बोरिवली लोकल दुपारी सव्वा एकच्या सुमारास माहीम स्थानकातील फलाट क्रमांक एकवर उभी होती. त्याचवेळी मागून आलेली अंधेरी लोकल वेगामध्ये जाऊन तिच्यावर आदळली. ही लोकल दुपारी १२.४१ वाजता चर्चगेटहून रवाना झाली होती. या धडकेमुळे मोठा आवाज होऊन, धुरळा आसमंतात उडाला. दोन्ही लोकलमधील प्रवाशांना जोरदार हादरा जाणवला आणि अनेकजण एकमेकांच्या अंगावर कोसळले. या जोरदार आवाजाने अनेकांना बॉम्बस्फोट झाल्याची शंका आल्याने लोकलमधल्या प्रवाशांनी पटापट खाली उडय़ा मारल्या आणि रेल्वे स्थानकात एकच पळापळ सुरू झाली.

टोलनाक्यांचा मलिदा आणि निवडणुकांचे निधी संकलन
मुंबई, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

बिल्डर-कॉन्ट्रॅक्टर, लँड माफिया, नोकरशहा आणि आघाडी सरकारमधील काही मंत्री यांनी मिळून काही हजार कोटी रुपयांचे एक महाजाल उभे केले आहे. हे महाजाल निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उभे केले गेलेले असून फक्त आघाडीतील पक्षांनांच नव्हे तर काही विरोधी पक्ष नेते व त्यांच्या संबंधातील बिल्डर्स यांनाही त्यात सामील करून घेतले आहे. वरवर मुंबई-महामुंबईचा विकास, रस्ते-महारस्ते, फ्लाय ओव्हर्स, आधुनिकिकरण यांचे महाप्रकल्प तयार करून कोटय़वधी रुपये आपल्या खासगी कंपन्यांमध्ये किंवा खिशांमध्ये घालण्याचा हा मोठा डाव आहे. मुंबईतील सर्व सत्तावीस उड्डाणपूल, खाडी पूल, पादचारी सब वे, रेल्वे ओव्हर आणि अंडर ब्रीज तसेच पाच मोठे चौक यांची देखभाल करण्याच्या बदल्यात मुंबईत प्रवेश करण्याच्या पाचही प्रवेशद्वारांवरचे टोल वसुलीचे कंत्राट एकाच कंपनीकडे सोपविण्याचा आणि त्याच्या जोडीने शीव-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करुन त्यासाठी येणारा खर्चही त्याच रस्त्यावर आणखी एक टोलनाका उभारुन त्यातून वसुल करण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय वादाचा भोवऱ्यात अडकला आहे.

भाजपचे ‘चलेजाव’ आंदोलन
राज्यात तीन लाख कार्यकर्त्यांना अटक
मुंबई, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

महागाई, दुष्काळाचे सावट, कायदा व सुव्यवस्था, वीज टंचाई आदी समस्यांना जबाबदार असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना सत्तेवरून ‘चलेजाव’चा इशारा देण्याकरिता प्रदेश भाजपच्यावतीने आज राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, विधानसभेतील गटनेते एकनाथ खडसे, सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी रस्ता रोको केला. याकरिता सुमारे तीन लाख कार्यकर्त्यांना नेत्यांसह पोलिसांनी अटक केली, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली. मुंबईतील वांद्रे, धारावी येथे पोलिसांनी केलेला लाठीमार, उद्गीर येथे आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीमारात २० व्यक्ती जखमी झाल्या. जमावाला पांगविण्याकरिता अश्रूधुराचाही वापर करण्यात आला.

शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाचा
राज्यातील स्वाईन फ्लू नियंत्रणात - मुख्यमंत्री
मुंबई ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

राज्यात विशेषत: मुंबई, पुण्यातील स्वाईन फ्ल्यूची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करीत असतानाच तिचा फैलाव रोखण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कोअर ग्रूपची स्थापना करण्यात आल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जाहीर केले. या कोअर ग्रूपतर्फे प्रभावी प्रतिबंधात्मक योजना आणि तिची अंमलबजावणी यावर देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच स्वाईन फ्लूच्या भीतीने राज्यातील शाळा सरसकट बंद ठेवण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसून संबंधित शाळा व्यवस्थापनाने त्याबाबतचा निर्णय घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केले.

युद्ध आमुचे सुरू!
बळी क्र. ३ पुणे

मुंबईत स्वाइन फ्लूने शनिवारी पहिला बळी घेतल्यानंतर ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या एका ४२ वर्षीय शिक्षकाचा श्वसनाचा विकार बळावल्याने स्वाइन फ्लूने आज मध्यरात्री मृत्यू झाला. संजय तुकाराम कोकरे (वय ४२, रा. बोरीपारथी, ता. दौंड) या शिक्षकाला ताप, सर्दी खोकल्याच्या त्रासामुळे हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात काल दाखल करण्यात आले होते. तेथून आज सकाळी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. नाक व घशातील द्रवाचे नमुने घेऊन राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आले होते. त्या संस्थेकडून शनिवारी संध्याकाळी या शिक्षकाला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान करण्यात आले. तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही त्याच्यावर उपचार कायम ठेवण्यात येत होते, तसेच श्वसनाचा विकार बळावल्याने त्याला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते.
बळी क्र. ४ अहमदाबाद
येथील सरकारी रूग्णालयात आज सकाळी स्वाइन फ्लू झालेल्या एका अनिवासी भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचे वय ४३ वर्षे होते. गुजरातचे आरोग्य सचिव रवी सक्सेना यांनी सांगितले की, प्रवीण पटेल या अनिवासी भारतीयाचा पहाटे दीड वाजता सरकारी रूग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. काल सकाळी गंभीर अवस्थेत त्यांना सरकारी रूग्णालयात आणले होते, त्यांचे डावे फुफ्फुस निकामी झाले होते. पटेल हे अमेरिकेतील अ‍ॅटलांटा येथून ३१ जुलैला परत आले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांना न्यूमोनिया व साध्या फ्लूमुळे खासगी रूग्णालयात दाखल केले होते, तो साधा फ्लू नाही हे लक्षात आल्यावर डॉक्टरांनी त्यांना सरकारी रूग्णालयात पाठवले होते. नंतर चाचण्या केल्या असता त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले होते.

आरोग्यमंत्री राजीनामा द्या!
रिदाची आई शिरीन शेख यांनी सांगितले की, रिदाला तीन रुग्णालयांमध्ये नेण्यात आले व त्यामुळे दरम्यानच्या काळात तिच्यापासून ८५ लोकांमध्ये हा रोग पसरला असा आरोप आझाद यांनी केला आहे. ते म्हणतात त्या तीन रुग्णालयांची नावे त्यांनी सांगावीत. आमच्या मुलीच्या मृत्यूनंतर या रोगाबाबत जागृती निर्माण झाली. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी केलेले विधान बेजबाबदारपणाचे आहे. एकतर त्यांनी माफी मागावी किंवा राजीनामा द्यावा.

दिलगिरी व्यक्त करतो!
आपल्या वक्तव्याने रिदाच्या आईच्या मनात काही गैरसमज निर्माण झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या वक्तव्याचा जो अर्थ लावला गेला तसे मला म्हणायचे नव्हते. सध्या स्वाइन फ्लूची लस तयार करण्यासाठी तीन भारतीय कंपन्यांना परवानगी दिली आहे,परंतु जर दुसऱ्या एखाद्या देशाने लस त्याआधाी विकसित केली तर ती स्वीकारली जाईल असेही त्यांनी सांगितले. स्वाइन फ्लूचा प्रसार टाळण्यासाठी लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

प्रत्येक शुक्रवारी