Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

राज्य

पुण्यात आणखी ४२ जणांना
राज्यात रुग्णांची संख्या २७६ पर्यंत
पुणे, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

राज्यात ‘स्वाइन फ्लू’च्या रुग्णांच्या संख्येबरोबर मृतांची संख्या वाढू लागली आहे. पुण्यात ४२ जणांना, तर मुंबईत चार जणांना ‘स्वाइन फ्लू’ झाला असल्याने राज्यात रविवारी एकूण ४६ जणांना लागण झाली आहे. राज्यातील बाधित २७६ रुग्णांपैकी १९२ रुग्ण हे उपचार करून घरी परतले आहेत. राज्यातील ३२५ संशयितांचे नमुने घेऊन ते राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले होते. त्यापैकी २८० पुण्याचे, तर ३२ मुंबई, तसेच उर्वरित राज्याच्या भागातील रुग्णांचा समावेश आहे.यापैकी राज्यात एकूण ४६ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. लागण झालेल्यांपैकी पुण्यातील ४२ जणांचा समावेश आहे.

देशातील पहिले ‘ब्रेन म्युझियम’ नागपुरात
नागपूर, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

मानवी मेंदू आणि मनाच्या रचनेबद्दल विस्तृत माहिती देणाऱ्या देशातील पहिल्या ‘ब्रेन म्युझियम’चे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यास शहरातील अनेक तज्ज्ञांनी भेट देऊन पाहणी केली. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांच्या प्रयासाने हे ‘म्युझियम ऑफ ब्रेन अ‍ॅन्ड माईंड’ साकारले आहे. धरमपेठेतील स्वामी आर्केडमध्ये डॉ. जोशी यांनी लाखो रुपये खर्च करून हे म्युझियम उभारले आहे. त्यांच्या तीन वर्षांच्या अखंड परिश्रमानंतर साकारलेल्या या म्युझियममध्ये मानवी मेंदू आणि मनाची रचना, मनोव्यापार, मानसिक समस्या, गूढविद्या आणि अंधश्रद्धा यावर विस्तृत माहिती देण्यात आली आहे. या म्युझियममध्ये सर्वाना प्रवेश नि:शुल्क आहे.

वसई-विरार महापालिकेच्या विरोधात विवेक पंडित यांचे उपोषण; आज मुंबईत लाँग मार्च
ठाणे, ९ ऑगस्ट/ प्रतिनिधी

वसई-विरार महापालिका क्षेत्रातून ५३ गावे वगळण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांनी आज क्रांतिदिनापासून वसई तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी उद्या (सोमवार) श्रमजीवीचे हजारो कार्यकर्ते मुंबईत लाँग मार्च करणार आहेत. वसई-विरार महापालिकेत ५३ गावांचा समावेश करण्यास त्या परिसरातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे ही गावे महापालिकेतून वगळावीत, या मागणीसाठी १ ऑगस्टपासून ग्रामस्थांनी आंदोलन छेडले आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून विवेक पंडित यांनी आजच्या क्रांतिदिनापासून वसई तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

टोकाची भूमिका घेतल्यास काँग्रेसची स्वतंत्र लढण्याची तयारी-पृथ्वीराज चव्हाण
कराड, ९ ऑगस्ट/वार्ताहर

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चा सुरू झाली आहे. वरिष्ठ पातळीवर लवकर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. पण, जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांनी टोकाची भूमिका घेतल्यास निवडणूक स्वतंत्रपणे लढवली जाईल असा इशारा काँग्रेसचे महासचिव तथा पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देताना, आघाडीबाबत सकारात्मक भूमिकाही बोलून दाखविली.

विकासासाठी राजकारण न आणता सहकार्य करण्याची गरज - शरद पवार
सोलापूर, ९ऑगस्ट/प्रतिनिधी

शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एखादे चांगले काम होत असेल व त्या माध्यमातून नव्या सुविधा येत असतील तर त्यात राजकारण न आणता सर्वानी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. येथील सात रस्ता भागातील शासकीय दूध योजनेच्या जागेपैकी सहा एकर जागेत सहा कोटी ५७ लाख खर्च करून होत असलेल्या नव्या जिल्हाधिकारी कार्यालयासह महसूल भवनाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पवार यांच्या हस्ते रविवारी दुपारी पार पडला.

