Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

भाजपचा सरकारला ‘चले जाव’चा इशारा; ‘जेलभरो’ उत्स्फूर्त
ठिकठिकाणी रास्ता रोको
२८८० कार्यकर्त्यांना अटक
सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
नागपूर, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी
महागाई, साठेबाजी व नफाखोरीच्या मुद्यावर आणि इतर आघाडय़ांवरील राज्य सरकारच्या अपयशाकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी नागपूर शहर व ग्रामीणसह विदर्भात ठिकठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात आले. ‘आघाडी सरकार चले जाव’च्या घोषणा देत मोठय़ा संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार, शहर, मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी नागपूर शहरात २८८० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

मंत्री व अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर येणार टाच!
नागपूर, ९ ऑगस्ट/ प्रतिनिधी

बैठकीच्या निमित्ताने मतदारसंघात फिरणाऱ्या मंत्र्यांची आणि क्षुल्लक कारणांसाठी वारंवार मुंबई वाऱ्या करणाऱ्या अधिकाऱ्यांची, मुख्यमंत्र्यांनी ‘ऑनलाईन’ कामाचा आग्रह धरल्याने पंचाईत झाली आहे. यामुळे एकीकडे मंत्र्यांच्या दौऱ्यावर लगाम तर येणारच आहे शिवाय, खर्चातही बचत होणार आहे. मंत्र्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून विभाग किंवा जिल्हापातळीवरील अधिकाऱ्यांशी संवाद साधावा, तर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना हवी असलेली माहिती ई-मेलव्दारे मागवावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

संपाचे सत्र सुरूच ; शाळा, वाचनालये आज बंद
नागपूर, ९ ऑगस्ट/ प्रतिनिधी

वीज कर्मचाऱ्यांपासून तर सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत अन् प्रश्नध्यापकांपासून तर डॉक्टरांपर्यंत सर्वानीच संघटित शक्तीच्या जोरावर सरकारला झुकवत घसघशीत वेतनवाढ पदरी पाडून घेतल्यानंतर आता शाळांचे संस्थाचालक त्यांच्या मागण्यांसाठी पुढे सरसावले आहेत. शाळांच्या थकित अनुदानासाठी उद्या, सोमावारी शिक्षण संस्थाचालकांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर वाढीव वेतनश्रेणीच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर जाणार असल्याने सार्वजनिक वाचनालयेही बंद राहणार आहेत.

चतुर्वेदींचे नाव न घेता टीका ; सत्कार समारंभात मुत्तेमवार यांच्या विरोधकांना कानपिचक्या
नागपूर, ९ ऑगस्ट/ प्रतिनिधी
पैशाच्या आधारावर राजकारण करणाऱ्यांना व पक्षात शिस्त न पाळणाऱ्या नेत्यांना दूर सारा, असे आवाहन काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी त्यांच्या सत्कार समारंभात कार्यकर्त्यांना केले. लोकसभेतील विजय हा कार्यकर्त्यांचा व मतदारांचा विजय होय, यामुळे मला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची जागा दिसली, अशी टीकाही त्यांनी त्यांचे राजकीय विरोधक सतीश चतुर्वेदी यांचे नाव न घेता केली.

अनुसूचित जमातीच्या अनुशेषाचा डॉ. संदीप धुर्वेंनी घेतला आढावा
नागपूर, ९ऑगस्ट/ प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे समिती प्रमुख डॉ. संदीप धुर्वे यांनी रविभवन येथे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुशेषाप्रमाणे नियुक्तिबाबत प्रश्नधान्य, केंद्र व राज्य सरकारच्या अनुसूचित जमातीसाठी असलेल्या योजनांचा लाभ, अनुसूचित जमातींच्या कर्मचाऱ्यांना आरक्षण, बढती, जाती प्रमाणपत्रांची तपासणी, अनुसूचित जमातीच्या नावावरील बोगस नियुक्त्या आदी बाबींचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला समितीचे उपसचिव एम.एम. काज, समिती अधिकारी ला.ना. जाधव, आदिवासी अपर आयुक्त एस.एन. बनगिनवार, प्रकल्प अधिकारी गिरीष सरोदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भरकाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी, नागपूर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, नागपूर मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदी अधिकारी उपस्थित होते.

