Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाचा
राज्यातील स्वाईन फ्लू नियंत्रणात - मुख्यमंत्री
मुंबई ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

राज्यात विशेषत: मुंबई, पुण्यातील स्वाईन फ्ल्यूची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करीत असतानाच तिचा फैलाव रोखण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कोअर ग्रूपची स्थापना करण्यात आल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जाहीर केले. या कोअर ग्रूपतर्फे

 

प्रभावी प्रतिबंधात्मक योजना आणि तिची अंमलबजावणी यावर देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच स्वाईन फ्लूच्या भीतीने राज्यातील शाळा सरसकट बंद ठेवण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसून संबंधित शाळा व्यवस्थापनाने त्याबाबतचा निर्णय घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केले.
पुण्यानंतर आता राज्याच्या प्रमुख शहरांतही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळू लागल्याने जनतेत घबराट पसरली आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी आपल्या वर्षां निवासस्थानी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते.
इन्फल्युएंझा ए (एच १ एन १ ) अर्थात स्वाईन फ्लू नियंत्रणात असल्याची माहिती या आढावा बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात स्वाईन फ्लूविरोधी औषधांचा पुरेसा साठा आहे. केंद्र सरकारने टॅमिफ्लू गोळ्यांचा साठा पाठवून दिला आहे. एन ४५ हा मास्क आजाराचा संसर्ग झालेला रुग्ण, उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनीच वापरण्याची आवश्यकता असून अन्य जनतेने हातरुमाल वा साधा मास्क वापरला तरी चालेल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. मात्र सद्य स्थिती पाहता सार्वजनिक ठिकाणी जाणे जनतेने शक्यतो टाळावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
राज्यात स्वाईन फ्लूविरोधी औषधांचा पुरेसा साठा आहे. केंद्र सरकारने टॅमिफ्लू गोळ्यांचा साठा पाठवून दिला आहे. मात्र सद्य स्थिती पाहता सार्वजनिक ठिकाणी जाणे जनतेने शक्यतो टाळावे
मुख्यमंत्री अशोक चव्हाण
राज्यातील शाळा, महाविद्यालये, नाटय़गृहे, सिनेमागृह अशी जी सार्वजनिक ठिकाणे आहेत जेथे लोक मोठय़ा संख्येने जमा होतात ती पुढील आठ दिवस बंद करणे गरजेचे आहे.
उद्धव ठाकरे