Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

नवनीत

गुरुजी हिमश्रेणींची यात्रा करताना एका छोटय़ा वस्तीत राहिले. दिवस पावसाळय़ाचे होते. प्रवास करणे अवघड होते. तिथे घडलेली एक कथा अशी : एक तरुण व्यापारी गुरुजींकडे आला. त्यांच्या दर्शनाने आपले मन:स्वास्थ्य सुधारले आणि जीवनाची उमेद वाढली असे त्याला जाणवले. रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी तो गुरुदर्शनासाठी येऊलागला. त्याचा हा नित्यक्रम मित्राला समजला.

 

त्याला वाटले, आपणही हा प्रयोग करायला काय हरकत आहे? दुसऱ्या दिवशी दोघेही निघाले. वाटेत एक सुस्वरूप कन्या दिसली. रसिकमित्र तिच्याशी बोलण्यात स्वत:ला विसरून गेला. गुरुदर्शन त्या दिवशी राहून गेले. दोघे मित्र जेव्हा भेटले तेव्हा चर्चा केली. पुन्हा निश्चय करण्यात आला. भक्तमित्राचा नियम चुकला नाही. रसिकमित्राचे प्रेमप्रकरण रंगत गेले. अखेर दोन्ही मित्रांचे ठरले. आज काहीही करून गुरुदर्शन करायचेच. मैत्रिणीची वस्ती आल्यावर रसिक म्हणाला, ‘मी जरा जाऊन येतो. अगदी लवकर परततो. तूही गुरुदर्शन करून लवकर ये. जो आधी येईल त्याची मैत्री मोठी.’ नेहमीप्रमाणे गुरुदर्शन करून भक्तमित्र अंमळशाने परतला. वाटेत त्याच्या पायात काटा रुतला. तो काढून पायाला पट्टी बांधून एक जोडा हातात नि एक पायात अशा अवस्थेत परतला. थोडक्यात भागले, असा त्याचा भाव होता. इकडे रसिकमित्राची प्रेयसी घरी नव्हती. त्यामुळे तो लवकर परतला. मित्राची वाट पाहताना काही चाळा म्हणून जमीन उकरली. एक सुवर्णमुद्रा दिसली. मग खिशातला चाकू काढून उकरत गेला. हंडा लागला. त्यात कोळसा-राख होती. घाबरला. ढिगाऱ्यात मुद्राही गेली. राख, कोळसे राहिले. इकडे भक्तमित्राच्या एका पायात काटा, त्यामुळे हातात जोडा. दुसऱ्याची सुवर्णमुद्रा हरवली. शिवाय भीती पोटात बसलेली. असे का झाले, हे गुरुजींनाच विचारावे म्हणून दोघे निघाले. गुरुजींनी सारी कथा ऐकली, हसून म्हणाले : ‘मित्रांनो! एकूण तुम्हा दोघांचा आजवरचा एकूण प्रवास मौजेचा झाला तर! तुम्ही दोघे तसे आपापल्या आवडी-निवडीच्या व्यक्तींना नियमाने भेटत राहिला. त्यामुळे नियमितपणाचा संतोष दोघांनाही आहेच. आता एकाला काटा टोचला. एकाला हाती सोने लागले असे वाटले; पण निराशा पदरी आली. म्हणजे दोघांनाही थोडीबहुत व्यथाच मिळाली. यातून काय स्पष्ट होते? ईश्वराच्या सृष्टीचा कार्यकारणभाव वाटतो तितका सोपा नाही. जे होईल असे वाटते ते होतेच असे नाही. जे होणार नाही असे भासते, ते होऊनही बसते. तुम्हांपैकी एकाच्या पायाला काटा टोचला, म्हणजे काटय़ावर पाय पडला. त्याचा गुणधर्म त्याने दाखवला. वेदना झाल्या, पण तेवढय़ावर निभावले. पुढल्या वेळी पाहून चालायचे हे ध्यानी राहील. दुसऱ्या मित्राला बराच धडा मिळाला. सुवर्णमुद्रा हा भास होता. मोह टाळता आला असता. अतिमोहाने सारेच गेले. जे मिळायचे नव्हते ते मिळाले नाही. खरेतर काही चांगले मिळावे म्हणून चांगल्या मार्गावर निर्धारपूर्वक चालत राहायला हवे. जेव्हा मिळायचे तेव्हाच मिळते. न मिळाले तर निदान जे नुकसान होते ते फार होत नाही.
अशोक कामत