रामटेकहून सुबोध मोहितेंना उमेदवारी न देण्याची मागणी
नागपूर, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

रामटेक विधानसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते हे बाहेरचे असून त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेसच्या एका गटाने पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले. पालकमंत्र्यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळातील अनेक नेते इतर पक्षातून आलेले, तसेच याआधी बंडखोरी करून पक्षविरोधी कारवाया केलेले आहेत. रामटेक मतादरसंघात गेल्या १५ ते २० वर्षापासून राहणारे व पक्षाच्या माध्यमातून जनसेवा करणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांला संधी देण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचे गुणगान करण्यात आले असून सुबोध मोहिते यांच्या टीका करण्यात आलेली आहे. पालकमंत्र्यांना भेटणाऱ्यांमध्ये माजी आमदार पांडुरंग हजारे, आनंदराव महाजन, चंद्रपाल चौकसे, मत्सोद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष अशोक बर्वे, हर्षवर्धन निकोसे, श्रीराम आष्टणकर, सुरेश कुंभरे, मदन पालीवाल, पार्वती वासनिक, शोभा राऊत, विभा गुरव, पंचम चौधरी, देवा कुंभरे, सुखराम लच्छोरे, भाऊ रहाटे, रामचंद्र मडावी आदी जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांचा समावेश होता.

दशनाम गोस्वामी समाजातील गुणवंत व समाजसेवकांचा सत्कार
नागपूर,९ ऑगस्ट / प्रतिनिधी

सनातन दशनाम गोसावी समाज संस्थेच्या वतीने दशनाम गोस्वामी समाजातील मार्च २००९ या सत्रात दहावी व बारावीच्या परिक्षेत ५५ टक्क्याहून अधिक गुण प्रश्नप्त करणाऱ्या नागपूर विभागातील गुणवंतांचा सत्कार व समाजातील ज्येष्ठ समाजसेवक, विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. दशनाम गोसावी समाजातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत संस्थेचे कार्यालय सिद्धेश साई महिमा अपार्टमेंट, सक्करदरा पोलीस ठाण्यासमोर, नागपूर येथे ११ ते ६ या वेळेत १४ ऑगस्टपर्यंत पाठवावी. अधिक माहितीकरता दूरध्वनी क्र. २७४६४७७ यावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे सचिव विजयगिरी गोस्वामी व सहसचिव रवींद्र भारती, डॉ. अविनाश भारती यांनी केले आहे. तसेच, दिवं. बापू गिरी स्मृती पुरस्कार सन २००९मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्यांना देण्यात येणार आहे. पुरस्काराच्या अधिक माहितीकरता निश्चल शांतिक पुरी यांच्याशी ९३२५५२५५८२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन योगेश बन यांनी केले आहे.

संजीवनीतर्फे नोकरीच्या संधीबाबत मार्गदर्शन
नागपूर, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

संजीवनी सखी संघातर्फे पाचपावलीतील एससीएस शाळेत बारावी व पदवीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आयटी व आयएएस या क्षेत्रामधील नोकरीच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. या शिबिरात आयआयएचटी नागपूर केंद्राच्या तज्ज्ञ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. एससीएस शाळेच्या संगणक विभागाचे प्रमुख प्रवीण मानवटकर यांनी अ‍ॅनिमेशन या विषयावर मार्गदर्शन केले. आयआयएचटीतर्फे मानवेंद्र जयपाल, मजहर अली यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे संचालन संस्थेच्या सचिव विभा गजभिये यांनी केले. कल्पना मेश्राम यांनी आभार मानले.

शालोपयोगी साहित्याचे वाटप
नागपूर, ९ऑगस्ट / प्रतिनिधी

लॉयन्स क्लब ऑफ मेडिकोज तर्फे ग्रेट नागरोडवरील स्वामी सीतारामदास हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना पुस्तके व अन्य शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेश रथकंठीवार, डॉ. तोलानी. डॉ. विनोद जयस्वाल, क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. जे.बी. सारडा, डॉ. सुभाष राऊत, डॉ. व्ही. पी. पतंगे, डॉ. जीवन वाघाये, डॉ. रवि वैरागडे, डॉ. राजेश सावरबांधे प्रश्नमुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. तोलानी यांनी ‘आरोग्याची काळजी’ या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. डॉ. रथकंठीवार यांनी क्लबची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे शिक्षक निमगडे यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

