Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

भाजपचे ‘चलेजाव’ आंदोलन
राज्यात तीन लाख कार्यकर्त्यांना अटक
मुंबई, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

महागाई, दुष्काळाचे सावट, कायदा व सुव्यवस्था, वीज टंचाई आदी समस्यांना जबाबदार असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना सत्तेवरून ‘चलेजाव’चा इशारा देण्याकरिता प्रदेश

 

भाजपच्यावतीने आज राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, विधानसभेतील गटनेते एकनाथ खडसे, सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी रस्ता रोको केला. याकरिता सुमारे तीन लाख कार्यकर्त्यांना नेत्यांसह पोलिसांनी अटक केली, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली.
मुंबईतील वांद्रे, धारावी येथे पोलिसांनी केलेला लाठीमार, उद्गीर येथे आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीमारात २० व्यक्ती जखमी झाल्या. जमावाला पांगविण्याकरिता अश्रूधुराचाही वापर करण्यात आला. पूर्णा येथे १२ हजारांचा जमाव अटक करवून घेण्याकरिता पोलीस ठाण्यात शिरल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अशा काही किरकोळ घटना वगळता ‘चलेजाव’ आंदोलन शांततेत पार पडले, असा दावा करणाऱ्या भांडारी यांनी भाजपचा स्वभाव शांततेत आंदोलन करण्याचा असल्याचे मत व्यक्त केले.
गोपीनाथ मुंडे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले. आता हे सरकार हटवूनच थांबायचे, असा निर्धार मुंडे यांनी व्यक्त केला. अंधेरी येथे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी तर नागपूरमध्ये एकनाथ खडसे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.