Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

विविध

स्वाइन फ्लू रुग्णांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे राज्य सरकारांना आदेश
नवी दिल्ली, ९ ऑगस्ट/पीटीआय

देशात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारांनी त्यांच्यासाठी वेगळे बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) व वॉर्ड्स सुरू करावेत व तेथेच त्यांच्यावर उपचार करावेत असे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी आज दूरदर्शनला सांगितले. ते म्हणाले की, स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी वेगळे ओपीडी सुरू करावेत, डॉक्टर्स व परिचारिकांनी स्वाइन फ्लूच्या रुग्णांकडेच लक्ष द्यावे. स्वाइन फ्लू रुग्णांचे वॉर्ड्स पूर्णपणे वेगळे ठेवावेत.

शास्त्रींच्या निधनानंतर शवविच्छेदन करता आले असते -कुलदीप नय्यर
नवी दिल्ली, ९ ऑगस्ट / पीटीआय

रशिया भेटीवेळी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या ताश्कंदमध्ये झालेल्या अनपेक्षित निधनाबद्दल अजूनही विविध कट-कारस्थाबाबत चर्चा होत असतानाच या दौऱ्यामध्ये सहभागी असलेले ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी शास्त्रींच्या निधनानंतर शवविच्छेदन केले नव्हते, असे स्पष्ट केले आहे. मात्र, शवविच्छेदन करता आले असते असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानचे तत्कालिन अध्यक्ष मोहम्मद अयुब खान यांना भेटण्यासाठी भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री १९६६ मध्ये रशियाला गेले होते.

पुतळ्यांच्या माध्यमातून तामिळ-कानडी तिढा सोडविण्याचा प्रयत्न!
बंगळुरू, ९ ऑगस्ट/पी.टी.आय.

कानडी आणि तामिळ भाषकांमधून एरवी विस्तव जात नाही, असे म्हणतात. तामिळनाडूत कन्नडिगांवर आणि कर्नाटकात तमिळींवर हल्ले होणे नवीन नाही आणि दुर्मिळही नाही. पाणी प्रश्न असो व रोजगाराचा प्रश्न असो एकदा का त्या समस्येला भाषिक स्वरूप प्राप्त झाले की तो मुद्दा, मुद्दय़ावरून लागलीच गुद्दय़ावर येतो आणि मग हिंसाचार, जाळपोळ, रक्तपात या गोष्टी ओघानेच येतात. गेली अनेक दशके ही तेढ कायम आहे.मात्र कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ही तेढ मिटविण्याचा चंग बांधला आणि एका पुतळ्याच्या अनावरणाने आज त्यासंदर्भात एक आश्वासक पाऊल टाकले गेले.

चक्रीवादळामुळे चीनमधून १० लाख लोकांना हलविले
बीजिंग, ९ ऑगस्ट/पी.टी.आय.

मोराकोट चक्रीवादळाच्या तडाख्यापासून वाचविण्यासाठी चीनच्या पूर्व भागातील दोन प्रांतांमधील सुमारे १० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे वृत्त झिनुआ न्यूजने दिले आहे. दरम्यान, तैवानलाही या वादळाच्या जोरदार तडाखा बसला असून फिलिपिन्समध्ये वादळाने शुक्रवारी २१ बळी घेतले. मोराकोट चक्रीवादळाने तैवान, चीन आणि फिलिपिन्समध्ये हाहाकार माजवला असून आज चीनमधील झिजियांग प्रांतातील ४७३,३०० नागरिकांना जहाजांमधून सुरक्षित स्थळी नेण्यात आले. तैवानमध्ये २९ जण बेपत्ता आहेत.

अमेरिकेतील म्युझियममध्ये भारतीय कॉमिक्सचे प्रदर्शन
लॉस एंजेलिस, ९ ऑगस्ट / पीटीआय

समकालीन दक्षिण आशियाई सांस्कृतिक वैभवात भारताच्या लहान मुलांच्या (कॉमिक्स) पुस्तकांना विशेष स्थान आहे. या कॉमिक पुस्तकातील नायक आणि नायिका हीच मुलांची श्रद्धास्थाने. आता अमेरिकेतील एका म्युझियममध्ये तब्बल चार महिने चालणाऱ्या प्रदर्शनात ही पुस्तके ठेवण्यात येणार आहेत.

बैतुल्लाचा उत्तराधिकारी ठरवताना शुराच्या बैठकीत हाणामाऱ्या; एक ठार
इस्लामाबाद, ९ ऑगस्ट/पीटीआय

तालिबानचा म्होरक्या बैतुल्ला मेहसूद मारला गेल्यानंतर नवीन नेता निवडीसाठी झालेल्या बैठकीच्या वेळी दोन दहशतवादी गटात हाणामाऱ्या झाल्या. त्यात नेतेपदासाठी इच्छुक असलेला एकजण मारला गेल्याचे पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांनी सांगितले. मलिक यांनी वार्ताहरांना सांगितले की, अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात बैतुल्ला मेहसूद मारला गेल्यानंतर हकीमउल्ला मेहसूद व वली उर रेहमान हे तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेच्या नेतेपदासाठी इच्छुक होते.

खबरे असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी घेतले दोन बळी
रायगडा (ओरिसा), ९ ऑगस्ट / पीटीआय

ओरिसाच्या रायगडा जिल्ह्णाात पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी स्वतंत्र हल्ल्यात दोन व्यक्तींना ठार केले, अशी माहिती आज पोलिसांनी दिली. रायगडा शहरापासून १५० किमी अंतरावरील गाकडीबाली आणि गोदरगुडा गावावर काल रात्री बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात सिबा सबर आणि बिभीषण बेहेरा ठार झाले, अशी माहिती ओरिसा विशेष सशस्त्र पोलीस पथकाचे डेप्युटी कमांडंट पुरुषोत्तम साहू यांनी दिली.