Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

आठ संशयितांचे नमुने तपासणीसाठी रवाना
औरंगाबाद, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी
स्वाईन फ्लू झाला असल्याचा संशय व्यक्त केलेल्या ८ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या आठ रुग्णांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचे सांगण्यात आले होते. मात्र रुग्णांनी नकार दिला. तसे असले तरी या संशयीतांनी बाहेर फिरू नये, असे बजावण्यात आले आहे.

उपचाराचे साहित्य तातडीने खरेदी करण्याचा पालिकेचा निर्णय
ठेकेदारांचे यश; शासनाकडून मिळणाऱ्या साहित्याचे काय?

औरंगाबाद, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

राज्यातील मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये स्वाईन फ्लूमुळे रुग्णांचा मृत्यू झाला. आपल्याकडे हा फ्लू आला तर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी उपचारासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याचा निर्णय महापौर विजया रहाटकर यांनी घेतला असून गुरुवारी (१३ ऑगस्ट) ला होणाऱ्या सर्वसाधारणसभेत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे गुरुवारपासूनच मास्क तसेच अन्य साहित्य पुरविणाऱ्या ठेकेदारांनी पालिकेत अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांकडे चकरा मारण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मेहनतीला यश आल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. या संसर्गजन्य रोगासाठी लागणारी सर्व उपकरणे शासनाकडून पालिकांना मोफत मिळणार असल्यामुळे खरेदीचा प्रश्नच येत नाही, असे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.

भाजपच्या ‘जेल भरो’ आंदोलनाला मराठवाडय़ात चांगला प्रतिसाद
प्रतिनिधी व ठिकठिकाणच्या वार्ताहराकडून

औरंगाबाद, ९ ऑगस्ट

भारतीय जनता पक्षाच्या जेलभरो आंदोलनाला आठही जिल्ह्य़ांत चांगला प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी आणि बीड या आठ जिल्ह्य़ांतील जवळपास ६० हजार कार्यकर्ते व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अटक करवून घेतली. राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. राज्यातील सर्वच आघाडय़ांवर या सरकारला अपयश आले आहे. सध्या राज्यभर थैमान माजलेल्या स्वाईन फ्लूच्या नियंत्रणातही राज्य सरकारला अपयश आल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे.

उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायसंकुलाचे भूमिपूजन
सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न हवेत - न्या. स्वतंत्रकुमार

उस्मानाबाद, ९ ऑगस्ट/वार्ताहर

समाजातील सर्वसामान्य व तळागाळातील व्यक्तींना न्याय मिळवून देणारी न्यायप्रदान व्यवस्था राबविण्यासाठी न्यायाधीश आणि वकील यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांनी येथे केले.येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायसंकुल या विस्तारित इमारतीचा भूमिपूजन समारंभ मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांच्या हस्ते रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्यायमूर्ती व उस्मानाबाद जिल्ह्य़ाचे पालक न्यायाधीश एस. बी. देशमुख, प्रधान जिल्हा न्यायाधीश गुणवंत कुबडे, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य अ‍ॅड्. राम गरड, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष नंदकिशोर पाटील यांनी उपस्थित होते.

बापू
मराठीतील नामवंत समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या वयाला सोमवारी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचे स्नेही न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेल्या त्यांच्या व्यक्तिचित्रातील संपादित भाग देत आहोत. शिकवणे हे बापूच्या कामापैकी सर्वात जास्त आनंदाचे काम आहे. बापूची शिकवण्यातील तळमळ विद्यार्थ्यांच्या अंत:करणाला जाऊन भिडत असे. चांगल्या शिक्षकाचे मोल विद्यार्थ्यांना कोणी सांगावे लागत नाही.

डॉ. सुधीर रसाळ यांच्या पुस्तकांचे आज प्रकाशन
औरंगाबाद, ९ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख डॉ. सुधीर रसाळ यांच्या वयाला सोमवारी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याबद्दल सोमवारी सायंकाळी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. डॉ. रसाळ यांचे शिक्षक आणि ज्येष्ठ साहित्यिक भगवंतराव देशमुख हे पुष्पहार घालून त्यांना शुभचिंतन करणार आहेत. मौज प्रकाशनतर्फे प्रकाशित डॉ. सुधीर रसाळ यांच्या ‘वाङ्मयीन संस्कृती’ आणि ‘ना. घ. देशपांडे यांची कविता’ या दोन पुस्तकांचे प्रकाशनही केले जाणार आहे.त्यानंतर ख्यातनाम गायिका श्रीमती सुहासिनी कोरटकर यांचे गायन आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.

