Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शीलरक्षणाचा आणि नियतीविरुद्धचा लढा!
नव्या संसाराची स्वप्ने घेऊन आलेली नंदिनी (नेहा पेंडसे) आनंदराव देसाई (मोहन जोशी) यांचा

 

भाऊ अच्युत (सुबोध भावे) याची पत्नी म्हणून देसाईंच्या घरात येते. पहिल्या रात्रीच तिच्यावर कामांध आनंदरावांशी संघर्ष करण्याची वेळ येते. अर्थात पहिला संघर्ष ती जिंकते मात्र आनंदरावांविरुध्द लढण्याची तयारी तिला सतत करावी लागते. तिला मदत मिळते ती तिच्या जावेची (रिमा लागू) आणि गावातील दादूभटाची (मोहन आगाशे). नंदिनीचा संघर्ष दोन बाजूंनी सुरू असतो. एकीकडे कामांध आनंदरावांपासून आपला बचाव करायचा आणि नवरा अच्युतशी संवाद साधायचा. हा सारा संघर्ष सुरू असताना नंदिनीची विठोबावरची भक्ती कायम असते. त्याचवेळी देसाईंच्या वाडय़ावर एका स्वामींचे आगमन होते. हे स्वामी (चित्तरंजन कोल्हटकर ) नंदिनीच्या समस्या कमी करू शकत नाहीत. पण त्यांच्यामुळे अच्युत सुधारतो. अर्थात नंदिनी आणि अच्युत यांच्यात नवरा बायकोचे नाते प्रस्थापित झालेले नसते. त्या अर्थाने नंदिनी लग्न होऊनही पत्नी झालेली नसतेच. सर्व पातळीवर तिचा लढा सुरू असतो. आणि एका अतक्र्य घटनेने तिचे व अच्युतचे आयुष्य बदलते. तिचा लढा पूर्णत्वास जातो, पण कसा ते पडद्यावर पाहणेच जास्त श्रेयस्कर आहे.
ज्येष्ठ साहित्यिक चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या ‘अगोचर’ या कादंबरीवर आधारित ‘अग्निदिव्य’ या चित्रपटाची कथा पडद्यावर साकारताना दिग्दर्शक अजित शिरोळे यांनी कादंबरीच्या आशयाला धक्का न लावता पडद्यावर ती उत्कटपणे साकारली आहे. या कादंबरीतील मुख्य पात्राच्या कामांधतेची पातळी बीभत्सत्ेच्या पातळीवर येते हा अमंगळ आणि बीभत्स रस व नंदिनीच्या माध्यमातून आलेला कोमल रस यासह ही कादंबरी पडद्यावर साकारली आहे. एकीकडे आनंदराव देसाईंची व्यक्तिरेखा पूर्ण काळ्या छायेतील आणि देखण्या नंदिनीच्या व्यक्तिमत्त्वातून सृष्टीच्या सौंदर्याच्या मंगलतेची व्यक्तिरेखा यांच्यातील ही लढाई खानोलकरांनी कादंबरीत जेवढय़ा ताकदीने मांडली आहे. तितक्याच ताकदीने अजित शिरोळे यांनी पडद्यावर मांडली आहे. खानोलकरांची कादंबरी पडद्यावर मांडणे हे शिवधनुष्य उचलण्याचे काम होते आणि या कामात शिरोळे पूर्ण यशस्वी झाले आहेत. यातच त्यांची उत्तम कामगिरी स्पष्ट व्हावी.
मोहन जोशी, चित्तरंजन कोल्हटकर आणि मोहन आगाशे ही दादा मंडळी इथे खरोखरच आपली अभिनयातील दादागिरी दाखवून देतात. रिमा लागू, उषा नाईक या आपले अभिनयसामथ्र्य किती आहे ते छोटय़ा छोटय़ा प्रसंगातून प्रत्ययकारी पद्धतीने दाखवून देतात. या मल्टीस्टार कास्ट असलेल्या चित्रपटात मराठीत प्रथमच आलेली नेहा पेंडसे ते उगवता कलाकार अमेय वाघ यांच्यापर्यंत कोणीच कमी पडत नाही. प्रत्येकजण एकमेकांवर कुरघोडी न करता आपापली भूमिका उत्तम कशी होईल याची काळजी घेतात. त्यामुळे सर्वाचा समन्वय साधून एका उत्तम टीमवर्कमधून चित्रपट त्यातील आशय भेदकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. मोहन आगाशे यांची दादूभटाची यातील भूमिका ही खरोखरच आवर्जून बघावी अशी आहे. मोहन आगाशे यांनी या चित्रपटात उभा केलेला अस्सल कोकणी माणूस अफलातून. अशीच दुसरी भूमिका म्हणजे चित्तरंजन कोल्हटकर यांची स्वामीची. त्यांची भूमिका हा नव्या पिढीतील अभिनेते आणि अभिनेत्रींना अभिनयाची कार्यशाळा ठरावी अशी आहे. नेहा पेंडसे हिने या भूमिकेचे सर्व पदर समजून घेऊन ही भूमिका समजावून केली आहे. नंदिनीची व्यक्तिरेखा हतबल असाह्य़ अशी नाही त्याबरोबर आक्रस्ताळी पण नाही. अच्युतबद्दलची तिची असोशी आणि त्याने केलेली तिची उपेक्षा यामुळे तिचे चिडणे त्याचबरोबर तातूच्या वेडेपणामुळे व त्याने करून घेतलेली स्वत:ची दुर्दशा याबद्दल तिला वाटणारी खंत या साऱ्या छटा नेहा पेंडसे हिने अत्यंत नेमकेपणाने दाखवल्या आहेत. हिंदी चित्रपटांमधील अमिताभ आणि शशीकपुर यांच्यात जसा सामना असे, एक रौद्र रस व दुसरा शांत रस अशी टक्कर असे. या लढतीत कोणी कमी पडू न चालत नाही. तसा सामना इथे आनंदराव व नंदिनी यांच्यात आहे. मोहन जोशी यांच्यासारख्या कसलेल्या कलावंतासमोर नेहा पेंडसे कुठेही कमी पडत नाही.
सुबोध भावे, आनंद काळे यांच्याही भूमिका लक्षवेधी अशा आहेत. चिं त्र्यं खानोलकर यांची कादंबरी पडद्यावर आणणे व उत्तम रितीने सादर करणे भल्याभल्याना जमलेले नाही. इथे अजित शिरोळे हे आव्हान पेलण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांना यातील कलावंताची मोलाची साथ लाभली आहे हे विसरून चालणार नाही. निर्माते प्यारेलाल चौधरी यांनी हा वेगळा विषय पडद्यावर आणून धाडस केले आहे.
व्यावसायिक गणितापोटी दिग्दर्शकाकडे एखाद्या आयटम सॉंग चा आग्रह न धरता दिग्दर्शकाला पूर्ण स्वातंत्र्य देऊन एक अभिजात कादंबरी पडद्यावर आणण्याची कामगिरी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. शिरोळे आणि चौधरी यांच्या टीमने एक उत्तम अनुभव देणारी कलाकृती सादर केली आहे यात शंका नाही.
विनायक लिमये