Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

प्रादेशिक

सार्वजनिक ठिकाणे बंद करा -उद्धव ठाकरे
मुंबई, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

राज्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लूने थैमान घातले असल्याने शाळा, महाविद्यालये, नाटय़गृह आदी सार्वजनिक ठिकाणे आठ दिवस बंद करण्याची मागणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरे यांनी आपला ‘शिवसंवाद’ दौरा पुढे ढकलून मुंबईत स्वाईन फ्लूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याकरिता मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या प्रयत्नांवर देखरेख करण्याचा निर्णय घेतला आहे.विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले की, स्वाईन फ्लूचा विषाणू राज्यात मुक्तसंचार करीत असताना राज्याचे मुख्यमंत्री एका अभिनेत्रीसोबत व्यायाम करीत असल्याचे छायाचित्र पाहायला मिळत आहे.

एसटी प्रवांशाना सुखद अनुभवही मिळतो तेव्हा..
मुंबई, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे नाव निघताच क्षणार्धात डोळ्यासमोर येतात त्या पार उद्ध्वस्त स्थितीतील गाडय़ा आणि ठिकठिकाणच्या एसटी आगारांतील सार्वजनिक स्वच्छतेबाबतची भयाण स्थिती. मात्र याच महामंडळाच्या कारभाराची दुसरी टोकाची बाजूही आहे आणि ती प्रवाशांबाबत दाखवल्या जाणाऱ्या अगत्याची आणि प्रवाशांच्या तत्परतेने घेतल्या जाणाऱ्या काळजीची आहे. गेल्या महिनाभरातील दोन घटनांनी महामंडळाच्या या दुसऱ्या चांगल्या बाजूवर शिक्कामोर्तब केले आहे.

पं. जसराज आळवणार कृष्णगीते !
मुंबई, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

कृष्ण सर्व रूपांत भेटतो. कोणाला तो आपला भाऊ वाटतो, कोणाला पुत्र, कोणाला मित्र तर कोणाला प्रियकर. त्याची भजने गाताना एक वेगळाच अनुभव मिळतो. हा आनंद शब्दांत वर्णन करता येऊ शकत नाही..संगीत मरतड पंडित जसराज सांगत होते. येत्या १२ ऑगस्ट रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी सात वाजता ‘गोविंद दामोदर माधवेती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पंडित जसराज यांनी कृष्णाबद्दलची वाटणारे भाव मनमोकळेपणे व्यक्त केले.

‘वॉर्निग सिस्टिम’ बंद असल्यामुळेच लोकलची धडक?
कैलास कोरडे , मुंबई, ९ ऑगस्ट

माहीम स्थानकातील आजचा अपघात अंधेरी लोकलच्या मोटरमनने सिग्नल तोडल्यामुळेच झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातप्रसंगी लोकलमधील ‘ऑक्झिलरी वॉर्निग सिस्टिम’ (एडब्ल्यूएस) बंद होती. ती कार्यरत असती, तर हा अपघात टळला असता, असे रेल्वेतील सूत्रांचे म्हणणे आहे. मोटरमनला सिग्नल ओलांडताना धोक्याची सूचना देणारी व प्रसंगी आपत्कालीन ब्रेक कार्यरत करून लोकल तात्काळ थांबविणारी ‘एडब्ल्यूएस’ यंत्रणा मध्य व पश्चिम रेल्वेच्या सर्व लोकलमध्ये आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतीबद्दल काँग्रेसच्या नेत्यांना चिंता
निवडणुकीत फटका बसण्याची भीती
मुंबई, ९ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतीचा फटका बसू शकतो त्यामुळे किंमती कमी करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे केली. जागावाटपात राष्ट्रवादीला जास्त जागा सोडू नयेत, अशीही भूमिका मांडण्यात आली.

टॅमी फ्लू झाले सरकारी लॉलीपॉप!
मुंबई, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

विदेशातून आयात झालेला स्वाईन फ्लू सरकारकरिता मोठा ताप झाला आहे. स्वाईन फ्लूच्या संशयित रुग्णांना त्यांच्या चाचणीचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच टॅमी फ्लू गोळ्या देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसे आदेश जारी केले आहेत. मात्र पुण्यातील नॅशनल इस्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी (एन.आय.व्ही.)चे संचालक ए. सी. मिश्रा यांनी टॅमी फ्लू गोळ्यांचे कुणीही सेवन करणे अत्यंत धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले.

कूपर रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट्सला
मुंबई, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

पश्चिम उपनगरातील पार्ले येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर. एन. कूपर रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून या योजनेचे काम मुंबईच्या युनिटी इन्फ्राप्रोजेक्टसला देण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या योजनेनुसार शहरातील हे पहिले ‘हरित’ रुग्णालय केले जाणार असून पर्यावरणाशी सुसंगत अशा सर्व आधुनिक संकल्पनांचा वापर रुग्णालयात केला जाणार आहे.

आणखी एका बीपीओ कर्मचाऱ्याची आत्महत्या
मुंबई, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या एका २२ वर्षांच्या कर्मचाऱ्याने सात मजल्याच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच आज पहाटे बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या आणखी एका कर्मचाऱ्याने चारकोप येथे गळफास लावून आत्महत्या केली. स्तवनकुमार सोनी (२२) असे या तरुणाचे नाव असून तो मालाड (प.) येथील ‘माईंडस्पेस’ या बीपीओ कंपनीत नोकरीला होता. शनिवारी रात्री कुटुंबियांसोबत जेवण केल्यानंतर स्तवन आपल्या खोलीमध्ये झोपायला गेला. पहाटे त्याचे वडील जेव्हा उठले त्या वेळी स्तवनचा पंख्याला गळफास लावलेला मृतदेह त्यांनी पाहिला. त्यांनी स्तवनच्या गळ्यातील दोर काढला आणि जवळच असलेल्या भगवती रुग्णालयात त्याला नेले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आत्महत्येपूर्वी स्तवनने कोणतेही पत्र लिहून ठेवलेले नसल्याने त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

राज्यभरातील पोलीस भरती पुढे ढकलली
मुंबई, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार उद्या, १० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी पोलीस भरती होणार होती. मात्र स्वाईन फ्लूच्या साथीच्या पाश्र्वभूमीवर ही पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच वृत्तपत्रांमधून भरतीची नवी तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. पी. श्रीवास्तव यांनी दिली आहे.