Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

ऑपरेशन कमांडो!
नगर, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पोलीस अधीक्षक कार्यालय व महापालिकेदरम्यानच्या परिसरात नेहमीप्रमाणे वर्दळ सुरु होती. सायंकाळी अचानक शहर वाहतूक कार्यालयाच्या मागील बाजूस गोळीबाराचा आवाज ऐकू येतो आणि एकच धावपळ सुरू होते.

शिक्षक बँकेच्या सभेत यंदाही गोंधळ
खोटय़ा नोटांचा पाऊस, धक्काबुक्की, निदर्शने..

नगर, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

प्रश्नथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत गोंधळाची परंपरा यंदाही कायम राखण्यात आली! खोटय़ा नोटांचा पाऊस, धक्काबुक्की, निदर्शने अशा गोंधळातच सर्व विषय अवघ्या १० मिनिटांत मंजूर करून घेऊन सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळली. बँकेची ९० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सुनील बनोटे होते. सत्ताधाऱ्यांविरुद्ध सदस्यांचा असंतोष लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पाचे मंगळवारी लोकार्पण
राजूर, ९ ऑगस्ट/वार्ताहर

अनेक अडथळे पार करीत साकारलेला घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्याचा कार्यक्रम ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता राज्याचे जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या हस्ते व ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता वि. चि. शेळके यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमास पालकमंत्री गणेश नाईक, मंत्री विजय वडेट्टीवार, डॉ. सुनील देशमुख, आमदार मधुकरराव पिचड, शहापूरचे आमदार महादू बरोरा, खासदार सुरेश टावरे, जलसंपदा सचिव गायकवाड, सचिव ए.बी. पाटील, मुख्य अभियंता विलास शेळके उपस्थित राहतील.

अट्टल गुन्हेगार माळी पोलिसांच्या जाळ्यात
राहुरी, ९ ऑगस्ट/वार्ताहर
शहरासह बारागाव नांदूर परिसरात दहशत माजविणारा, तसेच अनेक गुन्ह्य़ांमध्ये पोलिसांना चकवा देणारा सुभाष माळी हा अट्टल गुन्हेगार आज सकाळी साडेआठच्या सुमारास पोलिसांच्या जाळ्यात अडकला. दुचाकी वाहने, वीजपंप, केबल, स्टार्टर चोरणाऱ्या टोळीचा तो सूत्रधार आहे. याआधीही त्याला अटक झाली होती. मात्र, सुटकेनंतर त्याने पुन्हा उद्योग सुरू होते. पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्याकडून कडची, धारदार कुकरी व चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली.

पुण्यात आज बैठक; १५ कोटींचा निधी मिळणार
देहू, आळंदी, पंढरपूर विकास योजनेत नेवाशाचाही समावेश

राजू इनामदार , नगर, ९ ऑगस्ट

देहू, आळंदी, पंढरपूरच्या एकत्रित विकास योजनेत नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिराचा समावेश करून राज्य सरकारने वारकऱ्यांच्या भागवत धर्माची चौकडी पूर्ण केली आहे. देहू ते पंढरपूर या पालखीमार्गाचा विकास हे योजनेचे वैशिष्टय़ आहे. वारकरी पंथालाच नव्हे, तर एकूणच मराठी वाङमयाला ललामभूत असलेली ‘ज्ञानेश्वरी’ ज्ञानदेवांच्या मुखारविंदातून आली ती प्रथम नेवाशात. त्या अर्थाने नेवासे ज्ञानेश्वरीचे उगमस्थानच. देहू, आळंदी, पंढरपूर या वारकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्राहूनही पवित्र असणाऱ्या शहरांच्या विकासयोजनेत नेमके नेवासेच दुर्लक्षित होत होते.

श्रावणसरींत भिजण्याची पर्यटकांनी साधली पर्वणी!
अकोले, ९ ऑगस्ट/वार्ताहर

राज्यासह जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात पाऊस गायब असला, तरी भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात दोन-तीन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. शनिवार, रविवारच्या सुटीचे निमित्त साधून भंडारदऱ्यात वर्षासहलीसाठी मोठय़ा संख्येने आलेल्या पर्यटकांनी श्रावणसरी अंगावर झेलीत पावसात भिजण्याचा आनंद लुटला. दरम्यान, कालच्या तुलनेत आज पावसाचे प्रमाण कमी होते.

ठेकेदाराकडून निकष धाब्यावर
नेप्ती नाका-पत्रकार चौक रस्त्याच्या कामात मोठी अनियमितता
नगर, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी
नेप्ती नाका ते पत्रकार चौक या रस्त्याच्या कामात बेसुमार भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त होत असून, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नगर दौऱ्यात न्यू आर्ट्स महाविद्यालयासमोरचा भाग अवघ्या एका रात्रीत डांबरीकरण केल्याने पुष्टी मिळत आहे.

