Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

आजी-आजोबा जेव्हा दत्तक जातात..
घरामधील वृद्ध आई-वडिलांची समस्या आता फार नवीन राहिलेली नाही. तो एक सामाजिक प्रश्न बनला आहे. या विषयावर मराठी तसेच हिंदी चित्रपटही निघाले आहेत. त्यात आता आणखी एका

 

मराठी चित्रपटाची भर पडली आहे. हा चित्रपट म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला मानसन्मान. याही चित्रपटात वृद्ध माता-पित्यांचा म्हणजेच आजी-आजोबांच्या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला आहे. फक्त एकच कल्पना तशी नवी आहे ती म्हणजे स्वत:च्या मुलांकडून मिळणाऱ्या वाईट वागणुकीला कंटाळून या चित्रपटातील आजी-आजोबा चक्क दत्तक जातात. अर्थात ही कल्पना वास्तवात कितपत व्यवहार्य ठरणारी आहे, याबाबत प्रश्नचिन्हच निर्माण करणारी आहे.
एरव्ही ‘मानसन्मान’ मध्ये नेहमीचीच कौटुंबिक कथा आहे. चाळीत राहणारे जोशी दाम्पत्य (शिवाजी साटम व रिमा) यांना दोन मुले. एक कलेक्टर तर दुसरा कारकून. या दोन्ही मुलांना आई-वडील नकोसे झालेले. त्यामुळे ते त्यांना वृद्धाश्रमात पाठविण्याचा निर्णय घेतात. परंतु जोशी स्वत:च उभयतांना दत्तक घेण्याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देतात व त्यांच्या अपेक्षेप्रमाणे विक्रम (यतिन कार्येकर) नावाचा डॉक्टर यांना दत्तक घेऊन घरी आणतो व मुलांसारखी चांगली वागणूक देतो. जोशींच्या मुलांना नंतर पश्चात्ताप होतो, परंतु खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे जोशी त्यांना आपलेसे करून घेत नाहीत.
चित्रपटाची पटकथा बंदिस्त नाही. काही प्रसंग तर अपेक्षित असेच घडतात. त्यामुळे मध्यंतरापूर्वी चित्रपट फारच संथ वाटतो.
मध्यंतरानंतर मात्र म्हणजे आई-वडील दत्तक गेल्यानंतर उत्सुकता वाढते. शिवाजी साटम व रिमा यांनी वृद्ध पती-पत्नीच्या भूमिकेत प्रभावी काम केले आहे. त्यांच्या भूमिका हीच या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे.
बाकीच्या कलाकारांना फारसा वाव नाही. लहान मुलांसाठी म्हटलेली दोन्ही गाणी श्रवणीय आहेत.
प्रतिनिधी