‘आम्ही रामपंथी’चे प्रकाशन
नागपूर, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

गो.सी. शनिवारे लिखित ‘आम्ही रामपंथी’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच माजी कुलगुरू हरिभाऊ केदार यांच्या हस्ते करण्यात आले. नवयुग विद्यालयाच्या बाळशास्त्री हरदास सभागृहात देवदत्त प्रकाशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार रमेश राजहंस, भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय शिरपूरकर, हरभजनसिंग, अनिल तिडके, उमेश शर्मा उपस्थित होते. यावेळी हरिभाऊ केदार म्हणाले, शनिवारे वयाने जरी थकले असले तरी त्याची लेखणी मात्र अजूनही ताजी आहे. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त लेखन करावे. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी पुस्तकावर भाष्य केले. या पुस्तकाला माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांची प्रस्तावना आहे. कार्यक्रमाचे संचालन मंगलमूर्ती शनिवारे यांनी केले. मोहन नवरे यांनी आभार मानले. ओती हटवार यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

झोपडपट्टीवासीयांना वस्तूंचे वाटप
नागपूर, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडच्या झंकार महिला मंडळाने सामाजिक उपक्रमांतर्गत बोकारा गावातील झोपडपट्टीतील ८५ नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट दिल्या. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा शशि गर्ग, उपाध्यक्ष शैलजा सक्सेना, सचिव रूपा झा, प्रभा सनोडिया, लक्ष्मीनारायण, संगिनी आदी उपस्थित होत्या. यावेळी जी.पी. रेड्डी यांनी प्रश्नस्ताविकात गावातील समस्यांबद्दल माहिती दिली. गर्ग यांनी महिलांना, दैनंदिन कामकाजाबरोबरच मुलांची उत्तमप्रकारे देखभाल करावी, घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेऊन आरोग्याची नीट काळजी घ्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने गावातील महिला उपस्थित होत्या.

राष्ट्रपतींना कमला मोहता यांचे निवेदन
नागपूर, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची काँग्रेसच्या शहर सचिव आणि माहेश्वरी महिला संघटनेच्या माजी अध्यक्षा कमला मोहता यांनी अलीकडेच भेट घेऊन निवेदन दिले. समाजातील महिला आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. राजकारणातही महिलांना अशीच संधी मिळाल्यास पक्ष बळकट करण्यासोबतच सामाजिक विकासालाही वेग येईल, असे मोहता यांनी निवेदन म्हटले आहे. देशातील महिलांची स्थिती आणि त्यांच्या सहभागाबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. महिलांचा असाच सहभाग राहिल्यास २१ व्या शतकात देश सर्वाधिक बलशाली राष्ट्र राहील आणि साक्षरतेचे प्रमाणही सर्वाधिक राहील, असे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यावेळी म्हणाल्या.

जनरल इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशनचा स्थापना दिन
नागपूर, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

विमा क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांची प्रमुख संघटना ऑल इंडिया जनरल इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशनचा ३८ वा स्थापना दिन जनरल इन्शुरन्स एम्प्लॉईज युनियन वेस्टर्न झोनच्या नागपूर शाखेतर्फे साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेच्या सचिवपदावर नियुक्ती झाल्याबद्दल प्रदीप धरमठोक, सहसचिव पदावर प्रदीप अवचट यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अवचट यांनी असोसिएशनच्या स्थापनेबाबत माहिती दिली. कार्यक्रमात रायलू यांनी संघटनेच्या एकूण कामकाजाची माहिती दिली. तसेच प्रत्येक पदाधिकाऱ्याने संघटनात्मक जवाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळून संघटनेचे कार्य कसे समर्थपणे चालविता येईल याबाबत माहिती दिली. धरमठोक यांनी संघटनेच्या ध्येय धोरणांची माहिती दिली. कार्यक्रमाला यावेळी मोठय़ा संख्येने संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