आजपासून होणारी पोलीस भरती स्थगित
नगर, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

उद्या (सोमवारी) येथे होणारी पोलीस भरती राज्यात सुरू असलेल्या स्वाइन फ्ल्यूच्या साथीच्या पाश्र्वभूमीवर स्थगित करण्यात आली. पोलीस शिपाई पदांसाठी ही भरती सुरू होणार होती. काही अपरिहार्य कारणांमुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार भरती पुढे ढकलण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक विजय चव्हाण यांनी सांगितले. भरती पुढे ढकलली असली, तरी जे उमेदवार उद्या येतील त्यांचे अर्ज स्वीकारून पोहोच देण्यात येईल. इतर उमेदवारांचे अर्ज नव्या तारखेला स्वीकारण्यात येतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. आज सायंकाळी चारच्या सुमारास भरती प्रक्रिया स्थगित करण्याचा फॅक्स चव्हाण यांना वरिष्ठांकडून प्रश्नप्त झाला. सरकारी पातळीवर स्थगितीचे कारण स्पष्ट करण्यात आले नसले, तरी स्वाइन फ्ल्यू मुळे राज्यभरातील सर्व पोलीस भरती स्थगित करण्यात आल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. नगर येथे ४८ जागांसाठी ही भरती होणार होती. त्यासाठी सुमारे दहा हजार अर्जाची विक्री झाली आहे.

दूध भाववाढीबाबत शिवसेनेची भूमिका शेतकरीविरोधी - सावंत
निघोज, ९ ऑगस्ट/वार्ताहर

दूध भाववाढीच्या विरोधात शिवसेनेने केलेल्या आंदोलन हे तो पक्ष शेतकरीविरोधी असल्याचेच लक्षण आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणाऱ्या पक्षाच्या मागे शेतकऱ्यांनी येत्या निवडणुकीत उभे राहावे, असे आवाहन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक सावंत यांनी या बाबत आयोजित पत्रकार परिषदेत केले. पिंपळनेरच्या सरपंच सुनंदा रासकर, उपसरपंच विश्वनाथ कळसकर, भाऊसाहेब लटांबळे, बाबाशेट लंके, रघुनाथ रासकर, पोपटराव गाजरे आदी या वेळी उपस्थित होते. शेतीमालास हमीभाव मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी दूधधंदा करणे फायदेशीर आहे. इतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत असताना दुधाला मात्र भाववाढ मिळत नाही, हा शेतकऱ्यांवरील अन्याय आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. म्हणूनच सरकारने दुधाला थोडेफार भाव वाढवून दिले आहेत. मात्र, तरीही शिवसेनेला पोटशूळ उठला आहे. वास्तविक, सरकारने दुधाच्या भावात आणखी वाढ करणे आवश्यक आहे, असे श्री. सावंत यांनी सांगितले.

महागाईच्या निषेधार्थ भाजपचा रास्ता रोको
नगर, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष शहर शाखेच्या वतीने आज सकाळी सक्कर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महागाईच्या निषेधार्थ केलेल्या या आंदोलनात राज्यातील आघाडी सरकारला चलेजावचा इशारा देण्यात आला. पक्षाच्या मागासवर्गीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत साठे, शहराध्यक्ष जोशी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. पक्षाचे नगरसेवक संजय चोपडा, सचिन पारखी, शिवाजी लोंढे, सहचिटणीस अनिल शेवते, छाया रजपूत, कालिंदी केसकर तसेच विविध आघाडय़ांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी सर्वानी रस्त्यावरच बसकण मारली. आघाडी सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. पक्षाचे झेंडे हातात घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी विनंती करूनही कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी शिंदे यांनी आंदोलनस्थळी येऊन पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आंदोलन आवरते घेतले व रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक पूर्ववत झाली.

सराफी दुकान फोडून ४३ हजारांची चोरी
नगर, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

गंज बाजारातील एका सराफ दुकानाचे शटर वाकवून चोरटय़ांनी काल रात्री ४३ हजारांचा ऐवज लांबविला. वैभव दिलीप जगदाळे (२५ वर्षे, रा. गांजेगल्ली, गंजबाजार) यांनी फिर्याद दिली आहे. चोरी झाल्याचे आज सकाळी लक्षात आले. तपास उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.

जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जाची मुदत दि. १४ पर्यंत
नगर, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

वैद्यकीय व अन्य शाखांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जाची मुदत १४ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. संबंधितांनी आपले अर्ज प्रश्नचार्यामार्फत विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी, नगर यांच्याकडे द्यायचे आहेत.