Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

‘डीईएस’ शाळांच्या विद्यार्थ्यांना सुटी
अभ्यास, उपस्थितीबाबत शाळांचे शिथिल धोरण

पुणे, ९ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’ च्या संसर्गामुळे सरसकट सर्व शिक्षणसंस्था बंद करण्याची गरज नसून जिल्हाधिकारी व संस्थाचालक स्तरावर निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केल्यानंतर पुणे शहर व परिसरातील काही संस्थाचालकांनी आज ‘शाळाबंदी’ बाबत धोरण स्वीकारले.
‘स्वाइन फ्लू’ च्या संसर्गामुळे सुमारे २० शाळा व दोन महाविद्यालये यापूर्वीच आठवडाभरासाठी बंद ठेवण्यात आल्यानंतर आता डेक्कन एज्युकेशन सोसायटीने आपल्या सर्व शाळा १६ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

ध्वनिप्रदूषणाकडे सामाजिक उपद्रव म्हणून पाहण्याची गरज
‘‘लोकसत्ता’ गणेशोत्सव मंच’च्या चर्चासत्रातील मत

पुणे, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

ध्वनिप्रदूषणाकडे ‘गणपती मंडळांविरुद्ध पोलिसांकडून होणाऱ्या अवास्तव कारवाईमुळे निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न’ म्हणून नाही तर ‘सामाजिक उपद्रव’ म्हणून पाहिल्यास समाजातील प्रत्येकाचा जीवन जगण्याचा हक्क अबाधित राहील. स्वास्थ्य आणि आरोग्यावर दुष्परिणाम करणाऱ्या या समस्येकडे सामाजिक व मानवी दृष्टीने पाहण्याची गरज आहे, असा सूर आज येथे आयोजित चर्चासत्रात निघाला.

मानसिक त्रासाचा बळी ?
सुनील माळी

काही भलतेच लोक
मागुनी करतील शोक
तेव्हाही मी त्यांच्या
आसवात नसणारच..
आपल्या कामावर मनापासून प्रेम करणारे, झोपडपट्टय़ांमध्ये फिरून बायाबापडय़ांना ‘उभे’ करणारे अशोक कळमकर म्हणजे महापालिकेला भूषण असलेले अधिकारी. असा अधिकारी जेव्हा राजकीय दडपणामुळे खचून जातो, तेव्हा निश्चितच महापालिकेचा कारभार चुकत असतो.

शिक्रापूरमधील शाळा, महाविद्यालये, आठवडा बाजार आठ दिवस बंद
शिक्रापूर, ९ ऑगस्ट/वार्ताहर

पुणे शहरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असतानाच, जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात तो फैलावत असल्याचे पुढे आले आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एका बारावर्षीय मुलाला स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून, या पाश्र्वभूमीवर गावातील शाळा, महाविद्यालये, क्लासेस, आठवडा बाजार आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेने आज घेतला.

महाराष्ट्रातील ‘दामराज्य’ खालसा करून ‘रामराज्य’ आणा - संजय राऊत
पिंपरी, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

महाराष्ट्रातील दामराज्य खालसा करून रामराज्य आणा, असे आवाहन शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भोसरी येथे बोलताना केले. महागाई आकाशाला भिडली असताना शेतक ऱ्यांचे नेते म्हणविणारे कृषिमंत्री शरद पवार कुठे आहेत, असा प्रश्नही त्यांनी केला.