गुरुत्वीय लहरी म्हणजे काय?
एखाद्या तळय़ात दगड टाकला तर पाण्यात तरंग निर्माण होऊन हे तरंग सर्व दिशांना पसरू लागतात. आपल्या भोवतालच्या अवकाशाची (पोकळीची) स्थितीही या तळय़ातील पाण्यासारखीच आहे. व्यापक सापेक्षतावादानुसार अवकाश हे आजूबाजूच्या वस्तूंमुळे वक्र झालेलं असतं. या अवकाशात जेव्हा कोणत्याही प्रकारची हालचाल घडून येते तेव्हा या वक्रतेत बदल होतो. तळय़ातील पाण्यात दगड टाकल्यावर उमटलेल्या तरंगांप्रमाणे, अवकाशाच्या वक्रतेतील हा बदलही अवकाशात उमटलेल्या लहरींच्या स्वरूपात दूरवर पोहोचवला जातो. या लहरींना गुरुत्वीय लहरी म्हटलं जातं. या लहरी निर्माण करणारी घटना ही एखाद्या अवकाशस्थ वस्तूचे भ्रमण असू शकते, अवकाशस्थ वस्तूंची टक्कर असू शकते वा ताऱ्याचा मृत्यू घडवून आणणारा प्रचंड स्फोटही असू शकतो. गुरुत्वीय लहरी या प्रकाशाच्या वेगाने प्रवास करीत असल्याचे मानले जाते. दूरवर निर्माण होणाऱ्या या लहरी पृथ्वीशी पोहोचेपर्यंत अतिशय क्षीण होत असल्याने, अशा लहरींचे निरीक्षण करणे अजून तरी शक्य झाले नाही. मात्र अशा लहरींचा अप्रत्यक्ष वेध घेतला गेला आहे. रसेल हल्स आणि जोसेफ टेलर या अमेरिकन शास्त्रज्ञांनी इ.स. १९७४ साली लावलेला गरुड तारकासमूहातील न्यूट्रॉन ताऱ्यांच्या जोडीचा शोध या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. पावणेआठ तासांत एकमेकांभोवती प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या या न्यूट्रॉन ताऱ्यांचा प्रदक्षिणाकाळ हा वर्षांला सुमारे साडेसात लक्षांश सेकंदाने घटत आहे. गुरुत्वीय लहरींचे उत्सर्जन हे या जोडीकडील ऊर्जेत घट घडवून आणत आहे. ऊर्जेतील ही घट त्यांचा प्रदक्षिणाकाळ कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे. प्रदक्षिणाकाळातील ही घट म्हणजे गुरुत्वीय लहरींचाच अप्रत्यक्ष पुरावा ठरला आहे. गुरुत्वीय लहरी हा व्यापक सापेक्षतावादाचा परिपाक असल्याने हा पुरावा व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांतालाही पुष्टी देतो.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

रॉकेट तंत्रज्ञानाचे जनक म्हणून अमेरिकेच्या रॉबर्ट हचिंग गॉडर्ड यांची विज्ञान जगतात ओळख आहे. त्यांचा जन्म ५ ऑक्टोबर १८८२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे पुस्तकांचे दुकान होते. लहानपणीच त्यांनी यंत्राविषयीची पुस्तके वाचल्याने पुढे शोध लावण्याची जिज्ञासा निर्माण झाली. पीएच.डी.ची पदवी संपादन केल्यावर त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठ, क्लार्क विद्यापीठ इ. ठिकाणी भौतिक शास्त्राचे अध्यापन केले. रॉकेटसाठी लागणारी मोटार त्यांनीच सर्वप्रथम तयार केली. त्या मोटारीच्या जोरावर त्यांनी १९२५ मध्ये रॉकेटची चाचणी घेतली. ती यशस्वीही झाली. आपल्या बुद्धीचा वापर त्यांनी दुसऱ्या महायुद्धातही केला. ते सैन्यात भरती झाले. पण सैनिकांना रॉकेट विकसित करण्यात रस नसल्याने ते परत आले. अवकाश या विषयावर त्यांनी लेखन केले. ‘ए मेथड ऑफ रीचिंग एक्स्ट्रीम आल्टिटम्डस’ हा त्यांचा ग्रंथ या दृष्टीने महत्त्वाचा आहे. १० ऑगस्ट १९४५ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

