Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

लोकलला धडकली लोकल!
नऊ प्रवासी जखमी
रेल्वेमार्फत चौकशीचे आदेश
मुंबई, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

माहीम रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एका बोरिवली लोकलला आज दुपारी मागून आलेल्या अंधेरी लोकलने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. दोन्ही लोकलचे मोटरमन व गार्ड मात्र आश्चर्यकारकरीत्या या अपघातातून बचावले. मानवी चुकीमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, रेल्वे सुरक्षितता आयुक्तांमार्फत (सीआरएस) या

 

अपघाताची चौकशी केली जाणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील जम्बो ब्लॉकमुळे चर्चगेटहून दुपारी १२.३८ वाजता निघालेली नऊ डब्यांची बोरिवली लोकल दुपारी सव्वा एकच्या सुमारास माहीम स्थानकातील फलाट क्रमांक एकवर उभी होती. त्याचवेळी मागून आलेली अंधेरी लोकल वेगामध्ये जाऊन तिच्यावर आदळली. ही लोकल दुपारी १२.४१ वाजता चर्चगेटहून रवाना झाली होती. या धडकेमुळे मोठा आवाज होऊन, धुरळा आसमंतात उडाला. दोन्ही लोकलमधील प्रवाशांना जोरदार हादरा जाणवला आणि अनेकजण एकमेकांच्या अंगावर कोसळले. या जोरदार आवाजाने अनेकांना बॉम्बस्फोट झाल्याची शंका आल्याने लोकलमधल्या प्रवाशांनी पटापट खाली उडय़ा मारल्या आणि रेल्वे स्थानकात एकच पळापळ सुरू झाली.
या अपघातात पाच पुरुष व चार महिला प्रवासी किरकोळ जखमी झाले. सायन रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. राजेश बिंद (वय-२२/ रा.-धारावी), हितेश रामचंदानी (२४/ दिवा), सुशिला कुंचिकोरले (४०/ माटुंगा), नेत्रा राणे (२१/ सांताक्रूझ), अविनाश भडांगे (२४/ माटुंगा), उषा तलसानिया (३६ / दादर), आशा उगारनिया (२८/ दादर), दत्तात्रय काळे (६८/ माटुंगा) आणि निलेश कावळे (३० / वाकोला) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक आर. एस. चूग यांनी केवळ सहा प्रवासी जखमी झाल्याचे सांगून, त्यांना रेल्वे स्थानकाच प्रथमोपचार करून घरी पाठविल्याचे स्पष्ट केले. दोन्ही लोकलच्या एकमेकांवर आदळलेल्या डब्यांचे दर्शनी भाग या अपघात पूर्णत: चेपले गेले. या धडकेची तीव्रता इतकी होती की, बोरिवली लोकलच्या शेवटच्या डब्याची बोगी फ्रेम जवळपास फूटभर आतमध्ये घुसली व कंपार्टमेंटचे पत्रे बाहेर आले. गार्ड केबिन व तिच्यातील यंत्रणा पूर्णत: उद्धवस्त झाली. शेजारच्या माल डब्यातील फूटबोर्डचे पत्रे उखडून तेथे मोठे खिंडार पडले. फुटबोर्डचे पत्रे जवळपास चार-पाच फूटापर्यंत उंचावल्याचे दिसत होते. अंधेरी लोकलच्या मोटरमन केबिनचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती. अंधेरी लोकलचे मोटरमन संदीप कोल्हे तसेच बोरिवली लोकलचे गार्ड बी. पी. मिश्रा हे दोघेही या अपघातातून आश्चर्यकारकरीत्या सुखरुप बचावले. धडक होण्याच्या काही क्षण आधी दोघांनीही फलाटावर उडय़ा मारल्याने, ते बचावल्याचे समजते. बोरिवली लोकलचे मोटरमन नायर प्रसाद नारायणस्वामी आणि अंधेरी लोकलचे गार्ड बी. पी. सिंग यांनादेखील कोणतीही दुखापत झाली नाही.