‘गंध’ : दरवळत जाणारा
रं ग, रूप, आकार, गंध (वास) ही कोणत्याही पदार्थाची सामान्य गुणवैशिष्टय़े. एखादा पदार्थ खाण्याचा असेल तर त्याची ‘चव’ हे त्याचे आणखी एक गुणवैशिष्टय़. काही पदार्थ मात्र त्याच्या ‘वासा’ वरूनच ओळखले जातात. एखाद्या सुवासिक उदबत्तीची ‘दरवळ’ अनेकदा मनाला उत्तेजित करून जाते, तर काही पदार्थाचा ‘वास’ मनात कायमचा तिटकारा उत्पन्न करून जातो. पुण्यातील प्रयोगशील लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी याच ‘वास’ संकल्पनेवर आधारित ‘गंध’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या ‘गंध’ला ‘जन्म, तारुण्य आणि मृत्यू’ या मानवी जीवनातील तीन प्रमुख टप्प्यांची जोड दिल्यामुळे हा ‘गंध’ केवळ दरवळ नाही तर तो जीवनासंबंधी विचार करायलाही लावतो.‘गंध’ मध्ये ‘जन्म, तारुण्य आणि मृत्यू’शी संबंधित तीन वेगवेगळ्या कथा आहेत. या कथेतील कलाकारही वेगवेगळे आहेत. मात्र या तिन्ही कथा ‘गंध’ (वास) या एकाच संकल्पनेशी घट्ट बांधून ठेवण्यात दिग्दर्शक चांगला यशस्वी झाला आहे. ‘गंध’चे तेच एक प्रमुख वैशिष्टय़ आहे.

‘अज्ञात’ राहिलेलंच बरं!
हॉटेलमधल्या बिर्याणीची चव कितीही आवडली तरी ती कशी तयार होते हे जाणून घेण्यासाठी भटारखान्यात जाण्याचा हट्ट करू नये. बेकरीतला पाव कितीही मऊ लागला तरी त्याचे पीठ मळताना पाहण्याचा हट्ट बेकरीवाल्याकडे करू नये. त्याचप्रमाणे ‘अज्ञात’ची कितीही हवा तयार झाली असली, आणि चित्रपटाचा शेवट गुप्त राखण्यासाठी राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाचे तीन क्लायमॅक्स चित्रीत केले असले, तरी ते पाहण्यासाठी उगाचच चित्रपटगृहाची वाटही धरू नये. उलट त्यांनी चित्रपटाला दिलेले शीर्षक शिरसावंद्य मानून प्रेक्षकांनीही या चित्रपटाबाबत ‘अज्ञात’च राहिलेलंच चांगलं.

आजी-आजोबा जेव्हा दत्तक जातात..
घरामधील वृद्ध आई-वडिलांची समस्या आता फार नवीन राहिलेली नाही. तो एक सामाजिक प्रश्न बनला आहे. या विषयावर मराठी तसेच हिंदी चित्रपटही निघाले आहेत. त्यात आता आणखी एका मराठी चित्रपटाची भर पडली आहे. हा चित्रपट म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला मानसन्मान. याही चित्रपटात वृद्ध माता-पित्यांचा म्हणजेच आजी-आजोबांच्या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला आहे. फक्त एकच कल्पना तशी नवी आहे ती म्हणजे स्वत:च्या मुलांकडून मिळणाऱ्या वाईट वागणुकीला कंटाळून या चित्रपटातील आजी-आजोबा चक्क दत्तक जातात.

शीलरक्षणाचा आणि नियतीविरुद्धचा लढा!
नव्या संसाराची स्वप्ने घेऊन आलेली नंदिनी (नेहा पेंडसे) आनंदराव देसाई (मोहन जोशी) यांचा भाऊ अच्युत (सुबोध भावे) याची पत्नी म्हणून देसाईंच्या घरात येते. पहिल्या रात्रीच तिच्यावर कामांध आनंदरावांशी संघर्ष करण्याची वेळ येते. अर्थात पहिला संघर्ष ती जिंकते मात्र आनंदरावांविरुध्द लढण्याची तयारी तिला सतत करावी लागते. तिला मदत मिळते ती तिच्या जावेची (रिमा लागू) आणि गावातील दादूभटाची (मोहन आगाशे). नंदिनीचा संघर्ष दोन बाजूंनी सुरू असतो. एकीकडे कामांध आनंदरावांपासून आपला बचाव करायचा आणि नवरा अच्युतशी संवाद साधायचा. हा सारा संघर्ष सुरू असताना नंदिनीची विठोबावरची भक्ती कायम असते. त्याचवेळी देसाईंच्या वाडय़ावर एका स्वामींचे आगमन होते. हे स्वामी (चित्तरंजन कोल्हटकर ) नंदिनीच्या समस्या कमी करू शकत नाहीत.

