Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

महागाईच्या विरोधात भाजपचा मोर्चा
पुणे, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

महागाई विरोधात पुकारलेल्या ‘जेल भरो’ आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस

 

गोपीनाथ मुंडे यांच्यासह सुमारे पाच हजार कार्यकर्ते आज सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांसह मुंडे यांना पोलिसांनी या वेळी ताब्यात घेतले व अटक केली.
दरम्यान, मुंडे यांनी नायडू रुग्णालयाला भेट दिली व तेथे ‘स्वाइन फ्लू’ च्या तपासणीकरिता आलेल्या संशयितांची व त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. त्या वेळी नागरिकांनी त्यांच्या तक्रारी मुंडे यांच्यासमोर मांडल्या. नंतर मुंडे यांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांशी चर्चा करून नागरिकांची बाजू मांडली.
महागाईच्या विरोधात भाजपने पुकारलेल्या या आंदोलनामध्ये राज्यभरातून आलेल्या महिलांसह सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आमदार गिरीश बापट, माजी आमदार विश्वास गांगुर्डे, नगरसेवक उज्ज्वल केसकर, विकास मठकरी, माजी नगरसेवक, विजय काळे तसेच शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर आदी या वेळी उपस्थित होते.
तत्पूर्वी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सभेत मुंडे म्हणाले की सध्या राज्यामध्ये स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्याचा विचार सरकार करीत आहे. पण आता या निष्क्रिय ‘आघाडी सरकार’ लाच सुटी देण्याची वेळ आलेली आहे. आंदोलनाचा आढावा घेताना मुंडे म्हणाले, की महागाई गगनाला भिडली असून सध्याच्या राज्य सरकारला जनतेची काळजी राहिलेली नाही. त्यामुळे, क्रांतिदिनाच्या निमित्ताने आज आघाडी सरकारलाच ‘चले जाव’ चा इशारा देण्याची वेळ आली आहे.
पिंपरीत मोर्चा
पिंपरी - प्रदेश पातळीवर वाढत्या महागाईविरोधात भाजपने पुकारलेल्या आजच्या जेल भरो आंदोलनाला पिंपरी-चिंचवड शहरात कधी नव्हे तो मोठा प्रतिसाद मिळाला. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरात जोरदार शक्तिपरीक्षण झाले.
या आंदोलनात दोन हजारांवर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. शहर भाजप अध्यक्ष भगवान मनसुख यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस सदाशिव खाडे, अॅड.सचिन पटवर्धन, महापालिकेतील गटनेते अशोक सोनवणे, नगरसेवक एकनाथ पवार, रघुनंदन घुले, भीमा बोबडे, आशा लांडगे, सुलोचना बढे, वर्षा मडेगिरी, महिला आघाडी अध्यक्षा कांता मोंढे, तसेच महेश कुलकर्णी, बाळासाहेब गव्हाणे, अमर साबळे, युवा आघाडीचे अध्यक्ष राजू दुर्गे, कामगार आघाडी अध्यक्ष नामदेव डहाके, माजी नगरसेविका उमा कापरे, मधुकर बाबर, मोहन कदम, प्रमोद निसळ, लक्ष्मण गायकवाड, अपर्णा मणेरीकर, आप्पा बागल, शनिदेव शिंदे, रवींद्र देशपांडे, दिलीप काळे, सुनील लांडगे, प्रकाश ढवळे, रामकृष्ण राणे, महादेव शितोळे, सुरेश गादिया, घन:श्याम माने आदी प्रमुखांसह मोठय़ा संख्येने सर्व कार्यकर्ते मोर्चात होते.