पुणे-सोलापूपर्यंत स्केटिंग प्रवास
बागवानच्या विक्रमाची ‘लिमका’मध्ये नोंद

सोलापूर, ९ ऑगस्ट/प्रतिनिधी

सोलापुरातील एका रिक्षाचालकाच्या किशोरवयीन मुलाने पुणे-सोलापूर हे ३१० किलोमीटरचे अंतर स्केटिंगद्वारे अवघ्या १७ तासांत पूर्ण करुन लिमका बुक ऑफ रेकॉर्डसाठी नवा विक्रम प्रस्थापित केला. हा नवा विक्रम गाठण्यासाठी त्याच्या मदतीला सावरकर विचार मंच धावून आले होते.
पुणे-सोलापूर अंतर २४६ किलोमीटरचे आहे. परंतु सैफन याने पुण्याहून सोलापूरकडे येताना शहराजवळील बाळेमार्गे वडाळा, वैरागपर्यंत स्केटिंगचा प्रवास करीत पुन्हा सोलापूर शहर गाठले.

विलासराव देशमुख यांनी शिवसेनेला काढले चिमटे
वाई, ९ ऑगस्ट/वार्ताहर

मी खासदार झालो सारी शिवसेनेची कृपा, असे हवेलीचे खासदार गजानन बाबर यांना सांगून अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख म्हणाले, तुम्ही असेच मराठी माणसांच्या मागे उभे राहा म्हणजे काँग्रेसला आणि काँग्रेसच्या नेत्यांना चांगले दिवस येतील. दिल्लीही अशीच आमच्या मागे खंबीरपणे उभी राहील, असे सांगत शेदमउख यांनी खासदार गजानर बाबर यांच्या उपस्थितीच शिवसेनेला आपल्या खुमासदार शैलीत भरपूर चिमटे काढले.निमित्त होते किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावरील २२ मेगवॉटच्या सहवीज निर्मिती केंद्राच्या भूमिपूजनाचे.

लोकसभेचा ‘अतिकालिक भत्ता’ विधानसभेला भोवणार!
३० हजार कर्मचारी प्रतीक्षेत
पुणे, ९ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा ‘अतिकालीक भत्ता’ निवडणूक होऊन तीन महिने उलटले, तरी मिळाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. लोकसभेचा भत्ता मिळणार नसेल, तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला हात लावणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

महाडमध्ये भाजपतर्फे जेलभरो आंदोलन
महाड, ९ ऑगस्ट/वार्ताहर

महागाईच्या विरोधात महाडमध्ये आज भारतीय जनता पक्षातर्फे महामार्गावर ‘रास्ता रोको’ व ‘जेलभरो’ आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी महामार्गावरील वाहतूक अडविण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. महागाईच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण रायगड जिल्ह्यात आंदोलन आयोजित करण्यात आले होते. महाड आणि पोलादपूर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नाना महाले यांच्या नेतृत्वाखाली महाड पंचायत समितीपासून महामार्गापर्यंत मोर्चा काढला होता. मोर्चा महामार्गावर आल्यानंतर पोलिसांनी मोर्चाला रोखले, तरीही कार्यकर्ते रस्त्यावर येऊन वाहतूक अडविण्याचा प्रयत्न करीत होते. कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडल्याने महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू होती.

शिवथरजवळच्या कुंडात तरुणाचा मृत्यू
महाड, ९ ऑगस्ट/ वार्ताहर

ऐतिहासिक शिवथरघळनजीक डोंगरावर असलेल्या पाण्याच्या कुंडात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तालुक्यातील ही दुसरी दुर्घटना आहे. एमआयडीसीमधील सॅन्डोज कंपनीमध्ये टेक्निशियन असोसिएटपदावर काम करणारा तुषार मनोहर नेहते (३०) हा मेव्हण्यांसोबत शिवथरनजीक कुंडामध्ये पोहण्यासाठी गेला असता त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. पोहत असताना अचानक तुषार नाहीसा झाल्याने नातेवाईकांनी शोधण्याचा प्रयत्न केला. अखेर शिवथर गावातील तरुणांनी कुंडातून तुषारला बाहेर काढले. त्यावेळी तो मरण पावला होता.

पोलिओसदृश बालकांच्या प्रकृतीत सुधारणा
संगमेश्वर, ९ ऑगस्ट/ वार्ताहर

संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या दोन पोलिओसदृश बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. योगेंद्र साळवी या मुलाला उपचारांनंतर घरी सोडण्यात आले असून, वेदिका साळवी या मुलीवर अजूनही उपचार सुरू आहेत. कसबा-कुंभारवाडी येथे आरोग्य यंत्रणेचे लक्ष असून, या गावातील दोन मुलांना पोलिओसदृश आजाराची लक्षणे दिसून आल्याने वाडीतील अन्य मुलांची तपासणी करण्यात आली आहे. परिचारिका वाडीतून फिरत असून, दररोज अहवाल तयार करून तो आरोग्य विभागाकडे पाठविला जात आहे. दरम्यान, करजुवे येथील प्रमोद हेमण या मुलाच्या पायातील शक्ती तापाने कमी झाल्याने त्याला उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात आज दाखल करण्यात आले आहे. प्रमोद याच्याही सर्व तपासण्या केल्या जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.