गंगाबाई पवार यांचे निधन
नांदेड, ९ ऑगस्ट/वार्ताहर

बारड येथील रहिवासी गंगाबाई दिगंबर पवार यांचे रविवारी दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६५ वर्षाच्या होत्या.कै. गंगाबाई पवार यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बारड येथील पत्रकार श्याम पवार यांच्या त्या मातोश्री होत.

शेतक ऱ्याचा मृत्यू
औरंगाबाद, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी
मोटारीची दुरुस्ती सुरू असताना तोल गेल्याने विहिरीत पडून एका ५५ वर्षाच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी तालुक्यातील आपतभालगाव येथे घडली. रामभाऊ धोंडिबा पाखरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

स्वाईन फ्लूमुळे पोलीस भरती रद्द
नांदेड, ९ ऑगस्ट/वार्ताहर
राज्याच्या वेगवेगळ्या भागात स्वाईन फ्लूचा फैलाव झाल्याने बहुतांश जिल्ह्य़ात उद्यापासून एकाच वेळी होणारी पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे.वेगवेगळ्या जिल्ह्य़ात रिक्त झालेल्या जागांवर एकाच वेळी पोलीस भरती होणार होती. १० ऑगस्टपासून होणाऱ्या या पोलीस भरतीसाठी राज्याच्या अन्य जिल्ह्य़ांप्रमाणेच नांदेड पोलीस प्रशासनानेही तयारी केली होती. राज्याच्या काही भागात स्वाईन फ्लूचा फैलाव झाल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने सर्वच जिल्ह्य़ातल्या पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. नांदेड जिल्ह्य़ात ४६ जागांसाठी पोलीस भरती होणार होती. दरवर्षी ११ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. साधारणत: नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात ही भरती होईल. या भरतींसोबत रिक्त पदांची भरतीही करण्यात येईल, असे सांगण्यात आले. भरती संदर्भात देण्यात आलेल्या जाहिराती तसेच साहित्य खरेदीचा खर्च पाण्यात गेल्याचे मानले जाते.

स्वाइन फ्लूच्या भीतीने तपासणीसाठी गर्दी
सोयगाव, ९ ऑगस्ट/वार्ताहर

येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील ८०० पैकी ३०० मुले आजारी पडल्याने घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी केली. सध्या राज्यात स्वाईन फ्ल्यूची लागण बहुतांश शाळकरी विद्यार्थ्यांला होत आहे; त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी स्वाइन फ्लूचा धसका घेतला आहे. येथील जिल्हा परिषद शाळेतील बहुतांश विद्यार्थी सर्दी, ताप, खोकल्याने आजारी आहेत. हे पाहून मुख्याध्यापकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांची तपासणी करण्याची विनंती केली. मात्र ग्रामीण रुग्णालयातच पेशंटची गर्दी असल्याने डॉक्टर वेळेवर शाळेत गेले नाहीत. ३०० विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात गेल्याने एकच गोंधळ झाला. पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. नजीब शहा यांनी रुग्णालयातील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना औषधे दिली. मात्र स्वाइन फ्लूचे लक्षण न आढळल्याने सर्वानी सुटकेचा म्नि:श्वास सोडला.

नागनाथ बँक अध्यक्षपदी अ‍ॅड. सतीश देशमुख
हिंगोली, ९ ऑगस्ट/वार्ताहर
माजी खासदार विलास गुंडेवार यांच्या प्रयत्नातून हिंगोली येथील चालू असलेल्या नागनाथ अर्बन बँकेच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी निवड झाली. बँक अध्यक्षपदी अ‍ॅड. सतीश देशमुख तर उपाध्यक्षपदी सीताराम महाजन यांची बिनविरोध निवड झाली. नागनाथ बँक पदाधिकाऱ्यांच्या होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्य़ाचे लक्ष लागले होते. अध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, अ‍ॅड. सतीश देशमुख, खंडेराव सरनाईक व विलास गुंडेवार यांचे उमेदवारी अर्ज होते. अखेर चर्चेतून अ‍ॅड. सतीश देशमुख यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी सीताराम महाजन यांची निवड झाली.

