Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘साहित्यकृतीतील बीजाला वाढविण्यास समीक्षा उपयुक्त’
पुणे, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

कसदार साहित्यकृती नवनवीन अर्थ घेऊन विकसित होते. त्यामुळे साह्त्यिकृतीतील बीजाला

 

वाढविण्यासाठी समीक्षा उपयुक्त ठरते, असे मत ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात कुलकर्णी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कुटे, सरचिटणीस प्रदीप रणपिसे उपस्थित होते. स्वप्नील पोरे यांनी प्रश्नस्ताविक केले.
कुलकर्णी म्हणाले की, वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत पोहोचलो असलो तरी मी अजून मनाने, साहित्याच्या अभिरुचीबाबत तरुण आहे. सारस्वताच्या महासागरात मासा बनून राहिलो, तरी माझी तृप्तता होणे शक्य नाही. तसेच ‘हायकू’ पासून ते महाकाव्यापर्यंतचे सर्व वाङ्यम प्रकार माझ्या आवडीचे, व्यासंगाचे आहेत.
उद्धव शेळकेंची ‘धग’ आणि अल्बेर काम्यूची ‘द आऊटसायडर’ या दोन कादंबऱ्यांनी मी विशेष प्रभावित झालो आहे. ‘धग’ कादंबरी तर दोस्तोव्हस्कीच्या कादंबऱ्यांच्या तोडीची आहे, असेही त्यांनी सांगितले.
कुलकर्णी म्हणाले की, साहित्याची कोणतीही भाषा नसते. त्यात जे विविध अर्थ असतात, त्या अर्थातून साहित्याची भाषा तयार होते. म्हणून साहित्याची भाषा लौकिक नसते तर ती व्यूहांची भाषा असते. प्रश्नचीन साहित्य हे भव्य-दिव्य स्वरूपाचे आहे. त्यात ‘ज्ञानेश्वरी’ हा तर मोठा महाल असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याच्या वाङ्मय क्षेत्राबाबत ते म्हणाले की, वाङ्मय क्षेत्रात गट असण्याबाबत तक्रार नाही. परंतु, ते गट व्यावहारिक हितसंबंधांशी संबंधित नसावेत. या व्यवहारामुळे विषमता वाढते, त्यातून विवेकदृष्टी नष्ट होत असते. सद्य:स्थितीत मराठी साहित्याची दिशाभूल होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
वृत्तपत्र हे एक स्वतंत्र माध्यम आहे. त्यामुळे वृत्तपत्रांनी दृकश्राव्य माध्यमांशी स्पर्धा करू नये, त्यांनी ग्रंथांशी स्पर्धा करायला हवी. वृत्तपत्रांचा वैचारिक कस वाढला तर त्यांना कसलीही भीती नाही, असेही त्यांनी सांगितले.