Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

ध्वनिप्रदूषणाकडे सामाजिक उपद्रव म्हणून पाहण्याची गरज
‘‘लोकसत्ता’ गणेशोत्सव मंच’च्या चर्चासत्रातील मत
पुणे, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

ध्वनिप्रदूषणाकडे ‘गणपती मंडळांविरुद्ध पोलिसांकडून होणाऱ्या अवास्तव कारवाईमुळे निर्माण

 

होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न’ म्हणून नाही तर ‘सामाजिक उपद्रव’ म्हणून पाहिल्यास समाजातील प्रत्येकाचा जीवन जगण्याचा हक्क अबाधित राहील. स्वास्थ्य आणि आरोग्यावर दुष्परिणाम करणाऱ्या या समस्येकडे सामाजिक व मानवी दृष्टीने पाहण्याची गरज आहे, असा सूर आज येथे आयोजित चर्चासत्रात निघाला.
‘लोकसत्ता’ च्या गणोशत्सव मंचातर्फे ध्वनिप्रदूषण या विषयावर आयोजित चर्चासत्राला शहरातील प्रमुख गणपती मंडळांचे प्रतिनिधी, साउंड अँड जनरेटर असोसिएशन, पोलीस, डॉक्टर, वकील तसेच तज्ज्ञ उपस्थित होते. लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, डॉ. कल्याणी मांडके, सहायक पोलीस आयुक्त अभय येवले, श्याम मानकर, अॅड असीम सरोदे, ध्वनिप्रदूषणाच्या क्षेत्रात काम करणारे गणेश कोल्हटकर, असोसिएशनचे सचिन नाईक, ‘दांडेकर हिअरिंग सव्र्हिसेस’ चे निलेश दांडेकर आदी उपस्थित होते.
‘फ्रिक्वेन्सी’ म्हणजेच वारंवारता कमी ठेवून गणपती मंडळांच्या मंडपांसमोर ध्वनिक्षेपक लावल्यास ध्वनिमर्यादेचे पालन होणे सहज सोपे आहे, असे मत असोसिएशनचे रमेश कांबळे यांनी कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले. त्याला उत्तर देताना डॉ. मांडके म्हणाल्या, ‘‘स्पीकरमधून निघणारा ‘गोंगाटा’ ची वारंवारता जादा असते तर पारंपरिक ढोलपथकांची कमी असते. एखाद्याला स्पीकरसमोर उभे केल्यास त्याचे हृदय थडथडते कारण ते मानवी शरीराला त्रासदायक ठरते. ढोलपथकासमोर उभे राहिल्यास मात्र हा अनुभव येत नाही कारण त्याची ‘फ्रिक्वेन्सी’ कमी असते. पण झांज किंवा ताशे वाजताना जवळ उभे राहिल्यास श्रवणदोष निर्माण होऊ शकतो.’’
ध्वनिप्रदूषणामुळे मानवी स्वभाव बदलतो आहे असे सांगून डॉ. मांडके म्हणाल्या की चिडचिडेपणा वाढणे, श्रवणदोषाचे प्रमाण वाढणे तसेच मधुमेह व रक्तदाबाच्या रुग्णांचा आजार बळावणे असे अनेक दुष्परिणाम ध्वनिप्रदूषणामुळे होत असल्याचे आढळून येत आहे. प्रमाणित ‘इअरप्लग’ कानामध्ये घातल्यास काही प्रमाणात शरीराला दिलासा मिळू शकतो, असेही डॉ. मांडके यांनी या वेळी सांगितले.
अॅड. सरोदे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा ध्वनिप्रदूषणाबाबत निकाल दिला व दिवसा आणि रात्रीच्या वेळी डेसिबलमधील ध्वनिमर्यादा स्पष्ट केल्या, त्या वेळी ध्वनिप्रदूषणाची समस्या ही लोकशाहीशी संबंधित विषय असल्याचे स्पष्ट केले होते. जीवन जगण्याचा हक्क, मानवी आरोग्य व हक्क या दृष्टीने न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नाकडे पाहिले आहे. त्यामुळे ही समस्या आपल्या सर्वाच्या संवेदनशीलतेचा भाग बनली पाहिजे. या विषयावरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकून आपण मोकळे होतो पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टिकोनानुसार प्रत्येकाचे आरोग्य महत्त्वाचे मानून ती जबाबदारी आपण स्वीकारायची की नाही ते स्वत: ठरवावे लागणार आहे.’’
ध्वनिमर्यादेचे पालन करत साखळी पद्धतीने ध्वनिक्षेपक लावल्यास दूर थांबून देखावे पाहणाऱ्या नागरिकांना देखील ऐकू जाईल अशापद्धतीने ध्वनिक्षेपकांची रचना कशी करावी, याचे प्रश्नत्यक्षिक नाईक यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिले.
कोल्हटकर म्हणाले, ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांची अचूक माहिती पोलिसांना नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनीवर दिल्यास कमीतकमी वेळेत घटनास्थळावर पोहोचून कारवाई करण्यास पोलिसांना मदत होऊ शकते. येवले म्हणाले, ध्वनिमर्यादांचे पालन मंडळांनी करावे असे आवाहन आणि विनंती पोलीस आयुक्तांनी केली आहे.
संगोराम यांनी प्रश्नस्ताविक केले. लोकसत्ताचे मुख्य बातमीदार सुनील माळी यांनी स्वागत केले. त्वष्टा कासार समाज मंडळातर्फे या वेळी ध्वनिप्रदूषणाच्या विषयावर पथनाटय़ सादर करण्यात आले.
अभिषेक खेडकर, नचिकेत जोग, मंदार सोमण, श्रेयस कुलकर्णी, गौरव पोटफोडे, सिद्धेश कर्डे, भूषण निजामपूरकर, अभिषेक कर्डे, सौरभ कर्डे आणि अंकलेश वर्तक या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे पथनाटय़ सादर केले.
तसेच, इंदिरा इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन आणि प्रशांत दीक्षित यांनी तयार केलेल्या ‘ध्वनी आणि गोंगाट’ या विषयावरील दोन मिनिटांच्या माहितीपटाचे सादरीकरण या वेळी करण्यात आले.