मधमाशांचे पोळे स्वत:च काढण्याचा अजब आदेश
सोयगाव, ९ ऑगस्ट/वार्ताहर
ऐतिहासिक पर्यटनस्थळावर असलेले मधमाश्यांचे पोळे स्वत:च्या जबाबदारीवर काढावे असे अजब आदेश पुरातत्त्व खात्याने काढले आहे. वेताळवाडी किल्ल्यात प्रवेशद्वारावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यातील मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. तेव्हा पुरातत्त्व खात्याच्या कर्मचाऱ्यांनी हे पोळे काढण्याचे पत्र वरिष्ठांना दिले. तेव्हा वरिष्ठांनी सांगितले की, मधमाशांचे पोळे जो काढील त्याने स्वत: त्याची जबाबदारी घ्यावी. काही दुर्घटना झाल्यास पुरातत्त्व खाते जबाबदार राहणार नाही या अजब आदेशामुळे अनेक वर्षापासून मधमाशांचे पोळे कुणी काढायला तयार होत नाही. त्यामुळे अनेक ऐतिहासिक पर्यटनस्थळावर मधमाशांच्या पोळ्यांची संख्या वाढली असून पर्यटक मात्र भीतीच्या सावटात आहे.

महागाईच्या निषेधार्थ मोर्चा
सोयगाव, ९ ऑगस्ट/वार्ताहर
वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चा काढला. त्यात तालुका अध्यक्ष कैलास काळे, जि.प. सदस्य शिवाजी बुढाळ, संजय मंडवे, मोतीलाल वाघ, रामभाऊ पठाडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी होते.

अतिसाराची साथ आटोक्यात
सोयगाव, ९ ऑगस्ट/वार्ताहर
तालुक्यातील डाभा येथे अतिसाराची लागण झालेल्या ९ रुग्णांना बरे वाटल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. गावात कुठेही अतिसाराचा नवीन रुग्ण नसल्याने साथ आटोक्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वराडे यांनी सांगितले. गावात असलेल्या विहिरीजवळ घाण साचल्याने दूषित झालेले पाणी गावकऱ्यांनी प्याल्यामुळे या आजाराची लागण झाली; त्यामुळे गावात स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खडके यांनी सांगितले.

पाणीयोजनेसाठी ११ ला मोर्चा
वसमत, ९ ऑगस्ट/वार्ताहर
वसमत आणि औंढा तालुक्यातील सुमारे ३५ गावांचे दुष्काळी कोरडवाहू शेतजमिनीस पाणी मिळावे म्हणून सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना तयार करण्यात आली आहे. याबाबत शासनाने तांत्रिक मान्यताही दिली आहे. ही योजना त्वरित पूर्ण व्हावी यासाठी संघर्ष समितीने चार वर्षापासून सतत पाठपुरावा करीत निवेदने, शिष्टमंडळे, उपोषण, सभा घेतल्या; परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला असून औंढा तालुक्यासाठी सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना झालीच पाहिजे, या मागणीसाठी उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा संघर्ष समितीतर्फे ११ ऑगस्टला दुपारी १२ वा. निघणार आहे. त्यामुळे वसमत आणि औंढा तालुक्यातील जनतेने हजारोंच्या संख्येने याप्रसंगी सामील व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड्. रमेश अंबेकर यांनी केले आहे.

‘बुद्ध आणि धम्म’चे ग्रंथवाचन
लोहा, ९ ऑगस्ट/वार्ताहर
बेरळी येथे वर्षावासानिमित्त बुद्ध आणि धम्म या ग्रंथांचे वाचन सुरू करण्यात आले आहे. उपासक प्रभाकर बुद्धे ग्रंथवाचन तर अर्थ तुकाराम कांबळे विशद करीत आहेत. संभाजी टोंगरे, दिलीप डोंगरे, व्यंकट रायबोले, संग्राम बुद्धे, सोपान रायबोळे, उत्तम गायकवाड यासाठी परिश्रम घेत आहेत. दरवर्षी वर्षावासानिमित्त येथे धार्मिक कार्यक्रम होत असतो.