साठेबाज, नफेखोरांविरुद्ध कारवाईची मागणी
नागपूर, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी साठेबाज आणि नफेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शेख हुसेन यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांच्याकडे केली. जीवनावश्यक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. साठेबाजांनी गोदामात वस्तू जमा करून कृत्रीम टंचाई निर्माण केली आहे. साठा करणाऱ्यांवर छापे टाकावे आणि कठोर कारवाई करण्यात यावी. अन्न व नागरी पुरवठा मंत्री रमेश बंग यांनी व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिल्यानंतर छापे टाकण्यात आले पण, लवकरच ही कारवाई बंद झाली, याकडेही हुसेन यांनी लक्ष वेधले. शिष्टमंडळात शकुर नागाणी, अब्दुल हमीद, अंबादास गोंडाणे, गणेश शाहु, मनोज शर्मा, अशफाक अली, नगरसेवक सुलेमान अब्बास, रवींद्र जनबंधु, शरीफ अंसारी,ोईम खान, अब्दुल गनी, अफझल अली आणि सूर्यकांत उईके यांचा समावेश होता.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नागपूर, ९ ऑगस्ट/ प्रतिनिधी

मुस्लिम मददगार संघातर्फे हज यात्रेकरू व गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास वस्रोद्योग मंत्री अनिस अहमद व अब्दुल कलाम आझाद मंडळाचे संचालक शब्बीर अहमद विद्रोही व संघटनेचे अध्यक्ष अब्दुल शकील उपस्थित होते. यावेळी हजची यात्रा करणाऱ्यांचा व दहावी व बारावीत गुणवंत ठरलेल्यांचा पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात अरशिना परवीन, शेख अमीर, गुलअपसा बेगम, आयशा परवीन, हिना कौसर, मो.जहीर यांचा समावेश आहे. कार्यक्रमास वीरेंद्र शहा, राष्ट्रवादीचे युवा नेता साहिल सय्यद, एम.ए, कादर, नगरसेवक जुल्पेकार अहमद भुट्टो, अन्वर जाहीर उपस्थित होते.

रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना धनादेश वाटप
नागपूर, ९ ऑगस्ट/ प्रतिनिधी

दक्षिण-पूर्व-मध्यच्या नागपूर विभागाच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी विभागीय व्यवस्थापक एस.एन. अग्रवाल अध्यक्षस्थानी होते तर, प्रमुख पाहुण्या म्हणून विभागीय अतिरिक्त व्यवस्थापक अल्का मेहरा होत्या. ३१ जुलैला सेवानिवृत्त झालेल्या विभागातील ३६ कर्मचाऱ्यांना २ कोटी ७६ लाख ३४ हजार १२५ रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच, ओळखपत्र, सेवा प्रमाणपत्र, आरोग्य पुस्तक आणि सेवापदक प्रदान करण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता रेल्वेच्या विविध योजना आहेत. त्यांचा कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करताना अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना आनंददायी सेवानिवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विभागीय वरिष्ठ कार्मिक अधिकारी सूर्यप्रकाश उपस्थित होते. संचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी अनुराग मेश्राम यांनी केले.

शेतीच्या उत्पन्नावरून मारहाण
नागपूर, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

शेतीच्या उत्पन्नावरून भांडण होऊन दहाजणांनी घरात शिरून एकास मारहाण केल्याची घटना गंगाविहार कॉलनीत शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास घडली. सर्वोत्तम महेशकुमार खानोरकर (रा. गंगाविहार कॉलनी) याचे नातेवाईक भाऊराव रामचंद मौजे, वसुंधरा विजयकुमार दुरुगकर, नलिनी खंगार, निरंजन रमेश खंगार,(रा़ हिंद नगर, वर्धा), श्रीकांत भाऊराव मौजे (रा़ महालक्ष्मी नगर, बेसा पावर हाऊस जवळ), विक्रांत मौजे, वीरेश विजयकुमार दुरुगकर (रा. तुळशीबाग), शनि दुरुगकर, ज्ञानेश्वर समर्थ व त्याचा एक साथीदार सर्वोत्तमच्या घरी गेले होते. शेती व शेतीसंबंधित आर्थिक व्यवहारांवरून त्यांचे भांडण झाले. आरोपींनी काठी व विटांनी मारून जखमी केल्याची तक्रार सर्वोत्तमने नंदनवन पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करीत निरंजन रमेश खंगार,(रा़ हिंद नगर, वर्धा), श्रीकांत भाऊराव मौजे (रा़ महालक्ष्मी नगर, बेसा पावर हाऊस जवळ), वीरेश विजयकुमार दुरुगकर (रा. तुळशीबाग) या तीन आरोपींना अटक केली आह़े