Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री टी यांना जाहीर
पुणे, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार ज्येष्ठ

 

अभिनेत्री जयश्री टी यांना जाहीर झाला असून, १३ ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे रात्री ९ वाजता या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
वेस्टर्न इंडिया फिल्म असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम शिर्के यांनी आज पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. या वेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त एकनाथ जावीर, मनोहर कोलते, कार्यवाह मंगेश ठाणे, खजिनदार विक्रम जाधव उपस्थित होते.
शिर्के म्हणाले की, शाहीर दादा कोंडके यांच्या ८२ व्या जयंतीदिनी म्हणजेच १३ ऑगस्टला या पुरस्काराचे वितरण केले जाईल, तसेच फिल्म फेडरेशन ऑफ इंडियातर्फे मध्य प्रदेशातील इंदोर येथे ८ ते १० ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगातील सर्व ज्येष्ठ कलावंतांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात दादा कोंडके यांचा प्रसिद्ध असलेला पोषाख (हाफ पँट, चौकडीचा शर्ट आणि टोपी) ठेवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या महोत्सवात दादा कोंडके यांच्या रूपाने प्रथमच मराठी कलाकाराच्या वस्तूंचा समावेश होणार आहे, हे विशेष उल्लेखनीय असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.