Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

व्यक्तिवेध

शैलेंद्र, हसरत जयपुरी, साहिर लुधियानवी, कैफी आझमी, शकील बदायुनी, गुलजार यांच्या रांगेत बसण्याची ताकद या कवीमध्ये नव्हती. खरे तर अपघातानेच त्यांना कवी बनवले. लहानपणी डोळ्यांदेखत आई-वडिलांच्या झालेल्या हत्येचा प्रसंग त्यांना आयुष्यभर पुरला. लाहोरजवळच्या शेखपुरा गावात त्यांचे लहानपण गेले. फाळणी झाली आणि पिसाटांनी त्यांच्या आई-वडिलांना ठार केले. त्यांची थोरली बहीण जयपूरमध्ये होती. तिने आपल्या दोन भावंडांचे ‘गुलशन’ उजाड होण्यापासून वाचवले. ते दोघे जयपूरला आले. पुढे हा गुलशनकुमार मेहता महाविद्यालयीन शिक्षणासाठी दिल्लीत आला. महाविद्यालयात त्याने कविता करायला सुरुवात केली.

 

रेल्वेची जाहिरात पाहून नोकरीसाठी अर्ज केला. त्यावेळी मध्य प्रदेशात असणाऱ्या कोटा या गावी रेल्वेतली नोकरी सुरू झाली. पुढे बदली मुंबईला कारकून पदावर झाली. कविता रचणे थांबलेले नव्हतेच. मुंबईत त्याची गाठ कल्याणजी वीरजी शहा या संगीतकाराबरोबर पडली. ‘चंद्रसेना’ या चित्रपटासाठी गाणी लिहायची संधी त्यांनी त्याला दिली. रेल्वेचे कार्यालय मस्जिद बंदर स्टेशनवर होते. तेथून तो रोज चालत गिरगावात कल्याणजी-आनंदजी यांच्या ‘म्युझिक रूम’ वर जायचा. ‘सट्टा बाजार’ साठी गाणी लिहिण्यास शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांना निर्मात्याने करारबद्ध केले होते. गुलशनकुमार मेहताने आपले एक गाणे तरी घ्याच असा आग्रह धरला आणि तेच या चित्रपटातले सवरेत्कृष्ट गाणे ठरले. ‘तुम्हें याद होगा, कभी हम मिले थे, मोहब्बत की राहों में मिलके चले थे’ या एकाच गाण्याने त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली. कल्याणजी-आनंदजी यांनी ‘सट्टा बाजार’ चित्रपटाद्वारे गुलशनकुमारांना गीतकार ही ओळख दिली. या चित्रपटाचे वितरक होते शांतीभाई पटेल. त्यांनी गुलशनकुमारांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांचे नामकरण केले ‘गुलशन बावरा’. ‘बावरा’ या शब्दाचा अर्थ सांगायलाच हवा, असे नाही. काही चित्रपटांमध्ये त्यांनी छोटय़ा छोटय़ा भूमिकाही केल्या. त्या पाहिल्या की या शब्दाचा अर्थ आपसूक समजेल. गुलशन बावरा यांच्या गाण्यांचा प्रवास सुरू झाला तेव्हा शैलेंद्र, हसरत जयपुरी, शकील, राजेंद्रकृष्ण आदी कवींचा जमाना ऐन रंगात आलेला होता. १९६१ मध्ये गुलशन बावरांनी रेल्वेची नोकरी सोडली, कारण ते रेल्वेच्या कार्यालयात कमी आणि गाण्यांमध्ये जास्त असायचे. आपण जेव्हा चित्रपटांसाठी गाणी लिहायला लागलो, तेव्हा गीतकार आपल्या ७-८ गाण्यांसाठी दर चित्रपटामागे नव्वद हजार रुपये आकारत होते. आणि त्या काळात ६५ हजार रुपयांमध्ये मुंबईत फ्लॅट मिळत असे, असे ते सांगायचे. वर्षांतून दोन चित्रपटांसाठी फार फार तर गाणी लिहायला मिळत आणि हे चित्रपट बऱ्याचदा ब किंवा क दज्र्याचे असत. १९६७ मध्ये मनोजकुमारच्या ‘उपकार’ या चित्रपटात त्यांनी लिहिलेल्या आणि महेंद्र कपूरने गायिलेल्या ‘मेरे देश की धरती सोना उगले’ या गाण्याने धमाल केली. ‘जंजीर’ चित्रपटात मन्ना डेने त्यांचे गाणे’ यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी’ हे गाणे गायले आणि प्राणने साकारलेल्या पठाणाच्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिरेखेवर चित्रित केलेले हे गाणे अतिशय गाजले. ‘हरजाई’मधले ‘तेरे लिए पलकों की झालर बुनूँ ’ हे गीतही त्यांचेच.‘कस्मे वादे’, ‘सनम तेरी कसम’, ‘अगर तुम ना होते’, ‘हाथ की सफाई’ या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. उषा खन्ना, आर. डी बर्मन यांच्यासाठीही त्यांनी गाणी लिहिली. आनंद बक्षी हे पुढल्या काळात सर्वतोमुखी बनलेले कवी, पण त्यांनी गुलशन बावरा यांना गाणी लिहायला सांगणाऱ्या संगीतकारांबरोबर काम करणार नाही, असा पण केला. त्यामुळे काही संगीतकार गुलशन बावरा यांच्याकडून गाणी लिहून घ्यायचे टाळू लागले. कल्याणजी-आनंदजी यांच्यासाठी त्यांनी सर्वाधिक ६९ गाणी लिहिली. ‘विश्वास’ या चित्रपटात मुकेशने गायिलेल्या गुलशन बावरा यांच्या ‘चांदी की दीवार ना तोडम्ी, प्यार भरा दिल तोडम् दिया’ या गाण्याचा त्या वर्षीच्या उत्कृष्ट गाण्यात समावेश होता. त्यांच्या वाटय़ाला अग्रणी गीतकाराचं स्थान पूर्वीही आले नाही आणि नव्या युगात नवे गीतकार उदयाला आले. पण ‘चांदी के चंद टुकडमें के लिये’, ‘तुम्हें याद होगा’सारखी गाणी आठवताच गुलशन बावरांची याद आल्याशिवाय राहणार नाही.