Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

झेंडा ‘अटके’पार!
पानिपतच्या रणांगणावर अगणित मराठी वीरांनी आपले प्रश्नण देशासाठी अर्पण केले आहेत. यामध्ये

 

पुणे परिसरातील मावळ्यांच्या शौर्याला तोड नाही. पानिपत संग्रामपूर्वी १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला ‘अटक’ चा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात पानिपतवीर मानाजी पायगुडे आघाडीवर होते.
सन १७५८ मध्ये मराठय़ांनी सरहिंद, लाहोर जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमूर आणि सरदार जहाँनखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. जाताना त्यांनी अवजड तोफखाना आणि दिल्लीतील लुटीचा खजिना तेथेच सोडून दिला. त्या वेळी तैमूरने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले. तहमासखान मुक्त झाल्याने त्याने लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे! तारीख होती १० एप्रिल १७५८. ही हकिकत ‘तहमासनामा’ या आपल्या आत्मचरित्रापर ग्रंथात तहमासखानाने लिहून ठेवली आहे. अब्दालीच्या सैन्याचा पाठलाग मराठय़ांनी चालूच ठेवला होता. त्यांनी चिनाब, झेलम अशा मोठय़ा नद्या ओलांडल्या. रावळपिंडीही मराठय़ांनी सर केली व मराठी फौजा सिंधु नदीच्या काठांवर आल्या. नदीच्या पलीकडील काठांवर अटक किल्ला आहे. वायव्य सरहद्दीचे रक्षण करण्यासाठी १५८१ मध्ये अकबराने अटक किल्ला बांधला. मराठी सैन्याने नदीच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज घेतला व नदीवर होडीचा पूल तयार केला. होडीच्या पुलावरून मराठी फौजा सिंधूपार होऊन अटक किल्ल्यापर्यंत आल्या व किल्ल्यावर हल्ला करून तो हस्तगत केला. ‘अटके’ वर मराठी जरीपटका फडकला. ही गोष्ट १० ऑगस्ट १७५८ ची. मराठी फौजेत या वेळी मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव रेठरेकर, गोपाळराव गणेश, तुकोजी खंडोजी कदम, नरसोजी पंडित, साबाजी शिंदे इत्यादी सेनानी आपापल्या पथकाबरोबर होते.
अटकेच्या मोहिमेचे नेतृत्व श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांनी केले. लाहोरहून श्रीमंत रघुनाथरावांचे पत्र पुण्यात आले. बिपाशा नदी तीरावरून सडय़ा फौजा मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव, गोपाळ गणेशसह पुढे रवाना केल्या. पेशवे दप्तर खंड २७/२१८ या मध्ये या बाबतचे पत्र उपलब्ध आहे. ‘अटके’ च्या विजयात सहभागी असलेले सरदार मानाजी पायगुडे यांची इतिहासातील कामगिरी खालील प्रसंगावरून आपल्या समोर येते.
१) सन १७३४ मधील दिल्लीच्या रणसंग्रामात राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, यशवंतराव पवार, गोविंद हरी पटवर्धन इत्यादी ज्येष्ठांबरोबर मानाजी पायगुडे सहभागी होते.