संपामुळे पशुपालक त्रस्त
सोयगाव, ९ ऑगस्ट/वार्ताहर
खासगी व्यवसायाला परवानगी मिळावी म्हणून गेल्या १५ दिवसांपासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी संप पुकारल्याने मुक्या प्रश्नण्यांची आरोग्य सेवा विस्कळित झाली आहे.खराब हवामानामुळे अनेक जनावरे आजारी असून त्यांना सोयगावातील एकमेव पशु दवाखान्याचा आधार आहे. मात्र डॉक्टर मंडळी संपावर असल्याने व तालुक्यात एकही खासगी जनावरांचा डॉक्टर नसल्याने अनेक जनावरांची प्रकृती गंभीर झाली आहे.

मोहन प्रकाश यांचा दौरा
बीड, ९ ऑगस्ट/वार्ताहर
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य मोहन प्रकाश ११ ऑगस्टला जिल्ह्य़ात येत असून सहाही विधानसभा मतदारसंघांतील पक्षकार्यकर्त्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस नवनाथ थोटे यांनी दिली आहे.बीड जिल्ह्य़ात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षाची परिस्थिती आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा प्रभारी मोहन प्रकाश ११ ऑगस्टला जिल्ह्य़ात येत आहेत. शिवसांस्कृतिक भवनात सकाळी १० वा. पक्षकार्यकर्त्यांच्या भेटी, त्यानंतर पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, माजी खासदार, आमदार, मागील निवडणुकीत विजयी, पराभूत उमेदवार आदींची भेट घेणार आहेत. तरी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन थोटे यांनी केले आहे.

‘जिव्हेश्वर जन्मोत्सव’चे प्रकाशन
परळी वैजनाथ, ९ ऑगस्ट/वार्ताहर
परळी येथील श्री जिव्हेश्वर अ‍ॅड्स निर्मित व स्वकुळ साळी समाज यांच्या सहकार्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव स्मरणिकेचे प्रकाशन बीड जिल्ह्य़ाचे भूमिपुत्र तथा जिल्हाधिकारी मोहनराव कट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांतराव शेळके उपस्थित होते. जिल्हाधिकारी मोहनराव कट्टे यांचा परळी स्वकुळ साळी समाजाच्या वतीने बनसोडे गुरुजी यांनी सत्कार केला. या प्रकाशन सोहळ्यास स्मरणिकेचे मुख्य संपादक पद्माकर भंडारे, राजेश नाजरे, मच्छिंद्र भंडारे, डॉ. रवींद्र गायकवाड यांच्यासह समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

भाजपाचा युवक मेळावा
अंबाजोगाई, ९ ऑगस्ट/वार्ताहर

‘भाजयुमो’ने १२ ऑगस्टला मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी सहा वाजता युवक मेळावा आहे. यावेळी धनंजय मुंडे, आर. टी. देशमुख, दत्ता पाटील, शामराव आपेट, अच्युत गंगणे, राम कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी राजपाल लोमटे हे राहणार आहेत. तरी या युवक मेळाव्यास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नायब तहसीलदारांची पदे भरली
नांदेड, ९ ऑगस्ट/वार्ताहर

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या औरंगाबाद महसूल विभागातील रिक्त असलेल्या ८३ नायब तहसीलदारांची पदे पदोन्नतीने भरण्यात आली असून त्यात जिल्ह्य़ातल्या आठ जणांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्य़ातील मंडल अधिकारी एस. डी. भाले, भाऊराव चव्हाण, यु. वाय. बंपलवार, अव्वल कारकून संवर्गातील बन्सीधर येवतीकर, एस. बी. सोनी, शेख अहेमद, रऊफ खान असदखान, यु. एन. कागणे यांचा पदोन्नती मिळालेल्यांमध्ये समावेश आहे. महसूल खात्यातील पदोन्नतीचा प्रश्नही या निमित्ताने मार्गी लागला आहे. नायब तहसीलदारांची पदे भरण्यात आल्याचे सर्वसामान्यांची कामे गतीने होतील, असे मानले जाते.