संदेश नुकताच सातवीत गेला होता. मोठ्ठं होण्याची त्याला फार घाई होती. सुजयला शाळेतून घरी येताना तो म्हणाला, ‘माझी उंची मोज ना रे!’ ‘‘अरे, सोमवारीच तर तुझी उंची मोजली. आज शुक्रवार आहे. चार दिवसांत काय फरक पडणार आहे,’ चकित होऊन सुजय म्हणाला. संदेश ठामपणे म्हणाला, ‘माझी हाडं वाढली आहेत. तू मोज बरं!’ नाईलाजाने त्यांच्या नेहमीच्या झाडाशी सुजय जाऊन उभा राहिला. त्या उंच माडाखाली संदेश झाडाच्या खोडाला पाठ लावून ताठ उभा राहिला. संदेशच्या डोक्याच्या उंचीवर सुजयने खूण करीत म्हटले, ‘बघ, मागची खूण इथेच आहे. तू अजून तेवढाच आहेस.’ ‘काय वैताग आहे’, संदेश स्वत:शीच म्हणाला. त्यांचा गाव समुद्रतीरीचा छोटा देखणा गाव होता. गावातले पुरुष नारळाच्या झाडांवर उंच चढायचे. नारळ तोडून खाली टाकायचे. मुले नारळ गोळा करून लावून ठेवायची. असलं पोरकट काम संदेशला आवडायचं नाही. त्याला वाटे, आपण लवकर मोठे होऊन नारळ तोडावेत इतर बाप्यांसारखे. आपण सडसडीत आणि उंच झालेले असू. घरी कुणी ओरडणार नाही. असा विचार करीत तो झाडाच्या फांदीला धरून लोंबकळत राही. पण तो काही चटकन मोठा होत नव्हता. गावात स्पर्धा होती. सगळय़ांत जास्त नारळ तोडेल तो पहिला. गाव त्याचा सत्कार करेल. संदेश शाळेला जायच्या आधी सुट्टीच्या दिवशी मोठी माणसे झाडावर कशी चढतात, नारळ कसे तोडून खाली टाकतात, हे खूप वेळ पाहात राही. स्वप्नातसुद्धा त्याला दिसायचे की, आपण भराभर झाडावर चढून ढीगभर नारळ तोडलेत. आता त्याला स्वप्नात स्पर्धा दिसायला लागली होती. स्पर्धेचा दिवस उजाडला. सारा गाव नारळाच्या झाडांनी मिठीत घेतलेला होता. स्पर्धक गोळा झाले. शाळेला सुट्टी होती. सगळे म्हणत होते, बाबुराव स्पर्धा जिंकणार. बाबू सराईतपणे झाडावर चढला, पण अचानक पायात गोळे येऊन तो कळवळून ओरडू लागला. त्याला उतरता येईना. तो झावळय़ात अडकून बसला. आरडाओरडा झाला. इतर पुरुष झाडांवर चढले होते. बाबूला मदत कोण करणार? संदेश कुणाचे लक्ष नाही पाहून झाडावर चढून बाबूपर्यंत पोहोचला, तेव्हा सगळे चकित झाले. बाबूचा अडकलेला पाय त्याने झावळय़ातून सोडवला आणि नारळ तोडून त्याने भराभर खाली टाकायला सुरुवात केली. बाबू उतरल्यावर तो खाली आला आणि मग स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. सगळय़ांत जास्त नारळ संदेशने तोडले होते. सुजय म्हणाला, ‘इतक्या वेगाने कुणीच माडावर चढले नव्हते.’ आता मोठं होण्याची संदेशला घाई नव्हती. आपण लहान असतो तेव्हा वाटते, मोठे झाल्यावर किती गोष्टी करता येतील. ती स्वप्नं पाहात आपण लहानपण नको म्हणतो. कशाला घाई! ८० टक्के आयुष्य मोठं होऊनच जगायचं असतं. आधी लहान असण्यातला आनंद घ्यायला नको का?
आजचा संकल्प - मी लहान आहे, यात आनंद मानीन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com