२) १६-२-१७५१ च्या पत्रात नारायणराव घोरपडे व मानाजी पायगुडे यांनी बेळगाव प्रश्नंतात शहापूरची पेठ मारली असा उल्लेख आहे. ३) ३०-११-१७३७ च्या पत्रात म्हटल्याप्रमाणे थोरले बाजीराव यांनी काही घोडे व बंदूकस्वार मानाजींकडे सुपूर्द केले होते. ४) २६-१-१७४८ च्या पत्रात जनार्दन गणेश भाऊसाहेब पेशव्यांना लिहितात, ‘मानाजी पायगुडे व आंग्रे यांची लढाई मसुऱ्यास झाली. आंग्रे भगवंतगडावर पळून गेले. मानाजी पायगुडे यांनी पारगड व शिवगड हस्तगत केला व पोर्तुगीजांना शह दिला.’ ५) २२-१-१७४९ च्या पत्रात विठ्ठल शिवदेव पेशव्यांना आपली हकिकत कळवितात. त्यात मानाजी व त्यांचा पुत्र लालजी यांच्या पराक्रमाचा उल्लेख आहे. बुंदेलखंडात तेजगड किल्ला आहे. ह्य़ा किल्ल्यास तीन हजार सैन्याने वेढा घालून किल्ला मोठय़ा शर्थीने जिंकला. मानाजी व त्यांचा पुत्र लालजी याने पराक्रमाची परिसीमा गाठली. लालजीस वीरमरण आले परंतु किल्लय़ाचा पाडाव झाला. ६) फेब्रुवारी १७५१ च्या पत्रात त्रिंबकराव पेठे सातारा व कोल्हापूर प्रश्नंताची घटना पेशव्यांना कळवतात. त्यात म्हटले आहे, की ‘मानाजी पायगुडे कोल्हापूर प्रश्नंतात तळ ठोकून आहेत व छत्रपती रामराजे कोल्हापूरकर राजकारणावर लक्ष ठेवून आहेत.’ ७) १७५४ च्या पत्रात विठ्ठल शिवदेव लिहितात- राजेश्री मानाजी पायगुडे यांजकडे बाणाची कैची, बाणदार, पैसा सत्वर पाठवायची आज्ञा करावी. ८) १४-२-५६ (१७५६) च्या पत्रात गोविंद बल्लाळ यांनी बकरुल्लाखान याचे बरोबर केलेल्या लढाईचे वर्णन आहे. यातही मानाजींनी मोठा पराक्रम गाजवला. ९) जून १७५७ रोजी मानाजी पायगुडे यांनी दिल्लीहून पुण्यास कळवले आहे, की आम्ही लाल किल्ल्याचा काबूल दरवाजा व लाहोर दरवाजा ताब्यात घेतला आहे व त्यावर पहारे बसवले आहेत. आम्हाला मनुष्यबळ व पैसा पाठवावा, ही विनंती. पानिपत संबंधात मानाजी पायगुडे यांचा बऱ्याच पत्रात उल्लेख आहे. पानिपतच्या ऐतिहासिक पोवाडय़ात समशेरबहाद्दर व मानाजी शेजारीशेजारी उभे राहून लढत होते असा उल्लेख आहे.
कॅ. वासुदेव बेलवलकर यांनी लिहिले आहे, की खैबरखिंडीच्या पायथ्याशी असलेल्या जमरुड या किल्ल्यावर मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर, केशवराव पानसे इत्यादींनी कबजा मिळविला. मराठी फौजा जवळजवळ काबूल नदीपर्यंत गेल्या होत्या, पलीकडून येणाऱ्या शत्रूच्या फौजांना हैराण करण्याचे काम या मराठी फौजेने केले. मानाजी पायगुडे यांची एकंदर कारकीर्द पाहता असे लक्षात येते, की मानाजी हे पेशव्यांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. त्यांचे आयुष्यातील आणखी एक प्रसंग म्हणजे त्यांच्या अपूर्व कामगिरीचा ‘कळस’ म्हणावा लागेल. पेशवे-पोर्तुगीज संबंधातील एक घटना. त्या वेळी गोव्यात मांडवीनदी काठावर मराठा पोर्तुगीज यांच्यात बोलणी चालू होती. नदीकाठी एका तंबूत दोन मराठा सरदार मराठय़ांचे वतीने बोलत होते. नारायण शेणवी नावाचा ब्राह्मण दुभाष्याचे काम करीत होता. मराठय़ांचे वकील म्हणून काम करणारे दोन सरदार होते. मानाजी पायगुडे व सयाजी गुजर! ही बाब सेतु माधवराव पगडी यांनी आपल्या ‘मराठे-पोर्तुगीज संबंध’ या आपल्या पुस्तकात दिलेली आहे. अशा या मानाजी पायगुडे व अन्य सर्वच मराठा सेनानींना मानाचा मुजरा!
अरुण पायगुडे