झेंडा ‘अटके’पार!
पानिपतच्या रणांगणावर अगणित मराठी वीरांनी आपले प्रश्नण देशासाठी अर्पण केले आहेत. यामध्ये पुणे परिसरातील मावळ्यांच्या शौर्याला तोड नाही. पानिपत संग्रामपूर्वी १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला ‘अटक’ चा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात पानिपतवीर मानाजी पायगुडे आघाडीवर होते. सन १७५८ मध्ये मराठय़ांनी सरहिंद, लाहोर जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमूर आणि सरदार जहाँनखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. जाताना त्यांनी अवजड तोफखाना आणि दिल्लीतील लुटीचा खजिना तेथेच सोडून दिला. त्या वेळी तैमूरने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले.

----------------------------------------------------------------------------

विज्ञानाधारित वस्तूंचे प्रदर्शन
पुणे, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

निर्मिती बहि:शाल मुक्त विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने विज्ञानावर आधारित वस्तुंचे प्रदर्शन हॉटेल सेंट्रल पार्क, जंगली महाराज रस्ता, हॉटेल चायना गेटच्या मागे. पुष्प मंगल कार्यालय- सातारा रस्ता, तसेच बिबवेवाडी रस्ता कॉर्नर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. मुक्त विद्यापीठाचे सुहास बांदल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे प्रदर्शन ४ ऑगस्टपासून ते १७ ऑगस्टपर्यंत रोज सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत चालू राहणार असून, सकाळी १०.३० ते ११.३० आणि सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळात प्रश्नत्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात वजन कमी करणारी उपकरणे, सर्जिकल स्टिलची भांडी, निर्धुर चूल, कडधान्याला सुरेख मोड आणणारा स्प्रश्नऊट मेकर, मिनी तंदूर, बाग कामाची उपकरणे, फोल्डिंग मच्छरदाणी आदी वस्तुंबरोबर मुलांना विज्ञानविषयक गोडी लागावी म्हणून अनेक प्रकारची शास्त्रीय उपकरणे व खेळणी या प्रदर्शनात मांडण्यात आलेली आहेत. असे बांदल यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख जो उमेदवार देतील तोच निवडून आणायचा - खासदार राऊत
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून गटतट काही नाही. जो उमेदवार शिवसेनाप्रमुख देतील तोच निवडून आणावा ,असे आवाहन संजय राऊत यांनी आज चिंचवड येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. भोसरी व चिंचवड मतदारसंघातून अनुक्रमे उद्योजक उमेश चांदगुडे व काँगेसचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत.त्यावर ‘आयात उमेदवार नको ,निष्ठावंतांनाच संधी द्यावी’,अशी संघटनेतील कार्यकर्त्यांची जोरदार मागणी आहे. ही ‘खदखद’ राऊत यांच्याही कानावर गेली. मात्र दोन्ही मेळाव्यांत त्या विषयाला हात घालायला कोणीही धजावले नाही .खासदार बाबर यांनी मात्र कार्यकर्त्यांना , तुमची काही अडचण असल्यास नेते ती सोडवतील असे सावध विधान करून छेडले. त्यानंतर ‘शिवसेनेत गटतट काही नाही, एकच गट आहे तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा . ते जो कोणी उमेदवार देतील तो निवडून आणायचा आहे’, असे राऊत यांनी स्पष्ट बजावल्याने निष्ठावंतांच्या गटातील हवाच निघून गेली.त्यामुळे बारणे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे समजते.

श्री गुरुदेव मंदिराचा नूतनीकरण व कळसारोपण सोहळा बुधवारी
पुणे, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

श्री गुरुदेव मंदिराचा नूतनीकरण व कळसारोपण सोहळा येत्या बुधवारी (१२ ऑगस्ट) घेणार असल्याची माहिती श्री गुरुदेव मंडळ ट्रस्टचे सचिव नागेश करपे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या सोहळ्याचा संपूर्ण विधी स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते होणार असून श्री दत्ताच्या पादुकांची आणि कळसाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक दत्त मंदिर प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता या मार्गाने काढण्यात येणार आहे. या सोहळ्यास दत्त भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करपे यांनी केले. यावेळी मंडळाचे विश्वस्त अजित सांगळे उपस्थित होते.

