Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

कृत्रिम दूध निर्माण करणाऱ्या टोळीस ठेचून काढू - हर्षवर्धन पाटील
इंदापूर, ९ ऑगस्ट / वार्ताहर

कृत्रिम दूध निर्माण करणारी टोळी राज्याच्या गृह विभागाच्या हाती लागली असून, रासायनिक

 

द्रव्यांचा वापर करून दूधसदृश पदार्थ निर्माण करून, लहान मुलांसह जनतेच्या जीविताशी खेळ करणाऱ्या व दूध व्यवसायाला काळीमा फासणाऱ्या दूध माफियांना राज्य सरकार ठेचून काढल्याशिवाय राहणार नाहीअसा इशारा सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे दिला.
श्री. पाटील यांच्या उपस्थितीत दूधगंगा दूध उत्पादक संघाची ५१ वी, अर्बन को-ऑप. बँकेची व इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा इंदापूर येथे पार पडली. या वेळी ते बोलत होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले की, लहान मुलांच्या तोंडात सकस दुधाऐवजी रासायनिक पदार्थातून दूधसदृश विष घालणाऱ्या प्रवृत्ती समाजात निर्माण झाल्या आहेत. प्रश्नमाणिकपणे शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी वर्गासह, दूधग्राहक व दूध व्यवसायावर विपरीत परिणाम करणाऱ्या या समाजघातक प्रवृत्तींना राज्य सरकार वाचविणार नाही. खडय़ासारख्या या प्रवृत्ती बाजूला ठेवल्या पाहिजेत. एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, याबाबींचा शासन गांभीर्याने विचार करीत असून, साखरेची भाववाढ रोखून सर्वसामान्यांना योग्य दराने साखर मिळाली पाहिजे. ही सरकार खात्याची भूमिका असून, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमार्फतही सर्वसामान्यांना योग्य दरात साखर उपलब्ध करण्याविषयी सहकार खाते विचार करीत आहे.