बेकायदेशीर सावकारी करणाऱ्याला अटक
पुणे, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यात बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्याला जिल्हा पोलिसांनी अटक केली. बनकरवाडी येथे पोलिसांनी ही कारवाई केली. हनुमंत नामदेव जाधव असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपान तुकाराम कारंडे (रा. दत्तनगर, इंदापूर) यांनी जाधव याच्याकडून २०००मध्ये चौदा हजार रुपये कर्ज घेतले होते. कारंडे यांच्याकडून जाधव याने आतापर्यंत एक लाख ६५ हजार रुपये व्याजापोटी घेतले असल्याचे उघडकीस आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

टॅंकरची धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

भरधाव टँकरची धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. वारजे येथील उड्डाणपुलाजवळ काल ही घटना घडली. अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून पसार झाला. हरिदास बळवंत गांजरे (वय ५५, रा. वारजे) असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. वारजे पोलिसांनी अज्ञात टँकरचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. गांजरे हे त्याच्या मोटारसायकलवरून कर्वेनगरकडून वारजेच्या दिशेने जात होते. त्याचवेळी टँकर भरधाव वेगात येत होता. रस्ता ओलांडून जात असताना गांजरे यांच्या दुचाकीला टँकरची जोरात धडक बसल्याने अपघात झाला.

भुशी धरणात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू
लोणावळा, ९ ऑगस्ट/वार्ताहर

लोणावळा येथे वर्षाविहारासाठी आलेल्या तरुणाचा भुशी येथील जलाशयात बुडून मृत्यू झाला. ताहिरअली दाऊदअली बेहलीम (वय २४, मालाड- पूर्व, मुंबई) असे बुडून मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ताहिरअली हा भुशी येथे सकाळी ११ वाजता आपल्या कुटुंब व मित्रांसमवेत या ठिकाणी वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेला होता. भुशी जलाशयाच्या कडेला सर्वजण पाण्यात पाय टाकून बसले होते. ताहीरचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला; त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजता घडली. याबाबत त्याचे नातेवाईक दिलशाद मोहमदसिद्दी खिलजी यांनी फिर्याद दिली. सायंकाळी साडेसहा वाजता लोणावळा शहर पोलिसांनी कातकरी व्यक्तींच्या मदतीने ताहीरचा मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.

तीन लाख सर्जिकल मास्क उपलब्ध
पुणे, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

सर्जिकल डिस्पोजेबल मास्कची निर्मिती करणाऱ्या इस्लामपूर येथील व्हीएसपी इंडस्ट्रिजने पुण्यातील मुख्य वितरक पारख फार्मास्युटिकल्सला आज तीन लाख सर्जिकल मास्कचा पुरवठा केला आहे. त्यामुळे उद्यापासून चार रुपये किमतीचे हे मास्क शहरातील सर्व औषध विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. पारख फार्मास्युटिकल्सने शहरातील सर्व होलसेल विक्रेत्यांना आज या मास्कचा पुरवठा केला असून उद्या त्यांच्याकडून ते औषध विक्रेत्यांपर्यंत पोहोचतील. कंपनीने पुरविलेले हे मास्क अत्यंत माफक दरात होलसेलर्सना देण्यात आले असल्याचे पारख फार्मास्टुटिकल्सचे संदीप पारख यांनी सांगितले. हे मास्क औषध विक्रेत्यांनीही ग्राहकांना चार रुपयांत द्यावेत, असे आवाहन केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे समन्वयक महेंद्र पितळिया यांनी केले आहे. एन ९५ मास्कचा तुटवडा असेपर्यंत नागरिकांनी हे मास्क वापरून आपले संरक्षण करावे, असेही ते म्हणाले.